Amravati News :पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
Amravati News : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे आज भाजप अमरावती शहरात जंगी स्वागत करत प्रविण पोटे पाटील यांनी सुवर्ण मुकुट चढवत भव्य सत्कार केला आहे.

अमरावती: भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असताना चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने(BJP) दैदिप्यमान यश संपादन केले. त्यानंतर पालकमंत्री झाल्यानंतर अमरावतीतील त्यांच्या प्रथम आगमनानिमित्त, तसेच त्यांच्या कार्याचा गौरव आणि सन्मान करण्यासाठी भाजप अमरावती शहर अध्यक्ष प्रविण पोटे पाटील यांनी सुवर्ण मुकुट चढवत भव्य सत्कार करण्यात आला आहे. प्रविण पोटे पाटील यांच्या इर्विन चौकातील जनसंपर्क कार्यालयात हा भव्य स्वागत सोहळा पार पडला. फटाक्यांची आतीषबाजी, फुलांची उधळण करत क्रेनद्वारे हार टाकून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे यावेळी जंगी स्वागत करण्यात आले.
दरम्यान, या दौऱ्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलतांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केलं. यावेळी बोलताना ते म्हणाले की, बीडमध्ये आपसात महायुतीमध्ये आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यात विसंवाद झालेला आहे. तो विसंवाद दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. सुरेश धस यांच्या काही बाबी न्याय मिळावा अशा आहेत. तर मुंडे यांचा म्हणणं आहे की, माझा दोष असेल तर माझी केव्हाही पदावरुन पायउतार होण्याची तयारी आहे. त्यामुळे या दोघांना बसवून यामधला मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न करत असल्याचे ही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
कुणासोबत कोणी राहणं हा काही दोष नाही- चंद्रशेखर बावनकुळे
नावदेव शास्त्री महाराज यांच्यावर बावनकुळे म्हणाले की, धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे की माझा एक टक्का जरी दोष असेल तर मी पक्ष सांगेल ते करायला तयार आहे. त्यात जर खरंच त्यांचा दोष असेल तर तो दाखवला पाहिजेल, असे ही ते म्हणाले. या केसमध्ये चार्टशीट दाखल होत नाही, तोपर्यंत काहीच करता येणार नाही. परिचित असणं काही गुन्हा नाही. कुणासोबत कोणी राहणं हे काही दोष नाही. असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
चंद्रशेखर बावनकुळे यांची रवी राणा यांच्या निवासस्थानी भेट
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री झाल्यानंतर प्रथमच आज (31 जानेवारीला)अमरावतीत दाखल झाले. यावेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. बावनकुळे यांनी आधी मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी विदर्भाची कुलस्वामिनी श्री अंबादेवी मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळचे अध्यक्ष पदमश्री प्रभाकरराव वैद्य यांच्या घरी जाऊन भेट घेतली. त्यानंतर त्यांनी आमदार रवी राणा यांच्या निवासस्थानी जात भेट ही घेतली.
दरम्यान या दौऱ्यात चंद्रशेखर बावनकुळे हे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा विकास आराखड्याबाबत आढावा बैठक घेतील. दुपारच्या सुमारास ते विभागीय आयुक्त यांचे सादरीकरण आणि आढावा घेतील. तर त्यानंतर ते नोंदणी उपमहानिरीक्षक यांचे सादरीकरण आणि आढावा घेतील. तर सायंकाळी बावनकुळे हे भूमी अभिलेख उपसंचालक यांचे सादरीकरण आणि आढावा घेतील. दरम्यान, सायंकाळी 6.30 ते 8 वाजेपर्यंत विश्रामगृह येथे भाजप पदाधिकारी कोअर ग्रुप बैठक आटपून रात्री 8 वाजता गृहभेटी आणि त्यानंतर रात्री 10 वाजता अमरावती येथून नागपूरकडे प्रस्थान करतील. अशी माहिती पुढे आली आहे.
हे ही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
