Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अडचणी वाढल्या, आता बंदुकीचा परवानाही रद्द होण्याची शक्यता, नेमकं काय घडलं?
Manikrao Kokate : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाला नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांचा कारावास आणि 50 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

Manikrao Kokate : मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या सदनिका या बनावट दस्तऐवज तयार करून लाटल्या प्रकरणात कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) व त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांना प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि 50 हजार रुपये दंडाची शिक्षा नाशिक जिल्हा न्यायालयाने गुरुवारी ठोठावली. माणिकराव कोकाटे यांना अवघ्या दोन तासात जामीन देखील मंजूर झाला. मात्र, माणिकराव कोकाटे यांना शिक्षा सुनावताना त्यांच्या बंदुकीच्या परवान्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे. यामुळे माणिकराव कोकाटे हे अडचणीत सापडले असून त्यांचा बंदुकीचा परवाना रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नाशिक शहरातील उच्चभ्रू परिसरात माणिकराव कोकाटे यांनी ३० वर्षांपूर्वी अल्प उत्पन्न गटातून सदनिका मिळवली होती. स्वत:सह भाऊ विजय कोकाटे, पोपट सोनवणे आणि प्रशांत गोवर्धने या चार जणांनी कॅनडा कॉर्नर भागात निर्माण व्ह्यू अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटासाठीच्या सदनिका प्राप्त केल्या होत्या. यानंतर तत्कालीन दिवंगत राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांच्या तक्रारीवरून जिल्हा प्रशासनाने सदनिका वाटपाची चौकशी केली होती. गुरुवारी या प्रकरणात नाशिक जिल्हा न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांच्या भावाला प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि 50 हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली.
बंदुकीचा परवाना रद्द होण्याची शक्यता
माणिकराव कोकाटे यांना शिक्षा सुनावताना त्यांच्या बंदुकीच्या परवानाचे ही निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे. 40 ते 50 कामगारांना दर आठवड्याला सुमारे नऊ हजार रुपये रोख पगार द्यावा लागतो. ही रोकड सुरक्षितपणे हाताळताना संरक्षणासाठी बंदुकीचा परवाना देण्याची मागणी माणिकराव कोकाटे यांनी मागणी केली होती.तेव्हा कोकाटे बंधुंचा ऊस कोपरगाव सहकारी साखर कारखान्यास पुरवला जात होता. आता बंदुकीच्या परवान्यामुळे माणिकराव कोकाटे अडचणीत सापडले आहेत. माणिकराव कोकाटे यांना शिक्षा सुनावल्यानंतर त्यांचा बंदूक परवाना देखील रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शिक्षेला स्थगिती मिळवण्यासाठी माणिकराव कोकाटेंचे प्रयत्न
दरम्यान, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे त्यांना सुनावलेल्या शिक्षेला आज न्यायालयात आव्हान देणार आहेत. कोकाटे यांच्याकडून अपील करण्यासाठी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. कोकाटे यांना अपील करण्यासाठी 30 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या निर्णयाला विरोधात कोकाट सत्र न्यायालयात अर्ज दाखल करणार आहेत. सुनावण्यात आलेल्या शिक्षेला स्थगिती मिळावी, यासाठी कोकाटे यांचे प्रयत्न सुरु आहेत.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

