Prashant Koratkar : कुठे लपला कोरटकर? इंद्रजित सावंत प्रकरणाशी संबंध नसल्याचा दावा करणारे प्रशांत कोरटकर पसार
Indrajit Sawant Threat Audio Call : इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या कॉलमधील आवाज आपला नाही असा दावा करणारे नागपूरचे पत्रकार प्रशांत कोरटकर सध्या गायब आहेत.

कोल्हापूर : इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी आरोपी प्रशांत कोरटकर अजूनही फरार आहे. याप्रकरणात पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. तर दुसरीकडे राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनंही करण्यात आली. पण याचदरम्यान या प्रकरणाशी काहीही संबंध नाही असं म्हणणारे प्रशांत कोरटकर नॉट रिचेबल झाले आहेत.
इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना धमकी देणारा आणि शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा प्रशांत कोरटकर कोण आहे आणि कुठे आहे? याचा शोध तपास यंत्रणांकडून सुरु आहे. पण याच प्रकरणात 'तो मी नव्हेच' असं म्हणणारे नागपूरचे माजी पत्रकार प्रशांत कोरटकर मात्र गेल्या दोन दिवसांपासून नॉट रिचेबल झाले आहेत.
प्रशांत कोरटकर मध्य प्रदेशात?
कोल्हापूर पोलिस गुरुवारी नागपुरात पोहोचले आणि त्यांनी प्रशांत कोरटकरच्या घरी तपास केला. प्रशांत कोरटकरची आम्ही चौकशी करणार , ताब्यात घेणार असं पोलिसांकडून सांगण्यात आलं. पण गायब झालेला कोरटकर मध्य प्रदेशातील बालाघाटला गेल्याची माहिती समोर आली. त्यामुळे पोलिसांचे एक पथक तिकडे गेलं आहे.
धमकी दिली नाही तर मग गायब का?
काही दिवसांपूर्वी छावा सिनेमा प्रदर्शित झाला. याच सिनेमावर बोलताना इतिहास अभ्यासक सावंतांनी ब्राह्मणद्वेशी विचार मांडल्याचा आरोप प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीनं केला होता आणि इंद्रजीत सावंतांना धमकीही दिली. त्याची ऑडिओ क्लिप सावंतांनी सोशल मीडियात पोस्ट केली. ही ऑडिओ क्लिप व्हायरल होताच नागपूरचे माजी पत्रकार प्रशांत कोरटकर माध्यमांसमोर आले. ती धमकी आपण दिली नसल्याचं त्यांनी सांगितलं खरं.
पण गेल्या दोन दिवसांपासून ते गायब का झाले? हा सवाल आहे.
दरम्यान सावंतांना धमकी देणाऱ्या आणि शिवरायांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अटक व्हावी या मागणीसाठी कोल्हापुरात निदर्शन करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला तत्काळ अटक झाली पाहिजे आणि कारवाई झाली पाहिजे अशी मागणी खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी केली.
राज्याचे मंत्री शिवेंद्रराजेंनीही कोरटकरवर कारवाईची मागणी केली आहे. महापुरुषांवर बोलण्याची फॅशन झाली आहे. कोणावर तरी कारवाई होऊन एक उदाहरण झालं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज किंवा सर्व महापुरुष असू देत, यांच्यावर बोललं की कडक कार्यवाही होते हे उदाहरण कोणावर तरी झालं पाहिजे असं शिवेंद्रराजे म्हणाले.
यावेळी नागपुरातही सकल मराठा समाजातर्फे आंदोलन करण्यात आलं. दुसरीकडे आमदार अमोल मिटकरींनी आरोपीच्या अटकेसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं.
इंद्रजित सावंतांना फोनवरुन धमकी देणारा आणि शिवरायांबद्दल आक्षेपार्ह बोलणारा आरोपी नेमका कोण? तो फोन नागपूरच्याच प्रशांत कोरटकरांनी केला होता का? जर नाही तर ते नॉट रिचेबल का झाले? आणि ते कुठे गायब झाले? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित झाले आहेत. या सगळ्या प्रश्नांची उकल पोलीस लवकरच करतील हीच अपेक्षा.
ही बातमी वाचा:























