एक्स्प्लोर

BLOG : तेव्हा 'त्या' जीवाचं काळीज जळत असतं!

BLOG : आज होळी. खेड्यांनी अजूनही गोवऱ्या पेटवून घरोघरी होळी केली जाते. गावाच्या पारापाशी नाहीतर वेशीपाशी सगळ्या गावाची मिळून एकच मोठी होळी पेटवली जाते. यात गोवऱ्या असतात, जळण असतं, इकडून तिकडून आणलेली लाकडं असतात. यात जळणाऱ्या हरेक वस्तूचे वास भिन्न असतात.  घासलेट ओतून पेटवलेल्या लाकडाचा वास वेगळा असतो. ओलं लाकूड जळत नाही आणि त्याचा धूर जास्ती येतो. बाभूळ जळताना ठिणग्या जास्ती उडतात तर आंब्याचा, चिंचेचा बुंधा शांत निगुतिने जळत राहतो. 

होळीत कुणी नारळाच्या वाळक्या झावळ्या आणून टाकल्या तर त्या अगदी धडाडून पेटतात, काही मिनिटात त्यांची राख होते. त्यांची धग ओल्या लाकडांच्या कामी येते. होळीशिवाय जळणाऱ्या अन्य चीजवस्तूंचे गणितही भारी आहे.

काढणी झाल्यावर चिपाडासकट ऊस पेटवून दिला जातो तेंव्हा धुरालाही गोडसर खाट येतो!
हुरड्याचा आर पेटवून त्यात हरभऱ्याची डहाळी जाळली जातात तेंव्हा ती फटफट उडतात आणि आतला हरभरा शेकून निघतो!
तुरीचं काड पेटवलं की इतकं वेगानं जळतं की अवघ्या काही मिनिटांत अख्खं शिवार लख्ख जळू लागतं. 
ऊसाचं वाडं असो की जवारीची ताटं असोत ती वाळून खडंग झाली तरी त्यांना त्यांचा प्राकृतिक गंध असतो, त्यांना पेटवलं की तो गंध आगीसोबत वाऱ्यावर पसरतो.
समई निरंजनातलं तेल संपून गेलं की एकट्याने जळणाऱ्या वातीचा वास जणवतो, हे वातीचं गंधअस्तित्व असतं!

दगडी भिंतीवर थापलेल्या गोवऱ्या, मातीत थापलेल्या गोवऱ्या आणि चुलवणापाशी थापलेल्या गोवऱ्या यात फरक असतो. त्यांचा वासही वेगळा येतो!
नेमानं चूल हाताळणारी चाणाक्ष बाई तर गायीच्या आणि म्हशीच्या शेणाच्या गोवऱ्याही बरोबर ओळखते.                      
गोवऱ्या काहीशा ओल्या जरी असल्या तरी त्यांचा वास वेगळा असतो, वाळलेल्या गोवऱ्या जळताना आवाजही वेगळा येतो. 
 
आताशा गावांनी चुली कमी होत चालल्यात मात्र पुरत्या नामशेष झालेल्या नाहीत. चुलीतल्या सरपणाचेही वेगवेगळे वास असतात. 
आधी आर पेटवला जातो मग काटक्या कुटक्या पेटवल्या जातात, त्यांचे कडाकड आवाज येतात. चुलीतून ठिणग्या उडतात. चांगला जाळ धडाडला की मग उंडीव लाकूड चुलीत सारलं जातं आर विझू लागतो. मग फोडीव लाकडाचे बारकाले तुकडे ठेवले जातात. मग आर पुरता विझायच्या बेतात येतो. 
चुलीसमोर बसलेली बाई सावध असतेच. हातातली फुकारी घेऊन ती फुंफुं आवाज करत विझत चाललेल्या विस्तवावर फुका मारू लागते. 
सैपाकघरात धुराचे लोट उठतात. 

पांढरा पिवळा धूर त्या बाईच्या फुफ्फुसात शिरतो, ती बेजार होते मात्र फुकारी सोडत नाही. 
काही वेळानं धूर एकदाचा सरतो आणि चूल भडकून उठते. चिखलाने सारवलेली पातेली चुलीवर चढतात आणि वास बदलून जातो. 
माती जळत असते, लाकडं जळत असतात आणि त्यांच्या समोर बसलेली बाई रोज थोडी थोडी जळत जाते!    

काही घरांनी चुलीतही गोवऱ्या जाळल्या जातात. 
गोवरी मधोमध तोडून भाकरी मोडल्यागत तिचे चार भाग केले जातात. 
चुलीत कडंकडंनं गवऱ्या लावल्या जातात वर थोडी माया राखून गवऱ्यात थोडं वाळलेलं गवत आणि कागदाचे तुकडे सरकवले जातात, काडीपेटी पुढचे काम चोख करते. 
गोवऱ्या जळताना अफाट धूर होतो. घरात एकच खाट उडतो. 
चुलीपुढे बसलेली बाई पार घायकुतीला येते, तिचा श्वास फुलून येतो मात्र ती चुलीपुढून उठू शकत नाही. 
थोड्या वेळाने चूल धडाडते, बाईचा ऊर शांत होत जातो मात्र काळजात शिरलेला धूर खोल खोल जात राहतो!
इतकं काही घडतं तेंव्हा त्या चुलीवर बनवलेल्या कुठल्याही जिनसंला चव येतेच पण तिच्यासमोर कणाकणाने जळत राहणाऱ्या बाईचे काय?    

सैपाकातल्या वस्तूंचा जळतानाचा गंध भारीच असतो. जिरी मोहरीच्या फोडणीपासून ते मटणभाजणी पर्यंतचे वास वेगळेच असतात, तळणातल्या हिरव्या मिरच्यांचा तडतडाट आणि खाट खास असतो. 
तीन धोंड्यांची चूल करून त्यावर केलेलं वांग्याचं भरीत आपली ओळख वाऱ्यासोबत दूरवर पाठवतं!  
दूध ऊतू गेल्यावर त्याचा करपट वास कितीतरी वेळ घरात राहतो, नुसतं पातेलं जरी आधणासाठी जास्त वेळ ठेवलं तरी लोखंड जळल्याचा वास येतो!
पितळी हंडा चुलीवर ठेवला तर त्याचा वास वेगळा येतो आणि जर्मनचं भगुणं ठेवलं तर त्याचा वास वेगळा येतो!
स्टेनलेस स्टील मोठ्या शहरांतल्या कचकडी थोरांसारखं असतं, त्याला वास नसतो की गंध नसतो नि त्याची वेगळी अशी चवही नसते. ते दिसायला देखणं असलं तरी त्याला स्वतःचे गुणधर्म नसतात!
वेगवेगळ्या कालवणांचे वासही भिन्न असतात, कुठं तरी दूरवर काही जळत असलं तरी आपलं नाक सांगतं की काय जळतेय! हे भारी असतं जाळ धूर डोळ्यांनी दिसतो पण काय जळतंय हे नाक सांगतं!

मसणवाटेत मढं जळत असलं तर त्याचा आवाजही चर्रर्र चर्रर्र करत येतो आणि एक टिपिकल उग्र भणभणणारा दर्पही येतो. भर उन्हांत कुणाच्या तरी घरचं आढं पेटून उठलं की गाव तिकडं पळत सुटतं. तिथला जाळ सांगतो की त्या घरात नुसतं दारिद्रय होतं की कणभर तरी समृद्धी होती!
बंबात पेटवलेलं जळण आणि धडाडून पेटलेले घराचे वासे यांचा वास सारखाच असतो!

नायलॉन, प्लॅस्टिक, रबर जाळलं तर नाकपुड्या बंद कराव्या वाटतात. काळपट धूर येतो तो वेगळाच!
झाडलोट करुन पाला पाचोळा जाळू नये, पण जाळलाच तर त्याला धुळीचा ठसका येतोच! त्यात ओलं काही असेल तर धूरही येतो!

रोज रानात जाऊन सरपण आणणाऱ्या बायका पोरींच्या देहाचं आयुष्याच्या अखेरीस सरपण झालेलं असतं, बरगडीच्या काटक्या झालेल्या असतात पिंडरीतली नडगी उंडीव लाकडागत उरते, हाताची लोखंडी कांब होते. बाई पार वाळून जाते. जितेपणीच तिचं सरपण होतं! 

सरण रचताना देखील आधी ओंडके ठेवले जातात, मग लाकडं आणि त्यावर गोवऱ्या ठेवल्या जातात! 
आयुष्यभर काबाडकष्ट केलेल्या बाईचं सरपण त्या सरणावर ठेवलं जातं तेंव्हा लाकडं लवकर पेटत नाहीत हे वास्तव आहे!
चंदनगंध असतो मात्र त्याचा दरवळ लाकूड जळल्याबिगर येत नाही! तसं या सरपणावरच्या बायकांचं असतं, त्यांचं चांगुलपण त्यांच्या घराला, गावाला, गावकीला, भावकीला तोवर कळत नाही जोवर त्या जळत नाहीत.

काही लोक आयुष्यभर दुसऱ्यावर जळत राहतात, त्यांचं जळणं दिसत नाही मात्र त्यांचं वागणं त्याची प्रचिती देते! 
  
याही पलीकडे आणखी एक गोष्ट जळत असते ती म्हणजे एखाद्याचा जीव!
कुणाचा जीव जळत असेल तर ना त्याचा धूर येतो ना त्याचा जाळ दिसतो. 
जीव जळत राहतो माणूस आतल्या आत खंगत जातो. 
या जळणाऱ्या जीवाला कुणीच जाणत नाही, मग जितेपणी जळालेल्या जीवाचे कलेवर एके दिवशी जाळलं जातं तेंव्हा त्या जीवाचे नातलग जगासाठी रडून दाखवत असतात!

होळीत जसं ओलं सुकं एकत्र जळतं तसं जगरहाटीत काही आवाज करत धूर पसरवत जळतं तर काही मुक्याने आगीच्या कडक्याशिवाय जळतं!
 
काही असंही जळतं की धडधडून पेटलेली चिता समोर नसली तरी आपलं कुणी गेल्याच्या बातमीनेच दूर कुठे तरी जिवाभावाच्या माणसाच्या डोळा पाणी वाहत असतं तेव्हा त्या जीवाचं काळीज जळत असतं!

 

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : पुण्यात ठाकरेसेना 91 तर मनसे 74 जागा लढणार, राज-उद्धव अंतिम फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब करणार
पुण्यात ठाकरेसेना 91 तर मनसे 74 जागा लढणार, राज-उद्धव अंतिम फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब करणार
Prashant Jagtap Pune: काँग्रेसकडून ऑफर, ठाकरे अन् शिंदेंचाही फोन; कोणत्या पक्षात जाणार?; प्रशांत जगतापांनी अखेर सगळं सांगितलं!
काँग्रेसकडून ऑफर, ठाकरे अन् शिंदेंचाही फोन; कोणत्या पक्षात जाणार?; प्रशांत जगतापांनी अखेर सगळं सांगितलं!
Pune Election Shivsena: नीलम गोऱ्हे कमर्शियल पद्धतीने उमेदवारांना तिकीटं देतायत, भाजपच्या सांगण्यानुसार वागतात; पुण्यातील शिवसैनिकांचा गंभीर आरोप
नीलम गोऱ्हे कमर्शियल पद्धतीने उमेदवारांना तिकीटं देतायत, भाजपच्या सांगण्यानुसार वागतात; पुण्यातील शिवसैनिकांचा गंभीर आरोप
Prashant Jagtap: 27 वर्ष शरद पवारांसोबत एकनिष्ठ राहिले, पण तत्त्वांशी तडजोड करण्याची वेळ येताच राजीनामा टाकला, कांँग्रेस-ठाकरे गटाकडून ऑफर, कोण आहेत प्रशांत जगताप?
27 वर्ष शरद पवारांसोबत एकनिष्ठ राहिले, पण तत्त्वांशी तडजोड करण्याची वेळ येताच राजीनामा टाकला, कांँग्रेस-ठाकरे गटाकडून ऑफर, कोण आहेत प्रशांत जगताप?
ABP Premium

व्हिडीओ

Pimpari NCP Alliance : दोन्ही राष्ट्रवादीचा तिढा दोन जागांवर अडला, त्या 2 इच्छुकांनी सांगितल्या अटी
Rohit Pawar On Ajit Pawar : सगळी जबाबदारी अमोल कोल्हेंवर, अजितदादांसोबत बैठकीला मी नव्हतो
Uddhav Thackeray Calls Prashant Jagtap : उद्धव ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, ऑफर स्वीकारणार
Vidarbha Mahayuti News : नागपूर, चंद्रपूर, अकोला आणि अमरावतीसाठी महायुती एकत्र; युतीवर शिक्कामोर्तब
Navi Mumbai airport first flight : नवी मुंबई विमानतळ सेवेत, पहिलं विमान हवेत Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : पुण्यात ठाकरेसेना 91 तर मनसे 74 जागा लढणार, राज-उद्धव अंतिम फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब करणार
पुण्यात ठाकरेसेना 91 तर मनसे 74 जागा लढणार, राज-उद्धव अंतिम फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब करणार
Prashant Jagtap Pune: काँग्रेसकडून ऑफर, ठाकरे अन् शिंदेंचाही फोन; कोणत्या पक्षात जाणार?; प्रशांत जगतापांनी अखेर सगळं सांगितलं!
काँग्रेसकडून ऑफर, ठाकरे अन् शिंदेंचाही फोन; कोणत्या पक्षात जाणार?; प्रशांत जगतापांनी अखेर सगळं सांगितलं!
Pune Election Shivsena: नीलम गोऱ्हे कमर्शियल पद्धतीने उमेदवारांना तिकीटं देतायत, भाजपच्या सांगण्यानुसार वागतात; पुण्यातील शिवसैनिकांचा गंभीर आरोप
नीलम गोऱ्हे कमर्शियल पद्धतीने उमेदवारांना तिकीटं देतायत, भाजपच्या सांगण्यानुसार वागतात; पुण्यातील शिवसैनिकांचा गंभीर आरोप
Prashant Jagtap: 27 वर्ष शरद पवारांसोबत एकनिष्ठ राहिले, पण तत्त्वांशी तडजोड करण्याची वेळ येताच राजीनामा टाकला, कांँग्रेस-ठाकरे गटाकडून ऑफर, कोण आहेत प्रशांत जगताप?
27 वर्ष शरद पवारांसोबत एकनिष्ठ राहिले, पण तत्त्वांशी तडजोड करण्याची वेळ येताच राजीनामा टाकला, कांँग्रेस-ठाकरे गटाकडून ऑफर, कोण आहेत प्रशांत जगताप?
Bharat Gogawale Son Vikas Gogawale Raigad News मोठी बातमी: मंत्री गोगावलेंचा पुत्र 24 दिवसांपासून पोलिसांना सापडेना, विकास गोगावलेंचा अटकपूर्व जामीनही फेटाळला, नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी: मंत्री गोगावलेंचा पुत्र 24 दिवसांपासून पोलिसांना सापडेना, विकास गोगावलेंचा अटकपूर्व जामीनही फेटाळला, नेमकं प्रकरण काय?
Raigad Crime: खोपोलीत शिंदे गटाच्या नगरसेविका मानसी काळोखेंच्या पतीला हल्लेखोरांनी संपवलं, मुलाला शाळेत सोडून परत येताना घात झाला
खोपोलीत शिंदे गटाच्या नगरसेविका मानसी काळोखेंच्या पतीला हल्लेखोरांनी संपवलं, मुलाला शाळेत सोडून परत येताना घात झाला
Sharad Pawar NCP Probable Candidate List BMC Election 2026: शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मुंबईतील संभाव्य उमेदवारांची पहिली यादी समोर, कोणाकोणाला संधी?
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मुंबईतील संभाव्य उमेदवारांची पहिली यादी समोर, कोणाकोणाला संधी?
Jaykumar Gore: 'काय होता तू काय झाला तू, शकुनी मामा बरबाद झाला तू,' जयकुमार गोरे रामराजेंवर तुटून पडले
'काय होता तू काय झाला तू, शकुनी मामा बरबाद झाला तू,' जयकुमार गोरे रामराजेंवर तुटून पडले
Embed widget