Nashik Rangpanchami : भाव खाऊन जाणारी नाशिकची रंगपंचमी, काय आहे पेशवेकालीन रहाडींचा इतिहास?
Nashik Rangpanchami : पेशवेकालीन परंपरा असलेली नाशिकची रहाडपंचमी अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
Nashik Rangpanchami : कुठे होळी (Holi) तर कुठे धुळवड तर कुठे वेगळ्या रंगांची उधळण होत असताना भाव खाऊन जाते ती नाशिकची रंगपंचमी. अबाल वृद्धांपासून तरुण-तरुणीपर्यंत दरवर्षी या रंगमंचमीची आतुरतेने वाट पाहत असतात. नाशिककरांची रंगमंचमी (Nashik Rangpanchami) खेळण्याची पद्धतही काहीशी वेगळी आहे. नाशिकमध्ये जवळपास एकूण पाच रहाडी असून यापैकी दरवर्षी चार रहाड खोदून रंगपंचमी साजरी केली जाते.
सद्यस्थितीत नाशिक (Nashik) शहरात एकूण चार ते पाच रहाडी दरवर्षी रंगपंचमीला (Rangpanchami) खुल्या केल्या जातात. यामध्ये शनी चौकातील रहाड, तांबट लेन येथील रहाड, दंडे हनुमान चौकातील रहाड, दिल्ली दरवाजा रहाड आणि तिवंधा चौकातील राहाड. या सर्व रहाड पेशवेकालीन असून प्रत्येक रहाडीची आपली वेगळी परंपरा आहे. त्यामुळे या नाशिकच्या रंगपंचमी बद्दल माहिती असणं आवश्यक आहे.
कुस्त्यांचा हौद बनली रहाड
काळाराम मंदिराच्या (Kalaram Mandir) उत्तर दरवाजाला असलेली शनी चौकातील रहाड पेशवे काळापासून प्रसिद्ध आहे. अडीचशे तीनशे वर्षांपुर्वी पेशव्यांचे सरदार या भागात राहत होते. त्याकाळी ही कुस्त्या खेळण्याचा हौद होता. या ठिकाणी परिसरातील पहिलवान ताकद आजमावत असत. रास्ते सरदार याची देखभाल करत असल्याचे सांगितले जाते. शनी चौकातील शनी चौक मित्र मंडळ आणि सरदार रस्ते आखाडा परंपरेने या राहण्याची जपणूक करत आहेत. शनी चौकातील ही होळी रात्री बारानंतर पेटवली जाते. तर सकाळपासून राहत खोदण्यास सुरुवात होते. ही रहाड झाकण्यासाठी सागाच्या लाकडाच्या मोठ्या ओंडक्याचा वापर होतो. या रहाडीचा रंग कायमस्वरूपी गुलाबी ठरलेला असतो रंगपंचमीच्या दिवशी दीक्षित घराण्याचे मानकरी रहाड पूजा करतात.
दिल्ली दरवाजा रहाड
गाडगे महाराज पुलाजवळील दिल्ली दरवाजा चौकात असलेल्या पेशवेकालीन रहाडीची देखभाल आणि मान तुरेवाले पंच मंडळ यांच्याकडे आहे. रहाडीची परंपरा सुरू ठेवण्यासाठी आझाद सिद्धेश्वर दिल्ली दरवाजा मंडळाची स्थापना करण्यात आली होती. पळसाच्या फुलांपासून बनवला जाणारा रंग हे या रहाडीचे वैशिष्ट्य आहे. या रहाडीचा रंग केशरी आहे.
तांबट लेन रहाड
पेशवेकालीन पाषाणातील दगडाच्या बांधकामात असलेली ही रहाड अनेक वर्षांपासून दुर्लक्षित होती, मात्र शहरातील तांबटलेन येथील युवकांनी एकत्र येत रहाड खुली केली. या रहाडीचा रंग केशरी किंवा लालसर असतो. रंगपंचमीच्या दिवशी येथील पाच कुटुंबीयांना पूजेचा मान दिला जातो. यात त्यानंतर खऱ्या अर्थाने रंगपंचमीला सुरुवात होते. या रहाडीचा रंग तयार करण्यासाठी पळसाची फुले तुळस, चंदनाचा वापर केला जातो. दीडशे किलोहून अधिक फुले गोळा करून ती कढईमध्ये उकळवली जातात. त्यानंतर पाण्याने भरलेल्या रहाडीत एकजीव केल्यानंतर रंग तयार होतो.
तिवंधा चौकातील रहाड
नाशिक शहरातील प्रसिद्ध असलेल्या बुधा हलवाईच्या दुकानासमोर तिवंधा चौकात ही पेशवेकालीन रहाड आहे. या रहाडीचा रंग पिवळा असून हा पूर्णपणे फुलापासून बनवला जातो. पंचमीच्या दिवशी संपूर्ण रहाड सजवल्यानंतर रंगाची रहाडीची विधिवत पूजा केली जाते. रहाडीचा मान जळगावकर कुटुंबीयांना आहे. विशेष म्हणजे या रहाडीत महिलांना प्रवेश दिला जातो. अर्धा भाग महिलांसाठी राखीव असतो तर अर्धा भाग पुरुषांसाठी राखीव असतो. त्यामुळे रंगाचा पूर्ण रंगपंचमीचा पूर्ण आनंद लुटत असतात
दंडे हनुमान चौकातील रहाड
नाशिकमधील काझीपुरा पोलीस चौक परिसरात तीनशे वर्षांपूर्वीची पेशवे कालीन दंडे हनुमान रहाड आहे. या रहाडची आख्यायिका अशी सांगितले जाते की काही वर्षांपूर्वी बैलगाडीवर मोठमोठे टीप, पाण्याच्या टाक्यातून, रंगपंचमी साजरी केली जात असे. मात्र कालांतराने ही परंपरा बंद पडली. त्यानंतर रहाड खोदण्यात येऊन रंगपंचमी साजरी केली जाते. या रहाडीत पिवळा रंग तयार केला जातो. जवळपास 200 किलो हून अधिक फुलांना एकत्रित करून रंग तयार केले जातात. दंडे हनुमान चौकातील रहाडीचा आनंद देखील तितकाच नाशिककरांना लुटायला मिळतो.