Ratnagiri Rain : रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस, परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद
मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट सध्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळं या घाटातील दरड खाली कोसळली आहे

Ratnagiri Rain : सध्या रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहेत. या मुसळधार पावसामुळं जिल्ह्यातील नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट सध्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळं या घाटातील दरड खाली कोसळली आहे. हा घाट धोकादायक स्थितीत असल्यानं प्रशासनाने योग्य ती खबदारी घेतली असून, घाट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या घाटाची पाहणी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केली आहे.
विनायक राऊतांनी केली घाटाची पाहाणी
चौपदरीकरणाच्या कामात या घाटातील डोंगर कटाई करण्यात आली होती. झाडांची कटाई केलेला डोंगर आणि या डोंगराला वरील बाजूला भेगा पडल्या आहेत. त्यामुळं हा डोंगर कधीही खाली येऊ शकतो. त्यामुळं कालच्या पावसानंतर परशुराम घाट अजूनही वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. दरम्यान, खासदार विनायक राऊत यांनी या घाटाची पाहाणी केली. ठेकेदाराला ज्या मुदतीत काम पुर्ण करायला सांगितले होते ते केलेले नाही. त्यामुळं डोंगरावरील परशुराम गाव आणि वस्तीतील घरांना धोका निर्माण झाल्याचे राऊत म्हणाले. गावातील रहिवाश्यांना प्रशासनानं योग्य त्या सूचना दिल्या असल्याचे राऊत म्हणाले.
7 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा
रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. तिथे नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. पावसाचा जोर कालच्यापेक्षा कमी असला तरी 7 जुलै पर्यंत मुसळधार पाऊस कोसळेल असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळं जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दुसरीकडं मागील 24 तासात सरासरी 157 मिलिमीटर पाऊस हा जिल्ह्यात पडला आहे. विशेष म्हणजे लांजा तालुक्यात 342 मिलिमीटर पाऊस कोसळला आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भात आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता देखील सांगण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रात 6 आणि 7 जुलै रोजी मुसळधारेचा अंदाज आहे. कोकण आणि गोव्यात देखील पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. कोकणाला पुढील 5 दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
