नागपुरात कौटुंबिक वादातून पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या, पतीने केले विष प्राशन
Nagpur News Update : कौटुंबिक वादातून पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तर पतीने विष प्राशन केले आहे. नागरपूरमध्ये ही घटना घडली आहे.
Nagpur News Update : नागपुरात कौटुंबिक वादातून पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तर पतीने विष प्राशन केले आहे. पतीला उचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर आहे. प्रफुल्ल सहारे असे विष प्राशन केलेल्या पतीने नाव आहे तर रितू सहारे असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.
प्रफुल्ल आणि रितू सहारे हे दाम्पत्य नागपूरमधील कपिल नगर परिसरात रहातात. त्यांना दोन लहान मुले आहेत. प्रफुल्लचे आई-वडीलही त्यांच्यासोबतच राहतात. आज सकाळी प्रफुलचे आई वडील आपापल्या कामावर निघून गेल्यानंतर प्रफुल आणि रितू यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. यावेळी मुलांना घरच्या वरच्या मजल्यावर पाठवून दिले. त्यानंतर दोघांमध्ये थोडा वेळ दोघांचे भांडण चालले. परंतु, बराच वेळ दोघांनी दार न उघडल्यामुळे शेजाऱ्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली.
माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होत पोलिसांनी घराचे दार तोडून आत प्रवेश केला. यावेळी रितू गळफास लावलेल्या अवस्थेत आढळली. तर प्रफुल्ल विष प्राशन केल्यानंतर बेशुद्ध अवस्थेत आढळला. पोलिसांनी दोघांना रुग्णालयात नेले. मात्र, तोपर्यंत रितूचा मृत्यू झाला होता. प्रफुल्ल सहारे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
पोलीस निरीक्षक शुभांगी वानखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रफुल्ल फर्निचर बनवण्याचे काम करत आहेत. तर रितू गृहिणी होती. प्रफुल्लचे वडील सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात तर प्रफुल्लची आई मानकापूर परिसरात कामावर जाते. आज सकाळी हे दोघे कामावर निघून गेल्यानंतर प्रफुल आणि रितू यांच्यात भांडण झाले आणि त्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उलले.
प्रफुल्ल आणि रितू या दोघांचा संसार नीट चालला असताना आणि कुटुंबात सर्व काही आलबेल असताना अचानक असे काय घडले की प्रफुल्ल आणि रितू यांनी असे टोकाचे पाऊल उचलले याबद्दल पोलीस शोध घेत आहेत. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.