Video: आम्ही काय रस्त्यावर पडलोय का, कुणीही उठणार कॅरेक्टरवर बोलणार? चित्रा वाघ सुषमा अंधारेंवर संतापल्या
सुषमा अंधारेंच्या ट्विटवर बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, जर आमच्यावर कोणी बोलणार असेल तर त्याला आम्ही देखील तसंच उत्तर देणार असल्याचे चित्रा वाघ यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले.

मुंबई : दिशा सालियन मृत्यूप्रकरणावरुन विधिमंडळ सभागृहात चांगलाच गदारोळ पाहायला मिळाला. विधानपरिषेदत शिवसेना उबाठा पक्षाचे आमदार अनिल परब यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला, भाजप नेते किरीट सोमय्या आणि आमदार चित्रा वाघ (Chitra wagh) यांचे नाव घेऊन मंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली. दिशा सालियन प्रकरण हे जाणीवपूर्वक ठाकरेंना बदनाम करण्याचा घाट असल्याचे महाविकास आघाडीतील आमदारांनी म्हटलं आहे. सभागृहात चित्रा वाघ आणि अनिल परब यांच्यातील वाद सोशल मीडियात चित्रा वाघ विरुद्ध सुषमा अंधारे यांच्यापर्यंत पोहोचला. तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते मी.. असे चित्रा वाघ यांनी म्हटलं होतं. त्यावर, आकडा कमीच सांगितलं असं लोकं म्हणतात, असं ट्विट सुषमा अंधारे (Sushma andhare) यांनी केलं होतं. त्यानंतर, वाघ यांनीही ट्विट करुन सुषमा अंधारेंवर जोरदार हल्लाबोल केला. त्यामुळे, सुषमा अंधारे आणि चित्रा वाघ यांच्यात चांगलीच जुंपली आहे.
सुषमा अंधारेंच्या ट्विटवर बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, जर आमच्यावर कोणी बोलणार असेल तर त्याला आम्ही देखील तसंच उत्तर देणार असल्याचे चित्रा वाघ यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले. कोणाच्या मुलाबाळावर बोलणं मलाच आवडत नाही, पण जर तुम्ही दहा वेळेस आमच्या कॅरेक्टरवर बोलत असाल तर त्याचं उत्तर आम्ही देणार. हम किसीको छेडते नही, पर अगर किसीने छेडा तो छोडते भी नही.. असे म्हणत चित्रा वाघ यांनी सभागृहातील घटनेवर आणि त्यानंतर सुषमा अंधारे यांच्याकडून करण्यात आलेल्या टीकेवर प्रतिक्रिया दिली आहे.
आम्ही काय रस्त्यावर पडलोय का?
घाबरत तर मी कोणाच्या बापाला नाही. पण ज्या पद्धतीने माझ्यावर टीका केली जातेय, किती वेळा माझ्या कॅरेक्टरवर बोलणार? या अगोदरचे बोलून बोलून थकले आता हे नवीन आलंय, असे म्हणत चित्रा वाघ यांनी सुषमा अंधारेंना लक्ष्य केलं. मी तर एकच प्रश्न विचारला, तेही तो माणूस पत्रकार परिषद घेऊन सांगतो हे करा आणि ते करा. कुणाच्या लेकरावर बोलायला मलाही त्रास होतो ओ.. पण आम्ही काय रस्त्यावर पडलोय का, असा सवाल चित्रा वाघ यांनी नाव न घेता सुषमा अंधारे यांना विचारला. तुम्ही जेव्हा उठणार तेव्हा आमच्या कॅरेक्टवर बोलणार, मी माझी भूमिका मांडली, त्यात ह्या बाईचं काय होतं का, असा सवालही वाघ यांनी उपस्थित केला.
मला हाच प्रश्न आहे, माझ्या कॅरेक्टरवर कोणी आणि किती वर्षे बोलणार? त्यामुळे मी एकच प्रश्न विचारला तेव्हा मिर्ची का लागली. म्हणजे तुम्हाला इज्जत आहे, आम्ही काय रस्त्यावर पडलोय. मी जो प्रश्न विचारला त्यावेळी मलाही त्रास झाला, कारण कोणाच्या लेकरावर बोलणं योग्य नाही, मी पण आई आहे. पण, आईनेही समजलं पाहिजे, मी किती दिवस संयम ठेवायचा असे म्हणत चित्रा वाघ यांनी सुषमा अंधारेंना लक्ष्य केलं.
विधानसभा अध्यक्षांच्या दालनात पोहोचला विषय
दरम्यान, विधानपरिषद सभागृहात शिवसेना आमदार अनिल परब व भाजप आमदार चित्रा वाघ यांच्यातील वादानंतर आज विधानसभा अध्यक्षांच्या दालनात या दोन्ही नेत्यांची बैठक झाली. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात ही बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते, तसेच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांचीही उपस्थिती होती.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

