Devendra Fadnavis : कुंभमेळ्याच्या तयारीसाठी फडणवीस सरसावले, मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच नाशिकमध्ये येणार
Devendra Fadnavis : नाशिकच्या पालकमंत्रिपदाची अद्याप घोषणा झालेली नसल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) रविवारी (दि. २३) नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते आगामी सिंहस्थ कुंभमेळा (Kumbh Mela 2027) तयारीसंदर्भात आढावा बैठक घेणार असून, काही ठिकाणांना भेटी देण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून अद्यापपर्यंत दौऱ्याची सविस्तर माहिती प्राप्त झाली नसली तरी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.
नाशिकमध्ये (Nashik News) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (दि.२३) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी सिंहस्थ आढावा बैठक बोलविली आहे. राज्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच नाशिकमध्ये सिंहस्थ तयारीचा आढावा घेणार आहेत. त्यामुळे दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत घेतल्या दोन बैठका
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई (Mumbai) येथे सिंहस्थ तयारीबाबत दोन बैठका घेतल्या. त्यामध्ये कुंभमेळ्याच्या नियोजनासह गर्दी नियोजन, भाविकांची सुरक्षितता, गोदावरीचे शुद्धीकरण, नाशिक व त्र्यंबकेश्वरला जोडणाऱ्या रस्त्यांचे मजबुतीकरण, आपत्ती व्यवस्थापन आदी बाबींवर सूक्ष्म नियोजन करावे, तसेच साधुग्रामसाठी भूसंपादनाबरोबरच नाशिक व त्र्यंबकेश्वरमधील अतिक्रमणे काढण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत.
फडणवीस घेणार आतापर्यंत झालेल्या कार्यवाहीचा आढावा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिक दौऱ्यात यासर्व बाबींच्या अनुषंगाने आतापर्यंत झालेल्या कार्यवाहीचा आढावा घेतील. तसेच, रामकुंड, त्र्यंबकेश्वर अशा काही ठिकाणी भेट देऊन पाहणी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे महसूल, मनपा, पोलीस, त्र्यंबकेश्वर नगरपालिकेसह संबंधित यंत्रणांनी तयारी सुरू केली आहे.
कुंभमेळा प्राधिकरण तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
दरम्यान, 2027 मध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काही दिवसांपूर्वी मुंबईत आढावा बैठक झाली होती. यात सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी वेगळे कुंभमेळा प्राधिकरण निर्माण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. तसेच हा सिंहस्थ कुंभ ‘डिजिटल टेक्नॉलॉजी कुंभ’ म्हणून ओळखला जावा, यासाठीचे नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले होते. सिंहस्थसाठी नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे मुंबई, जव्हार, गुजरात, छत्रपती संभाजी नगर, शिर्डी, धुळे, पुणे, मुंबई अशा मार्गाने भाविक येण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने त्या मार्गातील रस्त्यांचे बळकटीकरण करावे. त्या रस्त्यांवर वाहनतळांची सुविधा निर्माण करावी. कुंभ काळात नाशिक शहरात वाहने सोडण्यात येऊ नये. भाविकांसाठी वाहनतळ ते शहरात प्रवासासाठी ई बसचा पर्याय उपलब्ध करून द्यावा. तसेच या ई बस प्रत्येक तीन मिनिटांना सुटतील असे नियोजन करावे. नाशिक शहरात हेलिपॅड उभारता येतील का? याचा विचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.
आणखी वाचा
अधिकारी अन् कर्मचारी रिल्स टाकतात, काम भासवतात; विधानसभेत 'लक्ष्य'वेधी, मुख्यमंत्र्यांनी दिलं उत्तर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

