BLOG | डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवले तरी प्रॉब्लेम आणि उघडे ठेवले तरी प्रॉब्लेम
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक लोकल डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद केले आहेत. त्यामुळे अनेकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. मात्र सध्यांच्या वैद्यकीय आणीबाणीच्या परिस्थितीत सर्व डॉक्टर्सनी सुरक्षित राहणे गरजेचं आहे. कोणत्याही क्षणी जास्तीत जास्त डॉक्टरांची गरज लागू शकते. मात्र अशा वेळी सामान्य रुग्णांचा विचार होणेही तितकच गरजेचं आहे.
>> संतोष आंधळे, माय मेडिकल मंत्रा
कसं जगायचं? हा प्रश्न ढोबळमानाने घेतला तर सर्वसाधारण लोकांना आजारी पडल्यावर पडत असतो, त्यावर आपले डॉक्टर्स उपचार करून रुग्णांना बरे करत असतात. मात्र आज डॉक्टर्सना स्वतःलाच कसं जगायचं हा प्रश्न पडला आहे. प्रशासन एका बाजूला क्लिनिक (ओपीडी) सुरु ठेवण्याचा आग्रह करत आहे. मात्र डॉक्टर्स या अशा प्रकारामुळे संसर्गाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता व्यक्त करत आहे. जर सगळ्या प्रकारात डॉक्टर्सना जर या विषाणूचा संसर्ग झाला, तर फार मोठं नुकसान होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहेत. अशा अवघड परिस्थितीत सुवर्णमध्य काढण्याची गरज आहे.
पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेन्ट (पीपीई), सॅनिटायझर आणि मास्क हा सध्या कळीचा मुद्दा बनला आहे. सर्वच डॉक्टर्स या मुद्द्याभोवती चर्चा करताना आढळत आहेत. तर काही डॉक्टर्स सांगताहेत की, काही जण छोट्या आजारांकरता 'ओपीडी' ला भेट देत आहेत. ही परिस्थिती फार अवघड आहे. अनेकवेळा क्लिनिक चालवण्याकरता लागणारा सपोर्ट स्टाफ कामावर यायला तयार नाही. मग क्लिनिक चालवायचे तरी कसे? पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेन्ट मिळत नाही, मग काम कसं करायचं, असा प्रश्न डॉक्टरांना पडला आहे.
काही दिवसापूर्वीच कोरोनाशी युद्ध लढणाऱ्या डॉक्टरांची गणना योद्धे म्हणून करण्यात आली होती. त्यांना संपूर्ण भारताने टाळ्या-थाळ्या वाजवून अभिवादन केलं होतं. मग अचानक ही परिस्थिती का उद्भवली असेल, याचा विचार वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी आणि सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वानीच करायला हवा. डॉक्टरांवर जबरदस्ती करून चालणार नाही. त्यांना आपल्याला विश्वासात घेऊन त्यांचं मनोबल कसं वाढेल याचा विचार केला गेला पाहिजे. आज कोणत्याही डॉक्टरला क्लिनिक बंद करायला आवडत नाही. पण त्याच्यामागे काही शास्त्रीय कारणं आहेत. त्यावर आपण सगळ्यांनी मिळून चर्चा केली पाहिजे. आरोग्य व्यवस्था ढासाळवी, अशी कुणाचीच इच्छा नाही.
दिवसभर ज्या काही डॉक्टरांसोबत चर्चा झाल्या, काही डॉक्टरांनी सामाजिक माध्यमावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्याच्यातील एक महत्वाचा मुद्दा असा की, कोरोनाचं एकंदर जगातील भयावह रूप पाहता आपल्याकडे येणारा काळ कठीण आहे. त्याकरिता आपली आरोग्य व्यवस्थेतील लोकांचा वापर जपून केला पाहिजे. नाहीतर ज्या वेळी आपल्याला खरंच डॉक्टर्सची गरज असेल तेव्हा आपले डॉक्टर्सच आजारी असायचे. याक्षणी जर आपले डॉक्टर्स निंयमित तपासणी करत बसले तर या विषाणूंचा प्रादुर्भाव डॉक्टर्सना झाला तर भविष्यातील परिस्तिथी गंभीर होऊ शकते.
यापूर्वीच, नियमित रुग्ण कोरोना नाही, असे सोडून सर्व रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून,महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने राज्यातील सर्व अॅलोपॅथ डॉक्टर्सना रुग्णांना फोन वरून कंसल्टेशन करण्यास मुभा दिली आहे. तसेच डॉक्टर्स त्यांना मोबाईलवरच प्रिस्क्रिप्शन देऊन रुग्णानांसोबत संवादही साधू शकणार आहे. या निर्णयामुळे ज्या रुग्णांना नियमित तपासणीकरता त्यांच्या ठरलेल्या डॉक्टर्सकडे जावे लागायचं, त्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. अनेक वेळा इमर्जन्सी असल्यास डॉक्टर्स उपचार नाकारत नाही, हे सुद्धा आपण विचारात घेतलं पाहिजे. मात्र याकरिता रुग्णाला हॉस्पिटलमधील अपघात विभागात पोहचणं गरजेचं आहे.
तसेच डॉक्टर्सच्या बाजूप्रमाणेच सर्वसामान्य जनतेचा मुद्दा डॉक्टर्सनी समजून घेतला पाहिजे. लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते जर दवाखाने उघडे ठेवावे ही मागणी करत असतील तर ते तुमच्या विरोधात अजिबात नाही आहेत. उलट तुमची सेवा मिळत राहावी हाच त्यामागे एक उद्धेश आहे. शहरी भागात फोन वरून कन्सल्टेशन ठीक आहे, मात्र आजही अनेक ग्रामीण भागात अशा पद्धतीने डॉक्टर्सबरोबर सवांद साधणे शक्य नाही, हे वास्तव सगळ्यांनी ओळखले पाहिजे. काही रुग्ण ज्यांना नियमित डॉकटर्सकडे तपासणीकरता जावे लागते अशा रुग्णांचे हाल यामध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही . यामध्ये, मधुमेह, उच्च रक्तदाब, दमा, पोटविकार, अवयव प्रत्यारोपानंतरचे रुग्ण, किडनी आणि लिव्हरशी निगडित आदी. आजारांकरता बहुतांश लोकांना डॉक्टर्सकडे जावेच लागते.
दोन्ही बाजू म्हणजे, 'डॉक्टर्सच्या व्यथा आणि जनतेच्या कथा' यांचा सारासार विचार करून शासनाने यातून मार्ग काढले पाहिजे. कारण कोरोनावर आलेले संकट हे जागतिक संकट आहे अशावेळी आपण सर्वांनी एकजुटीने याचा मुकाबला करणं गरजेचे आहे. कोणत्याही डॉक्टर्सला विनाकारण उपचार नाकारायला आवडत नाही. त्याचप्रमाणे कोणताही रुग्ण टाईमपास करण्याकरता डॉक्टर्सकडे जात नसतो. ही वेळ भांडायची नाही आहे, सर्वांनी एकदिलाने काम करण्याची ही वेळ असून शासन नक्कीच मार्ग शोधून काढेल यावर माझा ठाम विश्वास आहे. डॉक्टर्स मंडळींनी निराश होऊ नये, तुम्ही सुशिक्षित आणि जाणते आहात. तुम्ही या सर्व प्रकारावर कसा तोडगा काढू शकता या सूचना डॉक्टर्स संघटेनच्या माध्यमातून शासनपर्यंत पोचवू शकता. शासन कायम डॉक्टर्सच्या मागे ताकदीने ऊभं राहत आलं आहे . काही दिवसापूर्वी मालेगाव येथील वैद्यकीय अधिकाऱ्यास धक्काबुक्की झाल्याची बातमी प्रसारित झाली होती, या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन राज्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, डॉक्टर्सवरील हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत, असं सांगत सज्जड दम भरला होता.>> या ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मतं लेखकाची वैयक्तिक मतं आहेत. लेखक संतोष आंधळे हे माय मेडिकल मंत्राचे वरिष्ठ संपादक आहेत.
संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग