Pune Hit and Run : पुणे पोर्शे कार अपघातातील धनिकपुत्राच्या अडचणी वाढल्या, दिल्लीतील कॉलेजने प्रवेश नाकारला
Pune Hit and Run : पुणे पोर्शे कार अपघातात अनेक खुलासे, गुन्हा लपवण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न या सर्व घटनांनी हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते. त्यानंतर आता या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या अडचणीत वाढ झाल्याची माहिती आहे.
पुणे: पुण्यात कल्याणीनगर (Kalyani Nagar accident Update) येथे झालेल्या पोर्शे कार अपघाताने देश हादरला होता. या घटनेत झालेले अनेक खुलासे, गुन्हा लपवण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न या सर्व घटनांनी हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते. त्यानंतर आता या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या अडचणीत वाढ झाल्याची माहिती आहे. कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला आता ‘बीबीए’ अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यास मोठ्या अडचणी येताना दिसत आहेत. त्याला दिल्लीतील एका शैक्षणिक संस्थेने प्रवेश देण्यास नकार दिला आहे.
कल्याणीनगरमध्ये (Kalyani Nagar accident Update) घडलेल्या या भीषण घटनेनंतर त्याला कोणत्याही शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे. तर मुलाचे शिक्षण बाधित होऊ नये, अशी मागणी त्याच्या वकिलांनी काल( गुरुवारी) बाल न्याय मंडळाकडे केली आहे. त्यावर या मुलाच्या शिक्षणासाठी कोणतीही आडकाठी होऊ नये, अशी भूमिका विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी मांडली.
नेमकं काय घडलं?
कल्याणीनगर (Kalyani Nagar accident Update) अपघात प्रकरणातील अल्पवयीन कार चालकावर प्रौढ म्हणून खटला चालवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या अर्जावर बाल न्याय मंडळात सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी आरोपीच्या वकिलांनी मुलाच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाल्याचे बाल न्याय मंडळासमोर मांडले. हा मुलगा नुकताच बारावी पास झाला आहे. त्याला ‘बीबीए’ ला प्रवेश घ्यायचा आहे. त्यासाठी त्याने दिल्लीतील एका नामांकित शिक्षण संस्थेकडे प्रवेशासाठी अर्ज केला होता. मात्र, या संस्थेने मुलाला प्रवेश देण्यास नकार दिल्याचे त्याच्या वकिलांनी बाल न्याय मंडळाच्या समोर सांगितले आहे.
या सुनावणीवेळी दिल्लीतील शिक्षण संस्थेचे वकील देखील उपस्थित होते. या प्रकारामुळे मुलाचे शिक्षण बाधित होऊ नये, अशी विनंती बचाव पक्षाच्या वकिलांकडून करण्यात आली आहे. त्यावर विशेष सरकारी वकील हिरे यांनी देखील आरोपीच्या शिक्षणावर या घटनेचा परिणाम होऊ नये, मुलाच्या शिक्षणासाठी कोणतीही आडकाठी होऊ नये, अशी भूमिका मांडली. बाल न्याय मंडळाच्या अध्यक्षांनी सरकारच्या वकिलांच्या भूमिकेचं कौतुक केलं. मात्र, बचाव पक्षाने कोणताही लेखी अर्ज केला नसल्याने त्यावर कोणतेही आदेश देण्यात आले नसल्याची माहिती समोर आली आहे.
प्रकरण काय?
कल्याणीनगर (Kalyani Nagar accident Update) येथे 19 मे रोजी पहाटे अडीचच्या सुमारास बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने ‘पोर्श’ कार भरधाव चालवून दुचाकीस्वार सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुण-तरुणींना उडविले होते. त्यामध्ये या तरुण-तरुणीचा जागेवरच मृत्यू झाला होता. मुलाला 15 तासांत जामीन देण्यात होता. यामुळे पोलीस प्रशासनावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.