Pune Medha Kulkarni : भाजपवर असलेली नाराजी दूर झाली का? राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्यावर मेधा कुलकर्णी काय म्हणाल्या?
भाजपकडून मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आज आनंदाचा दिवस आहे. त्यामुळे जुन्या किंवा बाकी कोणत्या गोष्टींवर बोलण्याची आवश्यकता वाटत नसल्याचं त्या म्हणाल्या.
पुणे : भाजपकडून मेधा कुलकर्णी (Medha kulkarni) यांना राज्यसभेसाठी (Rajya Sabha Election) उमेदवारी जाहीर करण्यात आली. मागील काही महिन्यांपासून त्या भाजपवर नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्यांनी पक्षातील नेत्यापेक्षा वेगळ्या भूमिकादेखील घेतल्या होत्या. त्यानंतर आज त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आज आनंदाचा दिवस आहे. त्यामुळे जुन्या किंवा बाकी कोणत्या गोष्टींवर बोलण्याची आवश्यकता वाटत नसल्याचं म्हणत त्यांनी जुन्या नाराजीवर बोलणं पसंत केलं नाही.
मेधा कुलकर्णी नक्की काय म्हणाल्या?
भाजपकडून मेधा कुलकर्णी यांच्यावर अन्याय होत आहे, अशा चर्चा सातत्याने पुढे येत होत्या. त्यानंतर मेधा कुलकर्णींनीदेखील पक्षावर असलेली नाराजी अनेकदा उघडपणे बोलून दाखवली होती. आज राज्यसभेची उमेदवारी देऊन पक्षाकडून झालेला अन्याय दूर झाला का? असं विचारल्याचं मेधा कुलकर्णी यांनी यावर उघडपणे बोलण पसंत केलं नाही. आज आनंदाचा दिवस आहे. त्यामुळे जुन्या किंवा बाकी कोणत्या गोष्टींवर बोलण्याची आवश्यकता वाटत नाही. सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहित आहे. पक्षातील सगळ्या गोष्टी माहित असतानाच पक्षाने हा उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता हे सगळं छान घडलं असताना काही वेगळं आठवण्याची आवश्यकता वाटत नाही. एकत्र येऊन खूप चांगलं काम करु शकतो. हे माहित आहे. पुण्याचा विकास, पक्षाचा विस्तार किंवा बाकी जबाबदाऱ्या असतील, त्या मी पार पाडणार आहे.
मी कधीही पद मागितलं नाही!
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, मी एखादं पद पाहिजे, असं कोणाशी कधी बोलले नाही. या संदर्भात मी पक्षश्रेष्ठी आणि माध्यमांशी कधीही चर्चा केली नाही. मला काम करण्याची संधी हवी असल्याचं मी म्हटलं होतं. माझी मुलं लहान असल्यापासून पक्षाचं काम करते आहे. विचलिच होताना तुम्ही मला पाहिलं नसेल, त्याचं हे फळ आज मला मिळालं आहे.
दिल्लीच्या सभागृहात जाण्याची संधी मिळाली
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मेधा कुलकर्णी यांनी पक्षाचे आभार मानले आहे. त्या म्हणाल्या की, पक्षाने मला ही उमेदवारी दिली आहे. हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे या सगळ्यांचे मी आभार मानते. सगळ्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि राज्यसभेवर काम करण्याची संधी दिली. त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करते. आजपर्यंत गेली अनेक वर्ष पुण्यात लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं. तीन टर्म नगरसेविका म्हणून काम केलं. एक टर्म आमदार म्हणून काम केलं आणि आता राज्यसभेवर काम करताना वेगळा अनुभव मला मिळणार आहे. राष्ट्रीय पातळीवर महिला मोर्चाची उपाध्यक्ष म्हणून काम केलं. ही संधी मिळाल्यामुळे काही प्रमाणात दिल्ली दौरे झाले. देशभर फिरता आलं. काम करता आलं. आता ही दिल्लीच्या सभागृहात जाण्याची संधी मिळाली आहे. तिथे पुण्याचे प्रश्न आणि इतर प्रश्न मांडू शकेन. पक्षाच्या माध्यमातून ज्या जबाबदाऱ्या दिल्या जातील. त्या जबाबदाऱ्या पार पाडेन.
इतर महत्वाच्या बातम्या-
Medha Kulkarni : भाजपवर नाराजी ते भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी; कोण आहेत मेधा कुलकर्णी?