NMC Elections 2022 : महानगरपालिका वाऱ्यावर, शहरात उभे झाले समस्यांचे डोंगर
प्रशासक म्हणून नियुक्तीनंतर सत्ताधाऱ्यांचा अडथळा नसल्याने विकासकामांना गती तसेच नागरी समस्याही तत्काळ सुटतील, अशी अपेक्षा शहरवासीयांना होती. परंतु, जुलै-ऑगस्टमध्ये जोरदार पाऊस झाला आणि पितळ उघडे पडले.
नागपूरः राज्यात सत्तांतरानंतर होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकाही लांबल्या आहेत. त्याचा थेट फटका शहवासियांना (Nagpur Citizen) बसत असून नागरिकांच्या किरकोळ समस्याही मनपा प्रशासनातर्फे सोडविण्यात येत नसल्याने शहर वाऱ्यावर असल्याचे दिसून येत आहे. पाच मार्चपासून नागपूर मनपामध्ये प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र नियुक्तीनंतर सहा महिने उलटूनही अद्याप प्रशासनावर प्रशासकांची पकड नसल्याने नागरिकांना शहरात अस्वच्छता, खड्डे अशा असंख्या नागरी समस्यांचा डोंगर उभा झाला आहे.
गेल्या या सहा महिन्यात शहरातील विविध भागांत समस्यांचे डोंगर उभे झाले आहेत. किरकोळ तक्रारीसाठी नागरिकांना तब्बल दोन-दोन महिने प्रतिक्षा करावी लागली. एकूणच, कोणाची चप्पल कोणाच्या पायात नसल्याचे चित्र होते. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचा कार्यकाळ चार मार्चला संपला. राज्य सरकारने पाच मार्चपासून आयुक्त राधाकृष्णन बी. यांची सहा महिन्यांसाठी प्रशासक म्हणून नियुक्ती केली होती.
'जसं चालू आहे...चालू द्या'
साधारणतः प्रशासकाची नियुक्ती (Administrator) अल्पकालावधीसाठी करण्यात येते. त्यामुळे प्रशासकाकडूनही महानगरपालिकेच्या (NMC Administration) प्रशासकीय कामात हस्तक्षेप न करता जसं सुरु आहे....चालू द्या. अशी भूमिका घेण्यात येते. मात्र सध्या नागपुरात (Nagpur) असलेले प्रशासक राधाकृष्णन बी ( Radhakrishnan B) यांना कार्यकाळ संभाळून 6 महिने उलटूनही अद्याप प्रशासन त्यांच्या नियंत्रणाबाहेर असल्याचे चित्र आहे. सोशल मीडियावर येणाऱ्या तक्रारींची दखलही घेण्यात येत नसल्याचे 'खास' लोकांना मालामाल करण्यासाठीच कंत्राट देण्यात आले असल्याचे नागरिक बोलून दाखवत आहेत.
सत्ताधाऱ्यांचा अडथळा नसल्याने मोठी संधी
आयुक्तांची प्रशासक म्हणून नियुक्तीनंतर सत्ताधाऱ्यांचा अडथळा नसल्याने शहरातील विकासकामांना गती तसेच नागरी समस्याही तत्काळ सुटतील, अशी अपेक्षा शहरवासीयांना होती. या सहा महिन्यांत पावसाळ्यापूर्वी (Pre Monsoon) करावयाची कामे प्रमुख होती. परंतु, जुलै-ऑगस्टमध्ये जोरदार पाऊस झाला आणि पावसाळी तयारीचे पितळ उघडे पडले. ड्रेनेज-सिवेज लाइनच्या क्षमता उघड्या पडल्या. वस्त्यांमध्ये अनेक दिवस पाणी साचल्याचे दिसून आले. नागरिकांच्या तक्रारींचीही (Complaints) दखल घेतली नाही. काही भागांत पावसातच पावसाळी नाल्या उघड्या करून स्वच्छ करण्यात आल्या. शहरातील उद्यानांची दुर्दशा झाली असून गवत गुडघाभर वाढले. सिव्हिल लाइन, उत्तर नागपुरातील वस्त्या, दक्षिण नागपुरातील हुडकेश्वर रोड, मानेवाडा बेसा तसेच अमरावती मार्ग आदी रस्त्यांची चाळणी झाली.
ऐन पावसाळ्यात खोदकाम
हुडकेश्वर पोलिस ठाणे ते पिपळा मार्ग ऐन पावसाळ्यात खोदून ठेवला. अजूनही या रस्त्यांचे काम सुरू झाले नाही. त्यामुळे वाहनधारक, पादचाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या रस्त्यांचे काम करणाऱ्या कंत्राटदारावर अधिकाऱ्यांचे व झोन अधिकाऱ्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे (NMC Zone) नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे शहरात महानगरपालिका आहे की नाही, अधिकारी नेमके कुठल्या कामात आहेत, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
अव्यवस्थेने लावली शहराच्या आरोग्याची वाट
मोकळ्या भूखंडांवरील कचरा, झुडपे, साचलेल्या पाण्यामुळे शहराच्या आरोग्याची वाट लावली आहे. घरोघरी सर्दी, खोकला ताप, मलेरिया आधींचे रुग्ण आहेत. मोकळ्या भूखंडाबाबत तक्रारींचा खच झोन कार्यालयात पडला. परंतु, त्याबाबत अधिकारी मूग गिळून बसले आहेत. स्वच्छतेसाठी उपद्रव शोध पथकाकडून रस्त्यावर विटा, गिट्टी, वाळू पसरविणारे, कचरा पसरविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. मोकळ्या भूखंडावरील कचरा हा स्वच्छतेचे प्रतीक आहे का? असा सवाल संतप्त नागरिक करीत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या