BLOG : निराश ... हताश आणि लॉकडाउन
राज्यातील कोरोना कहराने सर्वसामान्य नागरिकांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. या आजरामुळे रुग्णांसोबत, रुग्णांच्या नातेवाईकांचे चांगलेच हाल होत आहेत. काही वेळा रुग्ण रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याची ख्याली-खुशाली कळण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची दमछाक होताना दिसत आहे. आरोग्य व्यवस्थेवर अचानकपणे एवढा ताण आला आहे की त्यांना रुग्णांचे व्यवस्थापन करताना वेळ कमी पडत आहे. प्रत्येक रुग्णाचे नातेवाईक त्याच्या रुग्णाला चांगले उपचार मिळावेत म्हणून मिळेल त्या ठिकाणची ओळख काढून त्या रुग्णांसाठी फोन करत आहे. ग्रामीण भागासोबत आता शहरी भागातील रुग्णालयात आरोग्य व्यवस्थेशी संबंधित अनेक गोष्टींचा तुटवडा पाहायला मिळत आहे. रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्याकरिता धावपळ अंगावर काटा आणणारी आहे. त्यात ऑक्सिजन बेड्स, आयसीयू, रेमडेसिवीर मिळण्याकरिता जी काही कसरत करावी लागते ती निराळीच. प्रत्येक नातेवाईकाचा अनुभव हा वेदनादायी आहे. रुग्ण जिवंत असेपर्यंत रुग्ण जगवण्यासाठी त्याला औषध मिळविण्यासाठी नातेवाईकांची धावपळ तर रुग्ण दगावल्यानंतर त्याच्यावर अंतिमसंस्कार होईपर्यंत रुग्णाच्या नातेवाईकांची फरफट होत आहे. मृतदेह मिळणे, कोरोनाचे नियम पाळून त्यावर अंतिम सोपस्कार करण्यासाठी काही वेळा नातेवाईकांना ताटकळत बसावे लागत आहे. कारण एका दिवसात मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. नागरिकांच्या अनेक ओळखी असून सुद्धा कोरोनाच्या या परिस्थितीपुढे सर्वच हताश आणि हतबल झाले आहेत. मात्र आरोग्य यंत्रणेतील कर्मचारी, डॉक्टर या कोरोना विरोधातील लढाई जोमाने त्याच ताकतीने लढत आहे.
राज्य सरकार आणि प्रशासन यांच्या बैठकीचा सिलसिला सतत सुरु आहे. या आजारावर उपचार करण्यासाठी लागणाऱ्या अधिकच्या सुविधा कशा करता येतील याकरिता स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी बैठका घेता आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, वरिष्ठ सनदी अधिकारी आणि आरोग्य व्यवस्थेचे नियोजन करण्यात आलेल्या टास्क फोर्सच्या सोबत बैठका सुरूच आहे. आरोग्याच्या आणीबाणीच्या उद्भवलेल्या परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा यावर, राज्य पुन्हा एकदा सुरळीत करायचे यावर चर्चा सुरु आहे. कोरोनाचं संकट गडद होत असतानाच दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या आहेत. पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये यामुळे चिंतेचं वातावरण आहे. प्रत्येक व्यक्तीच्या घराघरात कोरोनाला घेऊन बातचीत होत आहे. यामध्येच सरकारने लॉकडाउन करण्याच्या दृष्टीने संकेत दिल्यामुळे आता त्याचा ज्या घटकांवर परिणाम होणार आहे, ते घटकही अस्वस्थ झाले आहे. हातावर पोट भरणारे मजूर पुन्हा एकदा मायदेशी जायचे का येथेच थांबायचं या विवंचनेत आहे. नोकरदार वर्ग जो काम करीत आहे त्याला या लॉकडाउनमुळे घरी बसावे लागले तर त्याला कालावधीतील पगार मिळेल की नाही यांची चिंता सतावत आहे. तळागळतील घटकांचा शासन लॉकडाउन करताना नक्कीच विचार करेल. मात्र लॉकडाउन करताना काहीशी सूट आणि निर्बंध अशा गोष्टी करता येणे शक्य नाही. सर्वसामान्यांना या आजरांपासून संरक्षण हवे असेल तर मानवी साखळी आणि त्याकरिता संपूर्ण लॉकडाउनच्या दिशने पाऊल टाकावे लागेल असे सूतोवाच यापूर्वीच करण्यात आले आहे. प्रत्येकाच्या मनात कोरोनाला घेऊन धास्ती निर्माण झाली आहे. या अशा नकारत्मक वातावरणात नागरिकांच्या नकळत मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहेत. मात्र त्याच्याकडे सर्रासपणे दुर्लक्ष केले जात आहे.
राज्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता आता लॉकडाऊन होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील याबाबत संकेत दिले आहेत. मात्र लॉकडाऊन कसा असेल? काय सुरु, काय बंद असेल? असे प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण झाले असतील. यंदाच्या लॉकडाऊनची दाहकता कमी ठेवण्यावर सरकारचा भर असणार आहे. गेल्या लॉकडाऊनमध्ये राहिलेल्या उणिवा भरून काढण्यावर सरकारचा भर आहे. कोरोनामुळे होणारी जीवितनहानी टाळण्यासाठी लॉकडाऊन गरजेचाच असल्याचा निष्कर्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमवेत झालेल्या बैठकांमघ्ये काढण्यात आला आहे. याप्रकरणी, मुंबई शहराच्या कोरोना मृत्यू विश्लेषण समितीचे अध्यक्ष डॉ अविनाश सुपे सांगतात की " नागरिकांनी हताश न होता आहे ते वास्तव स्वीकारत परिस्थितीशी मुकाबला केला पाहिजे. नागरिकांनी कोरोनाच्या अनुषंगाने असणारे सुरक्षिततेचे नियम पाळून आपला वावर ठेवला पाहिजे. लॉकडाउन करताना कडक निर्बंध आणावेच लागतील पण तो करत असताना थोड्याप्रमाणात का होईना अर्थचक्र चालू राहील अशा पद्धतीचा विचार व्हायला हवा. लॉकडाउन करत असताना नागरिकांचे जीवन सुसह्य राहून लॉकडाउनच्या मूळ तत्त्वाचे पालन होईल ही काळजी प्रशासनाला घ्यावी लागेल. लसीकरण मोहीम, अत्यावश्यक सेवा, त्याचप्रमाणे ज्या आस्थापना सोशल डिस्टंसिंगचे पालन करू शकतील यांना त्यातून काही सूट देता येईल का? याचा विचार केला गेला पाहिजे."
11 एप्रिलला राज्याच्या आरोग्य विभागाने कोरोनाच्याअनुषंगाने जी आकडेवारी जाहीर केली होती त्यानुसार एकाच दिवसात, 63 हजार 294 नवीन रुग्णाचे निदान करण्यात आले होते. तर 349 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्याच दिवशी 34 हजार 8 रुग्ण घरी बरे होऊन गेले होते. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असली तरी मृत्यूदर नियंत्रित ठेवण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. मात्र त्याचवेळी रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात जी वाढ झाली आहे ती कमी कशी करता येईल हीच चिंता सध्या प्रशासनाला सतावत आहे. लॉकडाउनच्या बातम्या आल्याने नागरिकांमध्ये पुन्हा एकदा चलबिचल पाहायला मिळत आहे, काही जण किराणा सामान भाजीपाला मोठ्या प्रमाणात घेताना दिसत आहे. ज्या ठिकाणी अंशत लॉकडाउन सुरु झाला आहे त्या नागरिकांनी लॉकडाउनचे सर्व नियम पाळून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करणं अपेक्षित आहे. गेल्या वेळी लॉकडाउन केला होता त्यावेळीची परिस्थिती वेगळी होती. यावेळी आपल्याकडे या आजराच्या विरोधातील लस उपलब्ध आहे. लसीकरणासाठी पात्र असणाऱ्या नागरिकांनी लवकरात लवकर लस घेऊन या आजारांपासून संरक्षण मिळवले पाहिजे.
आजपर्यंत कोरोनाबाबत अनेक लोकांनी विविध भविष्य वर्तवले मात्र त्याचे वर्तन आजतागायत कुणीही सांगू शकलेले नाही. कारण कोरोनाचा आजार आपल्या सर्वांसाठीच नवीन आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेनं तो यावेळी सौम्य आहे. कारण रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असली तर मोठ्या प्रमाणात लक्षणविरहित रुग्ण सापडत आहे. विशेष म्हणजे मृत्यूदर अजूनही नियंत्रित ठेवण्यात आरोग्य यंत्रणेला यश आलेले आहे. या सगळ्या प्रकारात नागरिकांनी संयम राखून योग्य त्या गोष्टी केल्या पाहिजेत. प्रशासन विविध उपाययोजना करत आहे त्याला सहकार्य केले पाहिजे. कोरोनाचे हे संकट काही काळापुरते आहे त्याच्या विरोधात योग्य लढा दिल्यास यश प्राप्त होते हे आपल्याला पहिल्या लाटेच्या वेळी दिसून आले आहे. लॉकडाउन बाबत जो काही निर्णय राज्य सरकार घेईल त्याचा आदर राखत त्याप्रमाणे सगळ्या नागरिकांचे वर्तन असले पाहिजे. आरोग्याच्या सोयी सुविधांचा तुटवडा आहे हे वास्तव कुणी नाकारू शकत नाही मात्र ह्या परिस्थितून बाहेर येण्यासाठी नागरिकांनी आपल्या स्वकीयांना मदत करून त्यांचा भार कसा हलका करता याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे.