साडेतीन तासांत 4 हजार किलोची भगर बनवली, नाशिककरांनी काही मिनिटांत केली फस्त!
Nashik : जगभरात 2023 हे वर्ष जागतिक तृणधान्य वर्ष साजरे केले जात असताना या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये जागतिक विक्रम साकारण्यात आला आहे.
Nashik Latest Marathi News Update : अखेर शेफ विष्णू मनोहर यांच्या नावे 16 वा जागतिक विक्रम झाला असून नाशिकमध्ये साडेतीन तासात चार हजार किलो भगर बनवून नाशिककरांना खाऊ घातली आहे. नाशिककरांनी देखील मोठ्या संख्येने सहभागी होत काही मिनिटांत ही भगर फस्त केली.
जगभरात 2023 हे वर्ष जागतिक तृणधान्य वर्ष साजरे केले जात असताना या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये (Nashik) जागतिक विक्रम साकारण्यात आला आहे. शेफ विष्णू मनोहर यांनी नेहमीप्रमाणे आपल्या हातांनी तब्बल 4 हजार किलो भगर (Bhagar) तयार केली. नाशिक शहरातील ठक्कर इस्टेट परिसरात चार हजार किलोची भगर शिजवून ती नाशिककरांना मोफत वाटप करण्यात आली. नाशिकची भगर ही भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध आहे. नाशिक भगर मिल असोसिएशन व कृषी विभाग यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र मिलेट्स मिशन यांच्या सहकार्याने त्र्यंबकरोडवरील ठक्कर इस्टेट येथे चार हजार किलोची भगर शिजवून ती नाशिककरांना मोफत वाटप करण्यात आली. आंतरराष्ट्रीय प्रख्यात शेफ विष्णू मनोहर यांनी ही भगर बनविली आणि त्यांच्या नावे 16 जागतिक विक्रमाची नोंदही करण्यात आली.
भगरची खास रेसिपी
भगर बनविण्यासाठी विष्णू मनोहर यांनी खास रेसिपी तयार केली असून, त्यासाठी भगर 400 किलो, बटाटा 215 किलो, मीठ 37 किलो, तेल 125 किलो, पाणी 2700 लिटर, जिरा 12 किलो, शेंगदाणे 100 किलो, शेंगदाणे कूट 125 किलो, दही 400 किलो, 50 किलो, तूप 100 किलो, दूध 100 लिटर आदी साहित्य वापरून 4 हजार किलो भगर शिजविण्यात आली.
जागतिक रेकॉर्ड झाला...
एकाच वेळी 4 हजार किलो पेक्षा जास्त भगर एकाच कढईत शिजवण्यात आली. यासाठी खास नागपूरहून खास कढई तयार करण्यात आली होती. या कढईचे वजन सुमारे दीड हजार किलो असून, 10 बाय 10 फूट व्यास आणि 5 फूट उंच आहे. विशेष चार हजार किलो भगरनंतर तृणधान्य प्रकारातील जागतिक रेकॉर्ड झाला आहे. सेफ विष्णू मनोहर यांनी आतापर्यंत विविध पंधरा विक्रम केले असून, नाशिक मधील हा त्यांचा 16 वा जागतिक विक्रम असणार आहे. याची नोंद अनेक रेकॉर्ड्स बुक्समध्ये करण्यात आली.
अधिकाऱ्यांचाही सहभाग...
यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरण् डी., मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, आमदार दिलीप बनकर, माजी आमदार अनिल कदम, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी प्रत्यक्ष भगर बनविण्याचा आनंद घेतला.