Pune Crime News : 'माझी झाली नाही तर कोणाचीच होऊ देणार नाही'; म्हणत पुण्यात तरुणीला भररस्त्यात मारहाण
लग्नास नकार दिल्याच्या रागातून 19 वर्षीय तरुणीला रस्त्यात अडवून तिला हाताने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातून समोर आला आहे. पुण्यातील नाना पेठ परिसरात ही घटना घडली आहे.

पुणे : लग्नास नकार दिल्याच्या रागातून 19 वर्षीय (Pune Crime News) तरुणीला रस्त्यात अडवून तिला हाताने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातून समोर आला आहे. पुण्यातील नाना पेठ परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अशा घटनेमुळे पुण्यात मुली सुरक्षित आहेत का?, असा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे.
ही सगळी घटना पाहून तरुणी घाबरली आणि तिने थेट समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. लग्नासाठी मुलगा विचारत होता मात्र मुलीने नकार दिल्याने त्याने हा प्रकार केल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रशांत संजय कांबळे या 20 वर्षीय मुलावर गुन्हा दाखल केल आहे.
आरोपी आणि तक्रारदार मुलगी दोघेही एकमेकांना ओळखत होते. त्यानंतर ओळख वाढत गेली आणि आरोपीने मुलीला थेट लग्नाची मागणी घातली. त्यावेळी मुलीने त्याला लग्नाला नकार दिला होता. याचा राग आरोपीच्या मनात राहिला. या रागातून ही तरुणी नाना पेटेतून जात असताना तिला अडवलं आणि तिचा थेट हात पकडला. तरुणीला कॅम्प चौकात चलण्यास सांगितले असता तिने नकार दिला. यामुळे चिडलेल्या प्रशांत कांबळे याने तरुणीला शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. तसेच तु माझी झाली नाही तर कोणाची होवू देणार नाही, अशी धमकी दिल्याचंही फिर्यादीत नमुद केले आहे.
रागाच्या भारात तरुणीवर हल्ला...
काही दिवसांपूर्वी तरुणी भेटत नसल्याच्या कारणाने संतापलेल्या तरुणाने तरुणीवर हल्ला करत तिचं डोके फोडल्याचा प्रकार पुण्यातून समोर आला होता. यामुळे सगळीकडे खळबळ उडाली होती. एकतर्फी प्रेमातून तरुणीचे डोके फोडले असून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. यात 37 वर्षीय महिला जखमी झाली होती. कोरेगाव पार्कमधील बर्निग घाट परिसरात घडली होती. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी तरुणाला अटक केली होती. संकेत शहाजी म्हस्के असं 26 वर्षीय तरुणाचं नाव होतं. आरोपी संकेत आणि 37 वर्षीय महिला हे एकमेकांचे मित्र होते. दोघेही एकाच परिसरात राहायला होते. काही दिवसांपासून दोघांमध्ये भांडणं सुरू असल्याने महिला संकेत सोबत बोलत नव्हती. याचा राग संकेतच्या मनात होता. त्यामुळे संकेतने हल्ला केल होता.
पुण्यात महिला असुरक्षित?
पुण्यात मागील काही दिवसांपासून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे शिक्षणाच्या माहेरघरात महिलाच असुरक्षित आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दर्शना पवार हत्या प्रकरण आणि त्यानंतर सदाशिव पेठेत भर रस्त्यात प्रेमातून कोयत्याने केलेल्या हल्ल्याने महाराष्ट्र हादरला होता. त्यानंतर महिलांवरील हल्ले आणि या सगळ्या घटना रोखण्यासाठी पुणे पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र घटनांची संख्या कमी होताना दिसत नाही आहे. यातच पुन्हा एकदा हल्ला झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.
इतर महत्वाची बातमी-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
