LPG Cylinder Price Hike: महागाईचा चटका, सर्वसामान्यांच्या खिशाला झटका; तुमच्या घरातला गॅस किती रुपयांना मिळणार?
LPG Cylinder Price Hike: देशात एलपीजी सिलेंडरच्या किंमत वाढल्या आहेत, वाढलेल्या किमतींमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चटका बसला आहे.
LPG Cylinder Price Hike: आज महिन्याचा पहिला दिवस, 1 डिसेंबर. आजपासून नव्या महिन्याला सुरुवात झाली आहे. पण आज महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलेंडरच्या किमतींचा आढावा घेतात आणि त्याअंतर्गत इंडियन ऑईल कॉर्पोरेशननं गॅसच्या किमती वाढवल्या आहेत. ही वाढ 19 किलोंच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरसाठी करण्यात आली आहे. घरगुती एलपीजीच्या किमतींत मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
कमर्शिअल (व्यावसायिक) सिलेंडरचे नवे दर आज 1 डिसेंबर 2024 पासून देशभरात लागू झाले आहेत. जाणून घ्या, तुमच्या शहरात गॅस सिलेंडरसाठी तुम्हाला किती रुपये माजावे लागतील?
देशातील चार प्रमुख महानगरांमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती कितीनं वाढल्या?
- दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 16.50 रुपयांनी वाढ झाली असून त्याची किंमत 1818.50 रुपये प्रति सिलेंडरवर पोहोचली आहे.
- मुंबईत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरांत 16.50 रुपयांनी वाढ झाली असून त्याची किंमत 1771 रुपये प्रति सिलेंडरवर पोहोचली आहे.
- चेन्नईमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 16 रुपयांनी वाढली असून ती 1980.50 रुपये प्रति सिलेंडरवर आली आहे.
- कोलकातामध्ये 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 15.50 रुपयांनी वाढली असून ती 1927 रुपये प्रति सिलेंडरवर आली आहे.
विशेष बाब म्हणजे, देशातील चार प्रमुख मेट्रो शहरांपैकी फक्त कोलकाता इथेच गॅस सिलेंडर सर्वाधिक दरांत उपलब्ध आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर सलग पाच महिन्यांपासून वाढत आहेत. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती ऑगस्टपासून सातत्यानं वाढत आहेत आणि डिसेंबरसह सलग पाच महिने 19 किलो गॅसच्या किमतींत वाढ झाली आहे.
नोव्हेंबर आणि ऑक्टोबरमध्ये कितीनं वाढले एलपीजीचे दर
एक नोव्हेंबरपासून इंडियन ऑईलनं कमर्शियल एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये 62 रुपयांची वाढ केली आहे. तर दिल्लीमध्ये 1802 रुपये प्रति सिलेंडर किंमत झाली आहे. ऑक्टोबरमध्ये कमर्शियल गॅसच्या किमतींमध्ये 48.50 रुपये प्रति सिलेंडरची वाढ करण्यात आली होती.