Thane Crime: ठाण्यात गतीमंद मुलीला वेदना असह्य, आई अन् आजीने गुंगीच्या गोळ्या देऊन मारुन टाकलं, साताऱ्यातील गावी नेऊन अंत्यसंस्कार उरकले
Thane Crime: ठाण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका गतिमंद मुलीचा तिच्या आईने आणि आजीने खून केल्याचा प्रकार जगताप चाळ परिसरात घडला आहे. या घटनेमुळे ठाण्यात खळबळ उडाली आहे.

ठाणे: ठाण्यात एका गतीमंद मुलीचा तिच्या आई आणि आजीने खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाण्यातील जगताप चाळ परिसरात ही घटना घडली. यशस्वी पवार असे मृत मुलीचे नाव असून ती 17 वर्षांची होती. आई आणि आजी तिचा सांभाळ करत होत्या. यशस्वी जन्मत:च अपंग आणि गतीमंद होती. गेल्या काही दिवसांपासून तिला प्रचंड शारीरिक यातना होत होत्या. मुलीच्या या यातना न बघवल्याने तिची आई स्नेहल राजेश पवार (वय 35) आणि आजी सुरेखा महागडे यांनी गुंगीच्या गोळ्या देऊन तिला ठार मारले. त्यानंतर यशस्वीचा मृतदेह गावी नेऊन परस्पर अंत्यसंस्कार उरकले. मात्र, या मुलीची मावस आत्या वर्षा रघुनंदन (वय 42) हिने पोलिसांकडे तक्रार दिल्यामुळे हा सगळा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी नौपाडा पोलिसांनी मुलीची आई स्नेहल राजेश पवार आणि आजी सुरेखा महागडे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आजी सुरेखा महागडे हिला अटक केली आहे. तर मुलीची आई अद्याप फरार आहे. या घटनेमुळे ठाण्यातील जगताप चाळ परिसरातील एकच खळबळ उडाली आहे. (Thane Murder news)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 फेब्रुवारीला स्नेहल पवार आणि सुरेखा महागडे यांनी गुंगीच्या गोळ्या देऊन यशस्वी पवार हिला ठार मारले. यशस्वी पवार ही जन्मापासूनच अपंग आणि गतिमंद होती. तिला 15 फेब्रुवारीपासून प्रचंड शारीरिक यातना होऊ लागल्या होत्या. तिच्या या आजारपणाला कंटाळलेल्या आई आणि आजीने 19 फेब्रुवारीला रात्री तिला झोपेच्या गोळ्या दिल्या. झोपेच्या जास्त गोळ्यांचे सेवन केल्यामुळे यशस्वीचा मृत्यू झाला. यानंतर आई आणि आजीने एका गाडीने तिचा मृतदेह सातारा जिल्ह्यातील परसणी गावात नेला. तिकडे या दोघींनी यशस्वी हिच्यावर अंत्यसंस्कार केले.
सुरुवातीला हा प्रकार कोणाच्याही लक्षात आला नव्हता. मात्र, मुलीच्या मावस आत्याने पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर नौपाडा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक रणभिसे आणि त्यांच्या पथकाने जगताप चाळ येथील घरी जाऊन मुलीच्या आजीची चौकशी केली. त्यावेळी तिने यशस्वीचा खून केल्याची कबुली दिली. सध्या पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. तसेच यशस्वीची फरार आई स्नेहल पवार हिचा शोध घेतला जात आहे.
आणखी वाचा
खळबळजनक! भिवंडीत 22 वर्षीय तरुणीवर आळीपाळीने सामूहिक अत्याचार; सहा आरोपींना 48 तासांत बेड्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

