CBSE Pattern in SSC Board : 'पॅटर्न' बदलणार, सीबीएसई येणार ; अभ्यासक्रमाच कोणते बदल होणार?
मुंबई : राज्यातील राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांना सीबीएसई (CBSE) अभ्यासक्रम लागू करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच स्टेट बोर्ड शाळेतील (School) विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात सीबीएससी पॅटर्न लागू करण्यात येत आहे. शैक्षणिक वर्ष 2025-2026 या वर्षापासून सीबीएससी पॅटर्न लागू होणार असून यंदाच्यावर्षी केवळ इयत्ता पहिलासाठी हा पॅटर्न लागू होणार आहे. त्यामुळे, पहिल्या फेजमध्ये शिक्षण विभागाकडून केवळ पहिलीच्या वर्गासाठी सीबीएससी पॅटर्न लागू होणार असून पुढच्या वर्षी दोन टप्प्यात दुसरी आणि तिसरी, चौथीसाठी लागू करण्यात येईल. राज्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीस लागावी या हेतूने सरकारने हा निर्णय घेतला आहे. राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे (Dada bhuse) यांनी यासंदर्भात माहिती दिली. तसेच, सीबीएससी पॅटर्न लागू केल्याने शाळांमध्ये कुठलीही फी वाढ होणार नाही, असेही दादा भुसे यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत झालेल्या बैठकीनंतर राज्यात सीबीएससी पॅटर्न लागू करण्यासंदर्भात आढावा सुरू असल्याचे दादा भुसे यांनी यापूर्वीच म्हटले होते. त्यानुसार, यंदाच्या वर्षीपासूनच कामकाज सुरू झाल्याची माहिती मंत्री महोदयांनी पत्रकारांशी बोलताना दिली.























