Nashik News : नाशिकमधील चिमुकलीनं गिळलं एक रुपयांचं नाणं, कुटुंबीयांकडून आर्थिक मदतीची याचना, आमदार सीमा हिरे धावल्या मदतीला
Seema Hiray : नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे यांनी मुलीच्या उपचाराची जबाबदारी घेतली.
नाशिक : सिडको परिसरात राहणाऱ्या सहा वर्षीय मुलीने दोन दिवसापूर्वी एक रुपयाचे नाणे गिळले. मुलीच्या आई-वडिलांनी तात्काळ खासगी दवाखान्यात मुलीला उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी मोठा खर्च शस्त्रक्रियेसाठी सांगितला. त्यामुळे मुलीवर उपचार न करता आई-वडील माघारी परतले होते. मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबाने मदतीचे आवाहन केले होते. या आव्हानाला प्रतिसाद देत नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे (Seema Hiray) यांनी मुलीच्या उपचाराची जबाबदारी घेतली आहे. मुलीच्या पोटातील नाणे बाहेर काढण्यासाठी डॉक्टरांचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, सिडकोतील शुभम पार्क अपार्टमेंटमध्ये राहणारी सहा वर्षीय दिया ही आई पाणी भरत असताना खेळत होती. या दरम्यान तिने अचानक एक रुपयाचे नाणे गिळले. काही वेळाने तिला उलट्या सुरू झाल्या. आईने विचारपूस केल्यावर तिने कॉइन गिळल्याचे सांगितले.
कुटुंबीयांकडून आर्थिक मदतीची याचना
वडील कामावर असल्याने शेजाऱ्यांनी मदत करत तिला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात नेले. एक्स-रेमध्ये तिच्या पोटात नाणे असल्याचे स्पष्ट झाले. डॉक्टरांनी नाणे काढण्यासाठी अव्वाच्या सव्वा रुपयांचा खर्च येईल असे सांगितले. हातावर पोट असणाऱ्या कुटुंबासाठी ही रक्कम अशक्यप्राय होती. निराश होऊन कुटुंबीयांना तिला घरी आणावे लागले. सध्या घरगुती उपचार सुरू असले तरी मुलीची प्रकृती चिंताजनक आहे. कुटुंबीयांनी समाजाकडून आर्थिक मदतीची याचना केली होती.
डॉक्टरांचे शर्तीचे प्रयत्न सुरू
या आवाहनाला प्रतिसाद देत नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे यांनी मुलीच्या उपचाराची जबाबदारी घेतली. काल रात्री उशिरा मुलीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी नाणे बाहेर काढण्यासाठी शस्त्रक्रियेची गरज पडणार नाही. नाणे शस्त्रक्रियेविना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती दिली. सध्या या मुलीवर सिडकोतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून डॉक्टरांच्या निगराणीत औषधोपचाराने मुलीच्या पोटातील नाणे बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या