(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune : पुण्यात तीन दिवसांच्या 'सेक्स तंत्र' कोर्सची जाहिरात व्हायरल, सायबर पोलिसांचा शोध सुरू
Sex Tantra Advertise : नवरात्रीच्या निमित्ताने पुण्यामध्ये तीन दिवसांच्या 'सेक्स तंत्र' कोर्सचे आयोजन करण्यात आल्याची एक जाहिरात व्हायरल होत आहे.
पुणे : शहरात सध्या सोशल मीडियावर शेअर होणाऱ्या एका जाहिरातीची जोरदार चर्चा होत आहे. यंदाच्या नवरात्रीच्या निमित्ताने 'सेक्स तंत्र' (Pune Sex Tantra Advertise) या नावाने तीन दिवसांचा एक कोर्स आयोजित करण्यात आल्याची ही जाहिरात आहे. 1, 2 आणि 3 ऑक्टोबर असे तीन दिवस पुण्यातील कॅम्प भागात हा कोर्स आयोजित करण्यात येणार असल्याचं या जाहिरातीमध्ये सांगण्यात आलं आहे. ही जाहिरात कोणी सोशल मीडियावर पसरवली याचा शोध पुणे सायबर पोलीस घेत आहेत.
काय आहे या जाहिरातीमध्ये?
यंदाच्या नवरात्रीच्या निमित्ताने पुण्यातील कॅम्प परिसरात तीन दिवसांचा सेक्स तंत्र या नावाच्या एका कोर्सचे आयोजन करण्यात आल्याचं या जाहिरातीमध्ये सांगण्यात आलं आहे. या कोर्समधे सहभागी होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीकडून तीन दिवसांसाठी प्रत्येकी 15 हजार रुपये आकारले जाणार आहेत.
'सत्यम शिवम सुंदरम फाउंडेशन' या संस्थेतर्फे या कोर्सचं आयोजन करण्यात आलं असल्याचं या जाहिरातीमध्ये म्हटलं आहे. या जाहिरातीबरोबर एक क्यूआर कोड देखील देण्यात आला असून ज्याद्वारे आयोजकांशी संपर्क साधता येणार आहे.
या कोर्समधे पुढील कोर्स शिकवले जाणार आहेत,
- वैदिक सेक्स तंत्र
-डिव्हाईन फेमिनाईन मस्क्युलाईन एंबॉडीमेंट
-चक्र अॅक्टिव्हेशन
-ओशो मेडिटेशन
पोलिसांचा शोध सुरू
या सेक्स तंत्र कोर्सला पोलिसांनी परवानगी दिली आहे का हे अजून स्पष्ट होऊ शकलेले नाही. दरम्यान, पुणे सायबर पोलिसांनी याची चौकशी सुरु केली आहे. या कोर्सच्या आयोजकांची माहिती पोलीस शोधत आहेत. या जाहिरातीत देण्यात आलेल्या नंबरवरुन आयोजकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत. त्याचबरोबर ही जाहिरात कोणी सोशल मीडियावर पसरवली याचाही सायबर पोलीस शोध घेत आहेत.
हिंदू महासंघाचे आनंद दवे यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, "Sex tantra या नावाने पुण्यात एक गलिच्छ आणि विकृत व्यवसाय करण्याच घाटत आहे. नवरात्री स्पेशल असं नाव या विकृत प्रकरणाला दिल गेलं आहे. हा हिंदूंचा आणि त्यांच्या दैवतांचा अपमान आहे. हे हिंदू महासंघ कदापी सहन करणार नाही. ना आयोजकांचा पत्ता ना नावे, ना होणाऱ्या कार्यक्रमाचा पत्ता किंवा इतर कोणतीही माहिती यामध्ये आहे. यावरूनच हे सर्व फसवं, घाणेरडं आणि एका नवीन विकृत संस्कृतीला जन्म देणारे ठरणार आहे. हिंदू महासंघ हे होऊ देणार नाही."
महत्त्वाच्या बातम्या :