Nashik News : नाशिकच्या शिवसैनिकांना तिरडी आंदोलन भोवले, पाच पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल
Nashik News : नाशिक (Nashik) शिवसैनिकांनी (Shivsainik) काढलेल्या तिरडी आंदोलन (Agitation) प्रकरणी पाच पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Nashik News : शिवसेना (Shivsena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीमुळे राज्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. यामुळे राज्यातील शिवसैनिक देखील आक्रमक झाले असून ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. तर अनेक शिवसैनिकांकडून तोडफोड करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक शिवसैनिकांनी काढलेल्या तिरडी आंदोलन प्रकरणी पाच पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शिवसेना पक्षातून बंडखोरी केलेल्यांविरोधात नाशकात तिरडी काढून आंदोलन केल्याप्रकरणी शिवसेनेच्या ५ पदाधिकाऱ्यांवर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. नाशिकच्या भद्रकाली पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले असून, नाशकात बंडखोर आमदारांविरुद्ध नाशिक शिवसेना कार्यालयापासून अमरधामपर्यंत तिरडी काढून आंदोलन करण्यात आलं होतं. मात्र, परवानगीमध्ये दिलेल्या अटी शर्तीचे उल्लंघन केल्याप्रकरणी शिवसेनेच्या ५ पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यात राजकीय वातावरण (Maharashtra Political Crisis) चांगलेच ढवळून निघालं आहे. गेल्या आठ दिवसांपासून शिंदे जवळपास 40 आमदारांना घेऊन गुवाहटीमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळं महाविकास आघाडीचं सरकार संकटात आल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या आठ दिवसांपासून सातत्याने आंदोलने होत आहेत.
नाशिकमध्ये देखील बंडखोराची संतप्त शिवसैनिकांकडून प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली होती. बाळासाहेब ठाकरे, शिवसेना, उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ आणि बंडखोरांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शेकडो शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते. अमरधाममध्ये संतप्त शिवसैनिकांनी प्रतीकात्मक तिरडीचं दहन करत प्रवेशद्वारावरील शोकसभेत बंडखोरांना श्रद्धांजली देखील वाहण्यात आली होती. मात्र, तिरडी काढणे, तिरडीसह पुतळ्याचे दहन करणे, यास परवानगी नाकारण्यात आली असताना अटी शर्थीचे उल्लंघन करत तिरडी काढून अमरधाम येथे तिरडी आणि पुतळ्याचे दहन केल्याने शिवसेनेच्या पाच पदाधिकाऱ्यांवर नाशिक भद्रकाली पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आंदोलकांना नोटिसा
नाशिकमध्ये शिवसैनिक आक्रमक असून मागील काही दिवसांत आंदोलने, तोडफोड, बॅनर फाडणे आदी प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे नाशिकमधील वातावरण चिघळले आहे. त्यामुळे काही अनुचित प्रकार घडता कामा नये, तसेच राज्यातील कायद्या सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलिसांकडून शिवसैनिकांना नोटीस देण्यात आली आहे. नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी भाजप कार्यालयाची तोडफोड करणारे शिवसैनिक बाळा दराडे आणि दीपक दातिर यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
