(Source: ECI/ABP News/ABP Majha)
MVA Reaction on Sanjay Raut Bail : संजय राऊत तुरुंगाबाहेर पडल्यानंतर ठाकरे गटासह मविआचा जल्लोष
संजय राऊतांना तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ठाकरेंच्या शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. आर्थर रोडहून निघाल्यानंतर राऊतांनी पिकेट रोडच्या हनुमान मंदिरात जाऊन संकटमोचक बजरंगबलीचं दर्शन घेतलं. तिथून निघालेले राऊत प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गणपतीच्या चरणी लीन झाले. बाप्पाच्या दर्शनानंतर त्यांनी शिवाजी पार्कात जाऊन बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळावर अभिवादन केलं. यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते, खासदार विनायक राऊत, उपनेते मिलिंद वैद्य आणि विभागप्रमुख महेश सावंत यांच्यासह शिवसैनिकांची फलटण उपस्थित होती. यावेळी शिवसेनेचं निवडणूक चिन्ह असलेली मशाल राऊतांच्या हाती देण्यात आली. तिथून पुन्हा शिवसैनिकांचा ताफा घेऊन निघालेले राऊत आपल्या भांडुपच्या निवासस्थानी पोहचले. भांडुपच्या फ्रेंड्स कॉलनी परिसरात राऊतांचं जंगी स्वागत करण्यात आलं. राऊत कुटुंबियांसह शिवसैनिकांनीही इथंही जल्लोष केला.