Nashik : नाशिक रंगपंचमीला तुफान गर्दी, पोलिसांचा लाठीचार्ज; तिवंधा चौकातील रहाड बंद
Nashik Rangpanchami : नाशिक रंगपंचमीला तुफान गर्दी झाल्याने गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला आहे.
Nashik Rangpanchami : नाशिकचा प्रसिद्ध रहाड उत्सव (Rahad Panchami) जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. मात्र यंदा रहाडीत उड्या मारण्याच्या परंपरेला गालबोट लागतं की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्याचं कारण असं की रहाडीत रंग खेळण्यासाठी तरुणांची तुफान गर्दी झाल्याने गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला आहे. त्याचबरोबर तिवंधा चौकातील रहाड बंद करण्यात आली आहे.
नाशिकमध्ये (Nashik) आज सकाळपासून रंगपंचमीचा (Rangpanchami) उत्साह मोठा प्रमाणावर दिसून येत आहे या पार्श्वभूमीवर शहरातील चार प्रमुख रहाड देखील खुल्या करण्यात आलेले आहेत. मात्र शहरातील तिवंधा चौकात रंगपंचमी खेळण्यासाठी प्रचंड गर्दी झाल्याचे चित्र आहे. गर्दी एवढी झाली की अक्षरशः चेंगराचेंगरीची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. पोलिसांकडून तात्काळ गर्दीला हटविण्यासाठी सौम्य स्वरूपात लाठीचार्ज करण्यात आला. त्यानंतर गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी थेट रहाड बंद करण्यात आले आहे.
दरम्यान दुपारपासून रहाडी रंगपंचमी (Nashik Rangpanchami) खेळण्यासाठी खुल्या करण्यात आल्यानंतर प्रत्येक ठिकाणी तुफान गर्दी झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे पोलिसांना देखील गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अडचणी येत असून पोलिसांचा बंदोबस्त तोकडा पडू लागला आहे. अशातच पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत तिवंधा चौकातील रहाड बंद करण्यात आले आहे.
मुंबईसह (Mumbai) अनेक ठिकाणी होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच धूलिवंदनला रंगोत्सव साजरा केला जातो. तर नाशिकमध्ये रंगपंचमीला रंगांची उधळण केली जाते. आज सकाळ पासूनच नाशिककर रंगपंचमीच्या रंगात रंगून गेले आहेत. नाशिकचे वैशिष्ट्य म्हणजे रहाडीची परंपरा जोपासणारे नाशिक हे एकमेव शहर असून पेशवेकाळापासून ही परंपरा जोपासली जाते आहे. रहाड़ीमध्ये डुबकी घेत रंग खेळला जातो. सकाळपासूनच तयारीला सुरवात होत असते, गरम पाण्यात नैसर्गिक रंग टाकून तो उकळवला जातो, त्यानंतर तो रंग रहाडीत टाकला जातो.
सर्व रहाडीच्या परिसरात तुफान गर्दी
यंदा रंगपंचमीला शहरातील पाच रहाडी खोदण्यात आल्या असून जुनी तांबट लेनमधील रहाड दुपारी बारा वाजता खुली करण्यात आली असून त्याआधी तिची विधिवत पूजा केली जाते पूजा करून नंतर रहाड़ी भोवती प्रदक्षिणा मारून बोम्ब ठोकली जाते आणि मानकऱ्यांनी रहाडीमध्ये डुबकी घेताच नाशिककरांसाठी रहाडी खुल्या केल्या जातात. पुढचे दोन दिवस तरी अंगावरून हा रंग उतरत नाही. तसेच रहाडित आंघोळ केल्याने उन्हाच्या कुठल्याही व्याधी होत नाही, असे मानले जात असल्याने हजारो नाशिककर रहाडीमध्ये डुबकी मारण्यासाठी येत असतात. या रहाडींचा रंग देखिल ठरलेला असतो. पंचवटीतील रहाडीत गुलाबी रंग असतो, गाडगे महाराज पुलाजवळ पिवळा रंग, तांबट लेन आणि तिवंधा येथे केशरी- नारंगी रंग असे या रहाडींच्या रंगांचे देखिल वैशिट्ये आहेत.