CSK vs RCB IPL 2025 : धोनीचा बालेकिल्ला अखेर रजत पाटीदारनं केला उध्वस्त! 17 वर्षांनी बंगळुरूचा चेन्नईमध्ये दणदणीत विजय, RCB पॉइंट टेबलमध्ये 'टॉपर'
आयपीएल 2025 मधील आठवा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात शुक्रवारी चेपॉक स्टेडियमवर खेळला गेला.

RCB beat CSK in Chepauk after 17 years IPL History : आयपीएल 2025 मधील आठवा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात शुक्रवारी चेपॉक स्टेडियमवर खेळला गेला. आरसीबीचा संघही 2008 नंतर सीएसकेचा हा बालेकिल्ला भेदू शकलेला नव्हता पण रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 17 वर्षांचा हा दुष्काळ संपवला आहे.
कर्णधार रजत पाटीदारच्या अर्धशतकानंतर केलेल्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर आरसीबीने सीएसकेचा 50 धावांनी पराभव केला. 2008 नंतर चेपॉक स्टेडियमवर आरसीबीचा हा पहिलाच विजय आहे. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 20 षटकांत सात गडी गमावून 196 धावा केल्या, परंतु चेन्नई संघ निर्धारित षटकांत आठ गडी गमावून केवळ 146 धावाच करू शकला. अशाप्रकारे, आयपीएलच्या 18 हंगामांच्या इतिहासात फक्त दुसऱ्यांदा, चेपॉक स्टेडियमवर बेंगळुरूने चेन्नईविरुद्ध विजय मिळवला. तसेच, बंगळुरू ने या हंगामात सलग दुसरा विजय मिळवला, तर चेन्नईने दोन सामन्यांमधील पहिला पराभव पत्करला. बेंगळुरू पॉइंट टेबलमध्ये टॉपर आहे.
Match 8. Royal Challengers Bengaluru Won by 50 Run(s) https://t.co/I7maHMvZOk #CSKvRCB #TATAIPL #IPL2025
— IndianPremierLeague (@IPL) March 28, 2025
चेपॉक स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात, यावेळी चेन्नई सुपर किंग्जच्या घरच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू जिंकू शकेल की नाही याकडे सर्वांचे लक्ष होते. पण यावेळी बंगळुरू अधिक चांगल्या तयारीने आला आणि शेवटी चेन्नईचा अभेद्य किल्ला जिंकण्यात यशस्वी झाला. यामध्ये बंगळुरूच्या फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी मोठी भूमिका बजावली, आणि चेन्नईच्या पराभवाचे कारण ठरले ते म्हणजे खराब क्षेत्ररक्षण.
आरसीबीचा सलग दुसरा विजय
आयपीएल 2025 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा हा सलग दुसरा विजय आहे. यापूर्वी, आरसीबीने स्पर्धेतील त्यांच्या पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा 7 गडी राखून पराभव केला होता. या विजयासह, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पॉइंट्स टेबलमध्ये आपले पहिले स्थान निश्चित केले आहे. दोन्ही सामने जिंकल्यानंतर आरसीबी आता गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे.
✌️ in ✌️ for @RCBTweets 🥳
— IndianPremierLeague (@IPL) March 28, 2025
Plenty to celebrate for Royal Challengers Bengaluru as they secure their first win against #CSK in Chepauk after 1⃣6⃣ years ❤️
Scorecard ▶ https://t.co/I7maHMwxDS #TATAIPL | #CSKvRCB pic.twitter.com/lbZhsloryc
शेवटच्या षटकात टिम डेव्हिडचा तांडव!
चेन्नईने नाणेफेक जिंकून आरसीबीला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पाटीदारने 32 चेंडूत चार चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 51 धावा केल्या, ज्यामुळे आरसीबीला 20 षटकांत सात बाद 196 धावा करता आल्या. शेवटच्या षटकात सॅम करन टाकण्यासाठी आलेल्या डेव्हिडने सलग तीन षटकार मारले आणि त्या षटकातून एकूण 19 धावा काढल्या. डेव्हिडने एक चौकार आणि तीन षटकारांसह 22 धावा काढत नाबाद राहिला. आरसीबीकडून सॉल्टने 32 धावा, कोहलीने 31 धावा, देवदत्त पडिकलने 27 धावा, जितेश शर्माने 12 आणि लियाम लिव्हिंगस्टोनने 10 धावा केल्या. सीएसकेकडून फिरकी गोलंदाज नूर अहमदने तीन, मथिशा पाथिरानाने दोन आणि खलील अहमद आणि रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी एक बळी घेतला.
आरसीबीच्या गोलंदाजांची कमाल!
लक्ष्याचा पाठलाग करताना, सीएसकेची सुरुवात खुपच खराब झाली, जोश हेझलवूडने त्यांना दोन धक्के दिले. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या शिवम दुबेने रचिनसोबत भागीदारी करण्याचा प्रयत्न केला, पण यश दयालने या दोन्ही फलंदाजांची शिकार केली. शिवम 19 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. जडेजाने चांगली फलंदाजी केली आणि आयपीएलमध्ये 3000 धावा आणि 100 विकेट पूर्ण करणारा तो पहिला खेळाडू ठरला. सामन्यात जडेजाने 25 धावा केल्या, तर अश्विन 11 धावा करून बाद झाला. शेवटच्या षटकात, धोनीने कृणाल पंड्याला सलग दोन षटकार आणि एक चौकार मारला. आरसीबीकडून हेझलवूडने 3, यश आणि लियाम लिव्हिंगस्टोनने प्रत्येकी 2 आणि भुवनेश्वर कुमारने 1 विकेट घेतली.





















