मुख्यमंत्री शिंदे गुन्हा दाखल झालेल्या महंत रामगिरी महाराजांच्या भेटीला, एकाच व्यासपीठावर बसले, चर्चांना उधाण
CM Eknath Shinde Meets Ramgiri Maharaj : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महंत रामगिरी महाराज यांची गुन्हा दाखल झाल्यानंतर भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.
नाशिक : सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज (Ramgiri Maharaj) यांनी नाशिक येथील सिन्नरच्या पंचाळे गावामध्ये प्रवचनाच्या दरम्यान एका धर्माविषयी वक्तव्य केले होते. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत असून महंत रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेतली असून ते एकाच व्यासपीठावर दिसून आले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
महंत रामगिरी महाराज यांनी नाशिक जिल्ह्यातील सिन्नरच्या पंचाळे गावात प्रवचनाच्या दरम्यान केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने नाशिकसह छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर शहरात तणाव निर्माण झाला होता. गंगागिरी संस्थान गोदावरी धाम मठाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांच्याविरोधात संभाजीनगर आणि अहमदनगरमध्ये आंदोलन करण्यात आलं. नाशिक, वैजापूर, येवल्यात रामगिरी महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेटल्याने चर्चांना उधाण आले आहे.
रामगिरी महाराजांकडून समाजाला दिशा देण्याचं काम
नाशिकच्या सिन्नर तालुक्यात सुरू असणाऱ्या हरिनाम सप्ताहाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन भेट देणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, दर दिवशी लाखो भाविक येथे येतात. आम्हाला सभा घायची असेल तर काय काय करावे लागते. पण इथे लोक स्वतःहून येतात. यावर्षी आषाढीला 25 लाख लोक आले होते. वारकरी संप्रदायाची ताकद गावागावात आहे. त्यांना दिशा देण्याचे काम रामगिरी महाराज करतात. इथे देवाचा वास आहे, म्हणून लोक इथे बसतात. इथे कडक ऊन आहे तरी तुम्ही येथे बसले आहात. ऊन, वारा, पावसाची पर्वा न करता येथे लोक हजर राहतात. आनंद दिघे हा साप्ताह कधी चुकवत नव्हते. देवाच्या नाम समरणात लोक तल्लीन होतात, असे त्यांनी म्हटले.
सरला बेटने हरीनाम सप्ताहाची परंपरा कायम ठेवली
ते पुढे म्हणाले की, हरीनाम सप्ताहात सहभागी झालेले आपण सर्व माझ्यासाठी विठ्ठल आहेत. म्हणून तुमच्या दर्शनासाठी आलो आहे. मी स्वतःला भाग्यवान समजतो, सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा मुख्यमंत्री होतो. यावेळी आषाढी आली तिथली परिस्थिती बघितली. तिथे आठ दिवस आधी गेलो होतो. सर्व सुविधांचा आढावा घेतला. मुख्यमंत्री म्हणून गेलो नाही तर वारकरी म्हणून गेलो होतो. 177 वर्षांपूर्वी अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात झाली. सरला बेटने ही परंपरा कायम ठेवली आहे. रामगिरी महाराज यांचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा
नाशिकमध्ये दोन गटांमध्ये तणाव, छ. संभाजीनगरमधील परिस्थिती निवळली