Sanjay Raut : फडणवीसांनी कुदळ-फावडे घेऊन कबर तोडायला जावं, पत्रबाजीची नाटकं बंद करा; संजय राऊतांनी ललकारलं
Sanjay Raut : औरंगजेबाच्या कबरीवरून खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय.

Sanjay Raut : मुघल शासक औरंगजेबाची कबर (Aurangzeb Tomb) महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे आहे. ही कबर नष्ट करण्यात यावी, अशी मागणी केल्या काही दिवसांपासून जोर धरू लागली आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी कबर उखडून टाकण्याची तयारीही केली होती. औरंगजेबाच्या कबरीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यातच नागपूरमध्ये दंगलीची घटना घडली आहे. राज्यात औरंगजेबाची कबर हा मुद्दा केंद्रस्थानी असताना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हा मुद्दा सध्या संयुक्तिक नसल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सुनिल आंबेकर यांनी म्हटलं. तर औरंगजेबाच्या कबरीविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री शेखावत यांना पत्र लिहिले आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपसह (BJP) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केलाय.
संजय राऊत म्हणाले की, औरंगजेबाच्या कबरीचा विषय हा ह्या क्षणी निरर्थक आहे. हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही सांगितले आहे. भाजपच्या नेत्यांनी औरंगजेबाची कबर काढून टाकण्याला त्यांचे समर्थन आहे असे उघडपणे बोलायला हवे. औरंगजेबाची कबर काढून टाकण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारला काही पत्र लिहले असेल असे मला वाटत नाही. केंद्र आणि राज्यात त्यांचेच सरकार आणि पोलीस आहेत. बाबरी पाडताना कुणाची परवानगी घेतली नव्हती. कारसेवेला जाताना फडणवीसांचा फोटो मी पाहिला आहे. त्यांनी तसेच आता बाहेर पडावे. कुदळ-फावडे घेऊन कबर तोडायला गेले पाहिजे, असे त्यांनी म्हटले.
औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचे स्मारक
संजय राऊत पुढे म्हणाले की, केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे भाजपचे सरकार असताना त्यांनी पत्र लिहण्याचे नाटकं बंद केली पाहिजेत. त्यांनी डायरेक्ट निर्णय घेतला पाहिजे. शिवसैनिकांनी अयोध्येतील कलंक जसा नष्ट केला तेव्हाच आम्ही सांगितले की, यापुढे दुसऱ्या मशिदीला आम्ही हात लावणार नाही. ही आमची भूमिका होती. अयोध्येतील राम मंदिराच्या जागेवर आक्रमण झाले होते, ती जागा आमची होती तिथे राम मंदिर व्हावे अशी आमची भूमिका होती. पण सर्वच चर्च आणि मशिदीवर हातोडे घालता येणार नाही. औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचे स्मारक आहे, असे आम्हाला वाटते. ते स्मारक काढायला जर कुणी निघाले असेल तर ते महाराष्ट्राचे क्षत्रू आहेत, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

