Nashik : नाशिकमध्ये उन्हाच्या झळांना मिळणार 'ग्रीन सिग्नल'
नाशिकमध्ये उन्हाने कहर केला असून शहरातील तापमान चाळिशीच्या पार गेले आहे. तर वाहतूक विभागाच्या माहितीनुसार शहरात 50 सिग्नल असून या सर्व ठिकाणी याबाबत सर्वेक्षण सुरू आहे
नाशिक : नाशिकमध्ये सध्या उन्हाचा कहर सुरू असून दिवसभर कडक ऊन असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. अशातच नाशिककरांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. सध्या कडक ऊन असल्याने नागरिक बाहेर पडण्याचे नाव घेत नाहीत. मात्र अनेक नागरिक कामानिमित्त उन्हाच्या झळा सोसत बाहेरचा रस्ता धरतात. अशात उन्हात सिग्नलवर उभे राहल्यावर एक मिनिटातच अंगातून घामाच्या धारा बाहेर पडायला सुरवात होते. त्यामुळे अंगाची लाहिलाही होत असते. यावर उपाय म्हणून नागपूरच्या धर्तीवर नाशिकमधील सिग्नल यंत्रणा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती आहे.
दरम्यान राज्यातील नागपूर शहरात हा प्रयोग राबविण्यात येत आहे.गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक शहरांना उन्हाचे जोरदार चटके जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात दुपारी बारा ते चार सिग्नल बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे. याच धर्तीवर नाशिकमध्येही त्यासंदर्भातील सर्वेक्षण वाहतूक विभागाने सुरू केले आहे.
दरम्यान नाशिकमध्ये उन्हाने कहर केला असून शहरातील तापमान चाळिशीच्या पार गेले आहे. तर वाहतूक विभागाच्या माहितीनुसार शहरात 50 सिग्नल असून या सर्व ठिकाणी याबाबत सर्वेक्षण सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून ऊन वाढल्याने नागरिक उन्हात न थांबता सिग्नल तोडत असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये महात्मानगर, सिटी सेंटर मॉल, आयटीआय, सीबीएस, शरणपूर, कॅनडा कॉर्नर, जुना गंगापूर नाका या मुख्य सिग्नलवर हे प्रकार दिसून आले आहेत.
तसेच या सिग्नलच्या जवळपास असलेल्या सावलीच्या किंवा झाडाला आधार घेतला जात आहे. तर अनेकजण उन्हाच्या बचावापासून थेट सिग्नल तोडून पुढे जातात. विशेष दुचाकीधारकच नाही तर शहरातील सिग्नल वर तैनात असलेल्या पोलिसांना देखील उन्हाचे चटके जाणवत आहेत.
ही बाब लक्षात घेऊन नाशिकमध्ये वाहतूक विभागाने सिग्नल बंद ठेवता येतील का? कोणत्या वेळी? कोणते प्रमुख सिग्नल? आदी गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी सर्वेक्षण सुरू केले आहे. दरम्यान सिग्नलची वेळ, दुपारची गर्दी, वाहनांच्या रांगा आणि एकूणच तेथील गरज ओळखून सिग्नल बंद ठेवण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यासाठी सर्वेक्षण होत आहे. त्यानंतर पोलीस आयुक्तांना अहवाल सादर करण्यात येईल. मगच याबाबत निर्णय होणार आहे.
नाशिक वाहतूक विभागाचे सीताराम गायकवाड म्हणाले, दुपारच्या रखरखत्या उन्हात सिग्नलवर उभे राहून नागरिकांचा जीव मेटाकुटीला येतो. या सोबतच पोलिसांना देखील दुपारी सिग्नलवर ड्युटी करताना उन्हाचा सामना करावा लागतो, यावर हा तोडगा असून कमी ट्रॅफिक असलेले सिग्नल बंद करण्याबाबत चाचपणी सुरू आहे अद्याप यावर निर्णय नाही.