एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
वेळ वचनपूर्तीची!
कोरोनाच्या या मागील काळातील अनुभवावरून आरोग्य व्यवस्थेत क्रांतिकारक बदल केले जाणार असल्याचे म्हटले गेले होते आता त्या सर्व वचनांची पूर्ती करण्याची वेळ आली आहे.
कोरोनाची साथ संपली नसली तरी त्यावर नियंत्रण मिळविण्यास आरोग्य विभागाला वर्षभराने यश प्राप्त झाले आहे. आता तर कोरोना विरोधातील लसीकरण मोहिमेचा कार्यक्रम सुद्धा सुरु झाला आहे. कोरोनाची राज्याला कुणकुण लागून वर्ष झाले आहे, याचवेळी वर्षभरापूर्वी राज्याच्या आरोग्य विभागातार्फे कोरोनाच्या विषाणूसंदर्भात मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर दीड महिन्याने मार्च महिन्यात पुणे येथे कोरोनाच्या संसर्गाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतरच्या काळात कोरोनाने मुंबईसह संपूर्ण राज्यात घातलेला धिंगाणा सगळ्यांनाच माहीत आहे. मात्र या कोरोना काळात सार्वजनिक आरोग्य व्यवस्था किती अपुरी आहे हे ठळकपणे अधोरेखित झाले. त्यानंतर सर्वसामान्यां सोबत सगळ्यांनीच एकसुरात सार्वजनिक आरोग्य व्यस्थेचे सबलीकरण झालेच पाहिजे असा नारा दिला.राज्यकर्त्यांनीही या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत कुशल मनुष्यबळासाठी राज्याच्या आरोग्य व्यस्थेतील रिक्त पदे भरण्याची घोषणा केली. त्याचप्रमाणे नेहमी येणारे साथीच्या आजारांवर संशोधनासाठी प्रयोगशाळा आणि रुग्णांवर उपचार करण्यासाठी मोठे स्वतंत्र रुग्णालय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीत उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन ठेवला होता. कोरोनाच्या या मागील काळातील अनुभवावरून आरोग्य व्यवस्थेत क्रांतिकारक बदल केले जाणार असल्याचे म्हटले गेले होते आता त्या सर्व वचनांची पूर्ती करण्याची वेळ आली आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्याचप्रमाणे आरोग्य व्यवस्थेत टेली-मेडिसिन आणि डिजिटलायझेशन व्यापक प्रमाणात करण्याची गरज हेही या निमित्ताने लक्षात आले आहे. वैद्यकीय तज्ञांच्या मते, साथीचे आजार या अगादर होते, सध्या आहेत आणि भविष्यातही येत राहणार आहेत, त्या दृष्टीने आरोग्य व्यवस्थेत बदल करण्याची नितांत गरज आहे. कोरोनाच्या काळात रुग्णांच्या उपचाराला घेऊन ज्या पद्धतीने राज्यात अभूतपूर्व गोंधळ उडाला होता. आरोग्य व्यस्था तोकडी पडू लागल्याचे चित्र त्यावेळी पाहायला मिळाले होते. त्यामुळे त्या सर्व प्रकारातून बोध घेऊन राज्याच्या आरोग्य विभागाने पायभूत सुविधांसह कोण कोणत्या गोष्टीची भविष्यातील गरज पाहता एक ' ब्लू प्रिंट ' बनवून त्याप्रमाणे काम करण्याची गरज आहे. आरोग्य विषयायचे गांभीर्य सगळ्याच्या लक्षात या काळात आले आहे. प्रत्येक जण स्वतःच्या आरोग्य घेऊन सजग झाला आहे. हळू-हळू का होईना नागरिक आरोग्य साक्षर होऊ लागले आहेत. त्याकरिता आरोग्य विभागाला आता त्यांच्या पूर्वापार चालत आलेल्या व्यवस्थेत बदल करावेच लागणार आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत फक्त गरीब आणि सर्वसामान्य रुग्ण येतो हा समज कोरोना या आजराने फोल ठरविला आहे.ज्या ज्या वेळी साथीच्या आजाराचे भंयकर संकट राज्यांवर येते त्यावेळी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील रुग्णालये प्रथम उपचारासाठी पुढे येतात. त्याचे थोडक्यात उदाहरण द्यायचे झाले तर कोरोनाचे सर्वात आधी रुग्ण पुणे शहरात महानगपालिकेच्या नायडू रुग्णलयात तर मुंबई मध्ये महानगपालिकेच्या कस्तुरबा रुग्णलयात दाखल करण्यात आले होते. त्याच स्वरूपाचे चित्र राज्यातील इतर भागात होते. साथीच्या काळात उपचारासाठी पहिली मदार ही सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर असते. त्यानंतर आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार खासगी रुग्णालयांची मदत घेण्यात येते. त्यामुळे ही व्यस्था मजबूत करणे हे अग्रक्रमाने पाहणे गरजेचे आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ए बी पी माझा डिजिटलशी बोलताना सांगितले की, "सध्या कोरोनाच्या काळातील परिस्थिती पाहता आरोग्य विभागात विविध पदांकरिता कुशल मनुष्यबळाची मोठी गरज असून त्याकरिता युद्ध पातळीवर सर्व पद भरणार असल्याचा निर्णय कॅबिनेटच्या बैठकीमध्ये घेण्याला आला होता. या प्रकरणात संपूर्ण मंत्रीमंडळ गंभीर असून याची आम्ही तात्काळ अंमलबजावणी करणार आहोत. या प्रक्रियेची सुरवात माझ्या विभागाकडून करणार असून, माझ्या विभागाच्या सचिवांनी यांची प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली असून जाहिरात देण्यात आली आहे पुढील महिन्यात परीक्षा होऊन लवकरच ही पदे भरली जाणार आहे. कारण कुशल मनुष्यबळ ही काळाची गरज असून यामुळे नागरिकांना आरोग्याच्या सुविधा मिळणे सुखकर होईल.सार्वजनिक आरोग्य विभगासोबत, वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्या अंतर्गत येणारे वैद्यकीय महाविद्यालये आणि त्यासोबत संलग्न असणारे रुग्णालये आणि नगरविकास खात्यांतर्गत येणाऱ्या महापालिकेतील रुग्णालये या व्यवस्थेतून नागरिकांना आरोग्याच्या विविध सुविधा नाममात्र दारात मिळत असतात. याच व्यवस्थेवर राज्यातील अनेक अनेक नागरिक हे अवलंबून असतात. सगळ्यातमोठा नागरिकांचा भर या रुग्णालयावर अवलंबून आहे. विशेष म्हणजे या सर्व व्यवस्थेवर राज्य सरकारचे नियंत्रण असते. या विभागातील आरोग्य कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त असून यामध्ये डॉक्टरांचा पदे असून ती सुद्धा नजीकच्या काळात भरण्यात येणार आहेत. तसेच याकरिता कॅबिनेटची मंजुरी मिळाली असून लवकरच या प्राक्रियेला सुरुवात करू. यामुळे कोरोनाच्या निमित्ताने आरोग्य यंत्रणेला नवसंजीवनी मिळणार असून याचा फायदा राज्यातील जनतेला नक्कीच होणार आहे.ते पुढे असेही म्हणाले की, " साथीच्या आजारांवर संशोधनासाठी प्रयोगशाळा आणि रुग्णांवर उपचार करण्यासाठी मोठे स्वतंत्र रुग्णालय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या क्षेत्रात उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. त्यावर सुद्धा काम चालू आहे त्यासंदर्भात काही काळानंतर सुस्पष्टता येईल. परंतु साथीच्या आजरासाठी अशा स्वरूपाची स्वतंत्र व्यवस्था असावी असे वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे." कोरोना काळात अर्थव्यवस्था सुरळीत करण्याबरोबर नागरिकांना चांगल्या आरोग्याच्या व्यवस्था निर्माण करण्यासाठी महापालिका शहरात विविध ठिकाणी, तात्पुरत्या स्वरूपाचे शेकडो खाटांचे कोविड केअर सेंटर, स्वतंत्र कोविड हॉस्पिटल उभारले होते . त्यामध्ये या तात्पुरत्या स्वरूपाच्या सेंटर्स मध्ये हजारो खाटांची व्यवस्था शहरातील विविध भागात करण्यात आली होती. हा अनुभव आरोग्य व्यवस्थेसाठी अगदीच नवीन होता. शास्त्रज्ञांच्या रात्रंदिवसच्या अथक प्रयत्नाने वर्षभरात या आजराच्या विरोधातील लस प्राप्त झाली. सध्या संपूर्ण देशात लसीकरणाची मोहीम राबवली जात आहे. या साथीवर नियंत्रण मिळविण्यात आरोग्य विभागाला यश प्राप्त झाले आहे. तरी थोड्या बहुत प्रमाणात नवीन निदान होऊन रुग्ण रोज येत आहेत. त्यामुळे सर्वानीच अजून काही काळ सुरक्षिततेचे नियम पाळून आपला वावर योग्य पद्धतीने ठेवला पाहिजे. कोरोनाच्या या काळात कायदा आणि सुव्यस्था राखण्याच्या दृष्टीने पोलीस विभागातील सर्व कर्मचारी जीवाची पर्वा न करता रस्त्यावत तैनात होते. या काळात पोलीस यंत्रणेवर मोठ्या पद्धतीने ताण आला होता. अनेकांना तर साप्ताहिकी सुट्टीही मिळत नव्हती. या राज्याच्या पोलीस विभागानेसुद्धा मोठी पोलीस भरती जाहीर केली आहे. कारण या विभागातही अनेक पदे रिक्त आहे. शिवाय ज्यापद्धतीने लोकसंख्या वाढत आहे त्यापद्धतीने सुरक्षेसाठी अधिक मनुष्यबळाची या विभागालाही मोठ्या प्रमाणात आवश्यकता होती. त्यामुळे या विभागातही लवकर भरतीस प्रारंभ होणार आहे. कोरोना काळातील पोलिसिंग हे अगदीच वेगळ्या प्रकारचे होते त्याचा अनुभव सगळ्यांनाच या वेळी आला. लॉक डाउन मध्ये विनाकारण बाहेर पडण्यापासून ते मास्क न घालणाऱ्यांवर कडक शिस्त ठेवण्यात पोलिसात विभागाचे मोठे काम या काळात बघायला मिळाले. या काळात आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत पोलीस विभागातील अनेकांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र या दोन्ही विभागातील लोकांनी उपचार घेऊन पुन्हा तात्काळ कामावर रुजू राहून त्याचे कर्तव्य बजावले होते. इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष, महाराष्ट्र, डॉ अविनाश भोंडवे यांनी सांगितले की, " कोरोनाने आपल्याला खूप काही शिकविले आहे त्याचा बोध घेऊन आता आरोग्य व्यस्थेत आमूलाग्र बदल केले पाहिजे. त्याची सुरवात म्हणजे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील खर्च वाढविला पाहिजे याकरिता केंद्र आणि राज्य सरकारने आपल्या उत्पन्नातील किमान ४-५% खर्च आरोग्य व्यस्थेवर केला पाहिजे. सार्वजनिक आरोग्य व्यस्थेतील रुग्णालयाची संख्या वाढली पाहिजे. ब्रिटिश कालीन आरोग्य व्यवस्थेत, एक दोन इमारती किंवा एक दोन माळे फक्त आपल्याकडून वाढविण्यात आले आहेत. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुका आणि जिल्हा रुग्णलयात पायभूत सुविधा निर्माण करून दिल्या पाहिजेत. कारण साथीचे आजार हे असे येताच राहणार आहेत. त्यासाठी आपल्याला सज्ज राहणे गरजेचे आहे.वैद्यकीय महाविद्यालये वाढविली गेली पाहिजे त्यातुन निर्माण होणारे डॉक्टर आपल्या मिळतील आणि हे सर्वच पॅथीची महाविद्यालयांबाबत लागू होते. तसेच अधिपरिचारिक आणि टेक्निशियन यांची कमतरता फार मोठ्या प्रमाणात आपल्याकडे आहे. त्यासाठी नवीन ट्रेनिंग इन्स्टिटयूट उभारल्या गेल्या पाहिजेत. तसेच सध्या ज्या काही सरकारच्या आरोग्यच्या बाबतीतील सर्व सामान्यसाठीच्या योजना आहेत त्या इन्शुरंस आधारित अशा आहेत. त्यामुळे यामध्ये फायदा झाला तर या कंपन्यांचा होता. रुग्णांना चांगले उपचार मिळत नाही, त्या ठरलेल्या बजेट मध्ये उपचार रुग्णांना द्यावे लागतात. त्यामुळे कधी चांगल्या सुविधा देताना अडचण निर्माण होते. तसेच अत्याधुनिक मशिनरी जिल्हा स्तरावर सर्व सार्वजनिक रुग्णालयावर असणे अपेक्षित आहे." कोरोना काळात टेली-मेडिसिनने फार मोठी भूमिका बजावली आहे. त्यामुळे येत्या काळात सर्व रुग्णालयात टेली मेडिसिनची सुविधा कशा पद्धतीने उभी करता येईल याकडॆ लक्ष देण्याची गरज आहे. त्याचप्राणे आरोग्य प्रणाली मध्ये डिजिटलायजेशन झाल्यास कोणताही रुग्ण कुठूनही आपले वैद्यकीय चाचण्यांचे प्रमाणपत्र सादर करत उपचार घेऊ शकतो. तसेच रुग्णांची सर्व उपचाराची कागदपत्रे ही सर्व रुग्णालयाच्या ' हेल्थ लॉकर ' मध्ये साठवून ठेवली जाऊ शकतील अशा पद्धतीने भविष्याचा विचार करून आताच त्या दिशेने पावले उचलण्याची गरज आहे.येत्या काही वर्षात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल झाल्यास नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निकालात निघू शकेल. अनेक ग्रामीण भागात नागरिक सार्वजनिक रुग्णालयात लवकर उपचार मिळत नाही म्हणून तसेच अनेक दिवस अंगावर आजार काढत असतात. त्यामुळे या आणि अशा अनेक आरोग्याच्या विषयाला घेऊन असणाऱ्या तक्रारी दूर करायच्या असतील तर सार्वजनीक आरोग्य व्यवस्थेला कात टाकल्याशिवाय पर्याय नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
मुंबई
Advertisement