Champions Trophy : अफगाण फायटरांनी इंग्रजांना लाहोरमध्ये पाणी पाजले; आता ऑस्ट्रेलियाचा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 'गेम' होणार? टीम इंडियाचा सुद्धा सुंठीवाचून खोकला जाणार??
अफगाणिस्तान संघाला उपांत्य फेरीत प्रवेश करायचा असेल, तर त्याला कांगारू संघाचा कोणत्याही परिस्थितीत पराभव करावा लागेल. अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना 28 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

Champions Trophy : एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये इंग्लंडला दणका दिल्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही आता पुन्हा एकदा दणका देत अफगाणिस्तान क्रिकेट संघाने उपांत्य फेरीसाठी आपला दावा पक्का केला आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे आयोजन पाकिस्तान करत आहे. अ गटातून भारतीय संघ आणि न्यूझीलंडने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. तर गट-ब मध्ये प्रकरण गुंतागुंतीचे दिसते. अफगाणिस्तान उपांत्य फेरीपासून एक पाऊल दूर दिसत आहे. तर ऑस्ट्रेलियन संघ सावध न राहिल्यास तो बाद होऊ शकतो.
अफगाणिस्तानने इंग्लंडचा पराभव करून त्यांना बाद केले
ग्रुप-बी मध्ये एक रोमांचक सामना खेळला गेला. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील पहिला आणि सर्वात मोठा अपसेट या सामन्यात पाहायला मिळाला. कमकुवत समजल्या जाणाऱ्या अफगाणिस्तान संघाने इंग्लंडचा 8 धावांनी पराभव केला. या पराभवासह जोस बटलरच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा संघ स्पर्धेबाहेर पडला आहे. अफगाणिस्तानचा संघ अजूनही उपांत्य फेरीच्या शर्यतीत आहे. आता त्याचा पुढचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहे. अफगाणिस्तान संघाला उपांत्य फेरीत प्रवेश करायचा असेल, तर त्याला कांगारू संघाचा कोणत्याही परिस्थितीत पराभव करावा लागेल. अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना 28 फेब्रुवारी रोजी लाहोरमध्ये होणार आहे.
ब गटात उपांत्य फेरीचे समीकरण गुंतागुंतीचे
ब गटात दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाचे सध्या प्रत्येकी 3 गुण आहेत. आफ्रिकन संघ 2.140 च्या चांगल्या नेट रन रेटसह ब गटात अव्वल स्थानावर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाचा निव्वळ रन रेट 0.475 आहे. तिसऱ्या क्रमांकावर अफगाणिस्तान संघ आहे, ज्याने इंग्लंडला पराभूत केले आहे. दोनपैकी एक सामना जिंकून हा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचे 2 गुण आणि निव्वळ धावगती -0.990 आहे. आता ब गटातील हे तीन संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीत राहिले आहेत.
ब गटातील उपांत्य फेरीचे समीकरण कसे आहे ते जाणून घेऊ
- ऑस्ट्रेलियाला आता गटातील शेवटचा सामना अफगाणिस्तानविरुद्ध खेळायचा आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी कांगारू संघाला हा सामना कोणत्याही किंमतीवर जिंकावाच लागेल. हा सामना जिंकल्याने संघाचे 5 गुण होतील आणि ते उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. तसेच आफ्रिकन संघही पात्र ठरेल. तर इंग्लंडनंतर अफगाण संघ बाहेर पडेल.
- अफगाणिस्तान संघाने आणखी एक अपसेट खेचून ऑस्ट्रेलियाला पराभूत केले तर हा संघ उपांत्य फेरीत प्रवेश करेल.
- जर कांगारू संघ अफगाणिस्तानविरुद्ध हरला, तर अशावेळी जर इंग्लंड संघाने दक्षिण आफ्रिकेला मोठ्या फरकाने पराभूत केले तर अफगाणिस्तानसह ऑस्ट्रेलियाचा संघही उपांत्य फेरीत पोहोचेल.
- उपांत्य फेरी गाठण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला फक्त पुढचा सामना जिंकावा लागेल. कराचीमध्ये 1 मार्चला इंग्लंड विरुद्ध हा सामना होणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या























