Kim Jong : उत्तर कोरियात पुरामुळं मोठं नुकसान, हुकूमशाह किम जोंग भडकला,30 अधिकाऱ्यांना फासावर लटकवलं
Thirty officers Hanged in North Korea : उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग यानं देशातील पूर परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरलेल्या 30 अधिकाऱ्यांना फासावर लटकवलं आहे.
Thirty officers Hanged in North Korea नवी दिल्ली : उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग पुन्हा एकदा चर्चेत आहे. देशातील पूर परिस्थिती व्यवस्थित हाताळू न शकलेल्या 30 वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यानं फाशीची शिक्षा देऊन संपवलं आहे. पुरामुळं उत्तर कोरियाचं मोठं नुकसान झालं. या नुकसानापासून देशाला वाचवू न शकलेल्या 30 अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली आहे.
पुरामुळं चागांग प्रांतातील अनेक भागांचं नुकसान झालं. त्यामध्ये जवळपास 4 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. दक्षिण कोरियातील वृत्तसंस्था चोसुन टीव्हीच्या रिपोर्टनुसार , अधिकाऱ्यांनी म्हटलं की, ज्यांच्यामुळं या लोकांचा मृत्यू झाला त्यांना कठोर शिक्षा दिली जाणार आहे.
सेंट्रल न्यूज एजन्सी KCNA च्या रिपोर्टनुसार, किम जोंगनं जे आपली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडू शकले नाहीत त्या सर्व व्यक्तींना शिक्षा देण्याचे आदेश दिले होते.गेल्या महिन्यात किम जोंगनं त्याच्या पाक्षातील 20 ते 30 लोकांना देखील मारलं होतं. चागांग प्रांतातील पक्षाचा निलंबित सचिव कांग बोंग हून याला देखील अटक करण्यात आलं आहे.
काही राज्यांमध्ये आणीबाणी
उत्तर कोरियात यंदा आलेल्या पुरामुळं मोठं नुकसान झालं आहे. मुसळधार पाऊस आणि जमीन खचण्याच्या घटनांमुळं 4 हजार लोक मारले गेले आहेत. या पुरामुळं नुकसान झालेल्या भागाची पाहणी स्वत: किम जोंगनं केली आहे. याचे काही व्हिडीओ देखील व्हायरल झाले होते. दरम्यान, काही मिडिया रिपोर्टनुसार लहान मुलं, वयस्कर व्यक्ती, दिव्यांग सैनिकांसह 15 हजार 400 लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवण्यात आलं होतं.
किम जोंगनं पूर स्थितीपूर्वी जशी स्थिती होती ती पूर्वपदावर आणण्यासाठी जवळपास 3 महिन्यांचा वेळ लागणार असल्याचं म्हटलं आहे. उत्तर कोरियाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये आणीबाणी लागू करण्यात आलेली आहे.
यापूर्वीच्या काही बातम्यांनुसार, पुरामुळं उत्तर कोरियात एक हजार ते दीड हजार लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, ती संख्या वाढली आहे. किम जोंग उन यानं याबद्दल शोक व्यक्त केली आहे. किम जोंगनं नंतर पूरग्रस्त भागाची पाहणी केली होती. त्यानंतर खरे आकडे समोर आले होते. किम जोंगनं पुरामुळं नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या त्याला बदनाम करणाऱ्यासाठी दिल्याचं गेल्याचं म्हटलं होतं.
इतर बातम्या :