Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
रिक्षाचालक भजनसिंग राणा यांनी सैफ अली खानला आपल्या रिक्षातून रुग्णालयात नेलं. साधारण मध्यरात्री अडीच ते 3 वाजताची वेळ असेल, असं ते म्हणाले.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर (Saif ali khan) घरात घुसून चोरट्याकडून धारदार शस्त्राने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. या घटनेनं बॉलिवूड विश्वात खळबळ उडाली तर मुंबईतील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं. सत्ताधाऱ्यांनी याप्रकरणी पोलिसांकडून कारवाई सुरू असून पोलीस व गुन्हे शाखेची पथके आरोपीचा शोध घेतल्याचं सांगण्यात आलं. तसेच, विविध अँगलने या घटनेचा तपास होत असल्याच पोलिसांनी सांगितलं. मात्र, सैफ अली खान यांच्यासारख्या बड्या नेत्याच्या घरात घुसून हल्ला झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मध्यरात्री घडलेल्या या घटनेनंतर सैफ अली खानला स्वत:च्या कारमधून न नेता चक्क रिक्षातून लीलावती (lilawati) रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ज्या रिक्षावाल्याने सैफला आपल्या रिक्षातून (Auto rikshaw) लीलावतीत पोहोचवलं, त्याने मध्यरात्रीचा तो थरारक प्रसंग सांगितला आहे. तसेच, सैफच्या कुटुंबीयांकडून किती रुपये मिळाले हेही त्याने सांगितलं. मात्र, एवढा मोठा स्टार आपल्या रिक्षात बसला हेच मोठं असल्याचंही त्यांनी म्हटलं.
रिक्षाचालक भजनसिंग राणा यांनी सैफ अली खानला आपल्या रिक्षातून रुग्णालयात नेलं. साधारण मध्यरात्री अडीच ते 3 वाजताची वेळ असेल, मी तेथील रस्त्यावरुन रिक्षाने चक्कर मारत होतो. तेव्हाच एका आंटीने रिक्षा रिक्षा.. असा आवाज दिला. ती महिला घाबरेलील होती. त्यानंतर, समोरील गेटमधून 7 ते 8 जण बाहेर आले, सैफ अलीखान पूर्ण रक्तबंबाळ झाले होते. रिक्षात त्यांना टाकलं, त्यांच्यासोबत आणखी काहीजण रिक्षात बसले होते, त्यात एक लहान मुलही होतं. त्यानंतर, मी रिक्षा थेट रुग्णालयाच्या दिशेन नेली. रिक्षात बसलेली व्यक्ती कोण आहे हे मला माहिती नव्हतं. केवळ रक्तबंबाळ झालेली ती व्यक्ती आहे हे मला माहिती होतं. त्यामुळे, लवकरात लवकर त्यांना रुग्णालयात नेण्याचं काम मी केलं.
रिक्षाचं भाडं घेतलं नाही, स्टार रिक्षात बसला हेच मोठं
पाठीवर आणि मानेजवळ त्यांच्या जखम झाल्याचं मला दिसून आलं. ते स्वत:हून चालत आले होते. रिक्षात बसल्यानंतर ते आपल्या मुलासोबत इंग्रजीत बोलत होते. मला रिक्षातून त्यांना नेत असताना ते सैफ अली खान आहेत हे माहितीच नव्हतं. जेव्हा लीलावती रुग्णालयाजवळ रिक्षा थांबवली, त्यावेळी स्ट्रेचर आणण्यासाठी आवाज दिला, तेव्हा मी सैफ अली खान आहे असं त्यांनी म्हटलं. त्यामुळे, ते सैफ अली खान आहेत हे मला माहिती झाल्याचं रिक्षावाला भजनसिंग राणा यांनी म्हटलं. रिक्षाचं भाडं मला मिळालं नाही, कारण ती परिस्थितीच तशी नव्हती, अशावेळी कोण पैसे मागेल. त्यामुळे, मी पण पैसे मागितले नाही, फक्त त्यांना बरं करा असे म्हणून मी निघून गेलो. माझ्या रिक्षात एवढा मोठा स्टार बसला हेच मोठी गोष्ट आहे. पैशाचं काय, 50 किंवा 60 रुपये झाले असते, असा घडलेला प्रसंग रिक्षावाल्याने सांगितला.
हेही वाचा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा