मविआची सत्ता आल्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या दोन वर्षांच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढू : वर्षा गायकवाड
मुंबई : महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना’ निवडणुकीच्या तोंडावर आणली आहे पण लाडका मित्र योजना तर अडीच वर्षांपासून सुरु आहे. धारावी, मुलुंड, वरळी, देवनार, मिठागरांची जागा अशा मुंबईतील सर्व महत्वाच्या व मोक्याच्या जागा या लाडक्या मित्राला दिल्या जात आहेत.

मुंबई : महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना’ निवडणुकीच्या तोंडावर आणली आहे पण लाडका मित्र योजना तर अडीच वर्षांपासून सुरु आहे. धारावी, मुलुंड, वरळी, देवनार, मिठागरांची जागा अशा मुंबईतील सर्व महत्वाच्या व मोक्याच्या जागा या लाडक्या मित्राला दिल्या जात आहेत. महानगर पालिकेतही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरु असून मविआची सत्ता आल्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या दोन वर्षांच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढू, असा इशारा मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी दिला आहे.
महायुतीने काँग्रेसच्या न्याय पत्राची नक्कल केली आहे
महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा ष्णमुखानंद सभागृहात पार पडला, यावेळी वर्षा गायकवाड बोलत होत्या, त्या पुढे म्हणाल्या की, ‘लाडकी बहिण’ योजनेची सध्या चर्चा सुरु आहे पण महिलांसाठी महालक्ष्मी योजना ही सर्वात आधी कर्नाटक व तेलंगणात काँग्रेस सरकारने आणली आहे. लोकसभा निवडणुकीत विजयी होऊन केंद्रात सत्ता आल्यास गरिब महिलांना वर्षाला 1 लाख रुपये म्हणजे महिन्याला 8500 रुपये देण्याचे आश्वासन काँग्रेसने न्याय पत्रात दिले होते. महायुतीने काँग्रेसच्या न्याय पत्राची नक्कल केली आहे. बहिणांचा सन्मान झाला पाहिजे याबाबत दुमत नाही परंतु महायुती सरकार बहिणींना नाही तर मतांसाठी पैसे देत आहे आणि महायुतीला मतदान केले नाही तर हे पैसे परत घेण्याची धमकीही देत आहेत. हा पैसा काही कोणाचा पार्टी फंड नाही, हा पैसा जनतेच्या घामाचा, कष्टाचा व रक्ताचा पैसा आहे, असे वर्षा गायकवाड यांनी ठणकावले.
‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’
लोकसभा निवडणुकीनंतर दिल्लीतील वातावरण बदलले आहे, ढगाळ वातावरण झाले आहे. ‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’, असे चित्र आहे. संसदेत विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षासारखा वाटतो तर सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षासारखे वागत आहे. वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर होऊ शकले नाही ते संयुक्त संसदीय समितीकडे पाठवावे लागले हे 10 वर्षांत पहिल्यांदा घडले आहे. भारतीय जनता पक्षाची ताकद कमी झाल्याने मोदी सरकारचे आता एनडीए सरकार झाले आहे असेही प्रा. वर्षा गायकवाड यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत मुंबईत सहा पैकी पाच जागा मविआने जिंकल्या, एक जागा महायुतीने चोरली. विधानसभा निवडणुकीतही मुंबईसह महाराष्ट्रात इतिहास घडणार आहे, भाजपा युती सरकारचा पराभव करून महाविकास आघाडीचे सरकार येईल, असा विश्वास प्रा. वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला.
या मेळाव्याला राष्ट्रवादी अध्यक्ष खासदार शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार संजय राऊत, एनसीपीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शेकापचे जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री दिवाकर रावते, सुभाष देसाई, आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड, माजी खासदार विनायक राऊत, खासदार प्रियंका चतुर्वेदी, सचिन अहिर यांच्यासह प्रमुख नेते आमदार, खासदार व पदाधिकारी उपस्थित होते.
इतर महत्वाच्या बातम्या
मुख्यमंत्री शिंदे गुन्हा दाखल झालेल्या महंत रामगिरी महाराजांच्या भेटीला, एकाच व्यासपीठावर बसले, चर्चांना उधाण
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
