(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Navi Mumbai News : नवी मुंबईत एक वर्षात 371 मुलं घर सोडून पळाली; पोलिसांकडून शाळांमध्ये करण्यात येणार समुपदेशन
Child Missing Case In Navi Mumbai : मुलं हरवण्याचे प्रमाण वाढत असले तरी अपहरणाची एकही घटना घडली नसल्याची बाब समोर आली आहे. मुले हरवण्यामागे अपहरणाच्या घटना नसल्याने पालकांनी चिंता करू नये, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
Navi Mumbai : गेल्या तीन दिवसात नवी मुंबईतून (Navi Mumbai News) 11 अल्पवयीन मुलं हरवल्याच्या घटना समोर आल्या होत्या. या घटनांनी पालक वर्गात चिंतेचे वातावरण आहे. यातील 9 मुलं- मुली परत आली. तर, दोन मुलींचा शोध पोलीस घेत आहेत. वर्षभरात नवी मुंबई, पनवेलमधून (Panvel) 371 मुलांनी आपलं घर सोडून गेल्याची नोंद पोलिसांमध्ये आहे. यातील 326 मुलांना शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे. मुलं हरवण्याचे प्रमाण वाढत असले तरी अपहरणाची एकही घटना घडली नसल्याची बाब समोर आली आहे. मुले हरवण्यामागे अपहरणाच्या घटना नसल्याने पालकांनी चिंता करू नये, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
मुलं घर सोडून का जातात?
मुले हरवत असल्याच्या घटना समोर येत असल्या तरी तरी अपहरणाचा एकही प्रकार नसल्याने पालक वर्गाने चिंता करायची गरज नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. जी मुलं हरवली झाली होती. त्या मागे घरगुती कारणे असल्याचे निष्पन्न झाले आहेत. त्यानंतरचे सर्वाधिक कारण हे प्रेमसंबंध असल्याचे सांगण्यात येत आहे.
त्याशिवाय, पालकाने रागावणे, मोबाईल न देणे, शाळेत फुटबॅाल प्रशिक्षणाची फी न भरणे आदी क्षुल्लक कारणांमुळे मुलं घर सोडून जात आहेत. यामुळे आता नवी मुंबई पोलिसांकडून मुलांचं आणि पालकांचे समुपदेशन करण्याचे ठरवले आहे. यासाठी शहरातील शाळा, कॉलेजमध्ये समुपदेशन शिबीर राबविण्यात येणार असल्याचे नवी मुंबईचे सहाय्यक पोलीस आयुक्त गजानन राठोड यांनी सांगितले.
आठपैकी सहाजण सापडले, दोघे अजून बेपत्ता
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात एकाच दिवशी अपहरणाचे सात गुन्हे दाखल झाले. त्यानंतर संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागली. सात जणांपैकी सहा मुंलांचा शोध लागला, मात्र अद्याप दोघांचा शोध सुरू आहे. बेपत्ता झालेली सर्व मुलं अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली. कोपरखैरणे पोलीस ठाणे अंतर्गत मिसिंग झालेला 12 वर्षांचा मुलगा प्रज्वल पाटील ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात आढळून आला. याच भागातून मिसिंग झालेला आयान खानसुद्धा सापडला. तर रबाळे पोलीस ठाणे अंतर्गत गुन्हा नोंद प्रकरणातील 13 वर्षाची मुलगी अनुष्का राजभर ऐरोली परिसरात आढळून आली. कामोठे परिसरातून गायब झालेली अंतरा विचारे हिचा मोबाईलद्वारे तपास केला असता ती गुजरातमध्ये असल्याची माहिती मिळाली, पोलिसांनी तात्काळ पथक पाठवून तिला ताब्यात घेतलं. तर, कळंबोली येथील आरती वाल्मिकी आणि दिव्या गुप्ता या दोघी जीवदानी मंदीरात गेल्या होत्या. दरम्यान, रबाळे आणि पनवेल येथून मिसिंग असलेल्या दोन मुलींचा तपास सध्या सुरू आहे.