Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
Solapur Crime : जवळपास 3 ते 5 फुटापर्यंत असलेले वाळूचे थर गेल्या अनेक वर्षांपासून चोरून नेल्याने हेच का ते वाळवंट म्हणायची वेळ भाविकांवर आली आहे.
Solapur Crime : विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन येणाऱ्या लाखो भाविकांना विठुरायाच्या दर्शनासोबत चंद्रभागेचे स्नान केल्याशिवाय वारी पोहोचवल्याचे समाधान मिळत नसते आणि त्यामुळेच वारकरी संप्रदायात विठ्ठल मंदिरा एवढेच चंद्रभागा स्नानाला महत्व असते. मात्र काही वर्षांपासून या चंद्रभागेकडे वाळू माफियांनी आपली दृष्टी वळवली आणि चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र निर्माण झाले आहे. ज्या पवित्र वाळवंटात शेकडो संतांनी वारकरी संप्रदायाचा संजीवनी संदेश जगाला दिला त्याच वाळवंटात आज पाऊल ठेवणे देखील अशक्य बनले आहे. जवळपास 3 ते 5 फुटापर्यंत असलेले वाळूचे थर गेल्या अनेक वर्षांपासून चोरून नेल्याने हेच का ते वाळवंट म्हणायची वेळ भाविकांवर आली आहे.
पहिल्यांदा चंद्रभागेच्या वाळवंटातील वाळू खरडून मोकळी करायची आणि नंतर थेट चंद्रभागेच्या पात्रातील वाळू उपसून काढायची हा उद्योग राजरोसपणे सध्या सुरू आहे. शहरात उघडपणे गाढवावरून आणि वाहनातून रोज शेकडो ब्रास वाळूची राजरोस चोरी सुरू आहे. यातूनच वारंवार चंद्रभागेच्या पात्रात वाळूच्या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अनेक भाविकांना आपले प्राणही गमवावे लागतात. चंद्रभागेच्या दोन्ही तीरावर वसलेले जवळपास 32 गावातून वाळू मफियांचा उघडपणे थैमान सुरू आहे. गोपाळपूर शेगाव दुमाला शिरढोण चळे आंबे देगाव आणि अशा परिसरातील नदीकाठच्या गावातून रोज टिपर व ट्रॅक्टरच्या सहाय्याने लाखो रुपयांची वाळू तस्करी सुरू असते.
हे सर्व चित्र रात्रभर आणि पहाटे राजरोसपणे सुरू असते. शहरात ठीक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असतानाही वाळू तस्करी उघडपणे सुरू असते. चंद्रभागा स्नानाला येणाऱ्या प्रत्येक भाविकाला ही दुरावस्था बघून वाईटही वाटते आणि संताप येतो मात्र प्रशासन आणि वाळू माफियांचे लागेबांधे असल्याशिवाय इतकी राजरोस वाळूची चोरी अशक्य असल्याचा आरोप महर्षी वाल्मिकी संघाचे अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी केला आहे. पंढरपुरात कॉरिडोर करण्याच्या हालचाली मुख्यमंत्री करीत असताना पंढरपूरचा आत्मा असलेली चंद्रभागा आणि तिचे वाळवंट आधी जपा आणि त्यासाठी या वाळू माफिया विरोधात आणि त्यांना साथ देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात कठोर पावले उचला अशी मागणी ही महर्षी वाल्मिकी सेनेच्या अंकुशराव यांनी केली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या