ताडोबाची सफाई, आता बाघोबांची जबाबदारी! पाणवठ्यातून प्लास्टिकची बाटली चक्क वाघ बाहेर काढतोय, VIDEO
Tadoba-Andhari Tiger Reserve: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रशासनानं प्लास्टिक आणि कचरामुक्त व्याघ्र प्रकल्प ठेवण्यासाठी विशेष नियमावली तयार करण्यात आली आहे. असं असलं तरी, त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.
Tadoba-Andhari Tiger Reserve: नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची (Tadoba Andhari Tiger Reserve) सफाई आता चक्क वाघांनी आपल्या हाती घेतल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय. निमढेला बफर क्षेत्रात (Nimdhela Buffer Area) एक वाघिण तोंडात प्लास्टिकची बाटली (Plastic Bottle) पाण्यातून बाहेर काढतानाचा एक व्हिडीओ (Viral Video) सध्या समोर आला आहे. हा व्हिडीओ एबीपी माझाच्या हाती लागला आहे. त्यामुळे या व्याघ्र प्रकल्पातील (Tiger Reserve) प्लास्टिक व्यवस्थापनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. निमढेला बफर क्षेत्रातील 'जांभूळडोह' सिमेंट बंधारा परिसरात 29 डिसेंबर रोजी वन्यप्रेमी दिप काठीकर (Deep Kathikar) यांनी आपल्या कॅमेर्यात हा क्षण टिपला आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रशासनानं प्लास्टिक आणि कचरामुक्त व्याघ्र प्रकल्प ठेवण्यासाठी विशेष नियमावली तयार करण्यात आली आहे. असं असलं तरी, त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. ताडोबाकडे पर्यटकांचा ओघ पाहता या व्याघ्र प्रकल्पात प्लास्टिकच्या बाटल्या नियमित आढळत आहेत. आता या बाटल्या चक्क वाघांच्या तोंडात दिसून येत असल्यानं त्यांच्या आरोग्याचा आणि संवर्धनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
निमढेला बफर क्षेत्रात 'भानूसखिंडी' आणि तिच्या बछड्यांचा पर्यटकांना लळा
निमढेला बफर क्षेत्रात 'भानूसखिंडी' आणि तिच्या बछड्यांनी पर्यटकांना लळा लावला आहे. त्यातील एक ‘नयनतारा’ ही तिच्या निळ्या डोळ्यांमुळे पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. जांभूळढोळ सिमेंट बंधारा परिसरात पाण्यातून प्लास्टिकची बाटली तोंडात धरून बाहेर काढणारी नयनतारा आढळून आली आहे. या घटनेच्या काही दिवसांपूर्वी नवेगाव प्रवेशद्वाराजवळ वाघ तोंडात कापड घेऊन फिरताना आढळून आला होता. निमढेला बफर क्षेत्रातच ‘भानूसखिंडी’ वाघिणीचे तीन बछडे रबरी बुटांशी खेळताना दिसले होते.
दरम्यान, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील मुख्य व्याघ्र प्रकल्पांपैकी एक. हा प्रकल्प हा ताडोबा अभयारण्यात आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान देशातील प्रमुख राष्ट्रीय उद्यानांपैकी एक असून चंद्रपूर जिल्ह्यात आहे.1955 साली याची स्थापना झाली. ताडोबा हे महाराष्ट्रातील पहिलं राष्ट्रीय उद्यान. इथे आढळणाऱ्या मगरी-सुसरी आणि गवा हे इथले मुख्य वैशिष्ट्य आहे. तसेच, येथील व्याघ्र प्रकल्प पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू आहे. दरवर्षी इथे अनेक पर्यटक भेट देतात.
पाहा व्हिडीओ : Tiger Chandrpur : अंधारी व्याघ्र प्रकल्पाची सफाई वाघोबाच्या हाती : ABP Majha