Nashik Rangpanchami 2024 : नाशिकची पेशवेकालीन रहाड संस्कृती म्हणजे काय रे भाऊ? जाणून घ्या A to Z इतिहास!
Nashik Rahad : नाशिकमध्ये रंगपंचमीची आगळीवेगळी परंपरा आहे. नाशिककर पेशवेकालीन रहाडीत धप्पा मारत रंगपंचमी साजरी करतात. या रहाडींचा इतिहासदेखील अत्यंत रंजक आहे.
Nashik Rangpanchami : सर्वत्र होळीच्या (Holi 2024) दुसऱ्या दिवशी म्हणजे धुळवडीला रंग खेळला जातो. मात्र नाशिकमध्ये रंगपंचमीची आगळीवेगळी परंपरा आहे. होळीच्या पाचव्या दिवशी नाशिकला रंगपंचमी खेळण्याची पेशवेकालीन परंपरा आहे. नाशिकच्या रंगोत्सवात नाशिकमधील पेशवेकालीन रहाडी खुल्या होत असल्याने संपूर्ण नाशिककर रंगोत्सवाची (Rangpanchami) आतुरतेने वाट पाहत असतात. यंदा नाशिकमध्ये उद्या (दि. 30) रंगपंचमी साजरी होणार आहे. या पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात नाशिकच्या रहाड संस्कृतीचा इतिहास....
पूर्वीच्या काळी पहिलवानांची शक्ती प्रदर्शनची जागा म्हणजे रहाड मानाली जात होती. रहाडीमध्ये पूर्वी कुस्तीचे सामनेदेखील रंगायचे. कुस्तीच्या आयोजनामुळे या ठिकाणी हाणामाऱ्या होत असल्याने राहाडा हा शद्बप्रयोग प्रचलित झाला असावा आणि त्यावरून रहाड हा शब्द नाशिक लोकांच्या मनावर कोरला गेला आहे. देखील केवळ नाशिकमध्येच रहाड संस्कृती शिल्लक आहेत. यंदाच्या रंगपंचमीसाठी नाशिकमधील रहाडी सज्ज झाल्या आहेत.
दंडे हनुमान चौकातील रहाड - रंग पिवळा
नाशिकमधील काझीपुरा पोलीस चौक परिसरात तीनशे वर्षांपूर्वीची पेशवे कालीन दंडे हनुमान रहाड आहे. पूर्वी येथे बैलगाडीवर मोठमोठे टीप, पाण्याच्या टाक्यातून, रंगपंचमी साजरी केली जात असे. मात्र कालांतराने ही परंपरा बंद पडली. त्यानंतर रहाड खोदण्यात येऊन रंगपंचमी साजरी केली जाते. या रहाडीत पिवळा रंग तयार केला जातो. जवळपास 200 किलो हून अधिक फुलांना एकत्रित करून रंग तयार केले जातात.
शनी चौकातील रहाड - रंग गुलाबी
पंचवटी परिसरातील शनी चौकातील रहाड पेशवे काळापासून प्रसिद्ध आहे. या परिसरात पेशव्यांचे सरदार वास्तव्यास होते. त्याकाळी ही रहाड कुस्त्या खेळण्याचा हौद होती. रास्ते सरदार या राहाडीची देखभाल करत असत, असे बोलले जाते. शनी चौकातील शनी चौक मित्र मंडळ आणि सरदार रस्ते आखाडा परंपरेने या राहाडीची आजतागायत जपणूक करत आहेत. या रहाडीचा रंग गुलाबी आहे. रंगपंचमीच्या दिवशी दीक्षित घराण्याचे मानकरी रहाडीची पूजा करतात. रहाड झाकण्यासाठी सागाच्या लाकडाच्या मोठ्या ओंडक्याचा वापर केला जातो.
तांबट लेनमधील रहाड - रंग केशरी
पेशवेकालीन पाषाणातील दगडाच्या बांधकामात तयार केलेली ही रहाड आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही रहाड दुर्लक्षित होती. तांबटलेनमधील युवकांनी एकत्र येत ही रहाड खुली केली आहे. या रहाडीचा रंग केशरी असतो. रंगपंचमीच्या दिवशी येथील पाच कुटुंबीयांना पूजेचा मान दिला जातो. रंग तयार करण्यासाठी पळसाची फुले तुळस, चंदनाचा वापर केला जातो. फुले कढईमध्ये उकळवली जातात. त्यानंतर पाण्याने भरलेल्या रहाडीत एकजीव केल्यानंतर रंग तयार होतो.
तिवंधातील रहाड - रंग पिवळा
तिवंधा चौकात बुधा हलवाईच्या दुकानासमोर ही पेशवेकालीन रहाड आहे. या रहाडीचा रंग पिवळा आहे. हा रंग फुलांपासून बनवला जातो. रहाडीचा मान जळगावकर कुटुंबीयांना आहे. या रहाडीत महिलांना प्रवेश दिला जातो. अर्धा भाग महिलांसाठी राखीव असतो तर अर्धा भाग पुरुषांसाठी राखीव असतो.
दिल्ली दरवाजा चौकातील रहाड - रंग केशरी
गोदाकाठावरच्या गाडगे महाराज पुलाजवळील दिल्ली दरवाजा चौकात पेशवेकालीन रहाड आहे. पळसाच्या फुलांपासून बनवला जाणारा रंग हे या रहाडीचे वैशिष्ट्य आहे. या रहाडीचा रंग केशरी आहे.रहाडीची देखभाल आणि मान तुरेवाले पंच मंडळ यांच्याकडे आहे. या रहाडीची परंपरा सुरू ठेवण्यासाठी आझाद सिद्धेश्वर दिल्ली दरवाजा मंडळाची स्थापना करण्यात आली होती.
आणखी वाचा
वीर दाजीबा बाशिंग मिरवणुकीने गोदाकाठ दुमदुमला! नाशकात धुलिवंदनाची तीनशे वर्षांची अनोखी परंपरा