मूळचा धनंजय मुंडेंचा माणूस, वाल्मिकशी काय नातं; मारहाणीवेळी संतोष देशमुखांनी नाव घेतलेला सुग्रीव कराड कोण?
सुग्रीव कराड हा मूळचा धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता आहे. मात्र, मागील लोकसभा निवडणुकीत त्याची भूमिका संशयास्पद राहिल्यानंतर सुग्रीव कराड याला धनंजय मुंडे यांनी बाजूला केलेले होते.

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh deshmukh) हत्याप्रकरणाती आरोपींनी सुग्रीव कराडचे नाव घेतल्याने आता या घटनेत नवी थेअरी समोर आली आहे. वाल्मिक कराडसह 8 आरोपींची याअगोदरच या खटल्यात चौकशी करण्यात आली असून कृष्णा अंधारे हा फरार आहे. याप्रकरणी, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या उपस्थितीत बीड (Beed) न्यायालयात पहिली सुनावणी झाली. त्यानंतर, आरोपींच्या कबुली जबाबासंदर्भात नवी माहिती समोर आली आहे. आरोपी जयराम चाटे आणि महेश केदार यांनी सुग्रीव कराडचे नाव घेतले. सुग्रीव कराडच्या सांगण्यावरुनच संतोष देशमुख आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांनी सुदर्शन घुलेला मारहाण केल्याचा दावा कृष्णा आंधळेने केला होता. याच मारहाणीचा बदल घेण्यासाठी ही हत्या करण्यात आल्याचे चाटे आणि केदार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे, याप्रकरणात नाव आलेला सुग्रीव कराड कोण? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. मात्र, सुग्रीव कराड हा वाल्मिक कराडचा रक्ताचा नातेवाईक नाही.
सुग्रीव कराड हा मूळचा धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता आहे. मात्र, मागील लोकसभा निवडणुकीत त्याची भूमिका संशयास्पद राहिल्यानंतर सुग्रीव कराड याला धनंजय मुंडे यांनी बाजूला केलेले होते. लोकसभा निवडणुकीनंतर सुग्रीव कराडने थेट बजरंग सोनवणे यांच्यासाठी काम करणे सुरू केले. पूर्वी सुग्रीव कराड आणि बजरंग सोनवणे दोघेही धनंजय मुंडे यांचेच कार्यकर्ते म्हणून काम करत होते. 2022 साली केज नगरपंचायत निवडणुकीत सुग्रीव कराड यांनी बजरंग सोनवणे यांची मुलगी डॉक्टर हर्षदा हिच्या विरोधात नगरसेवक पदासाठी फॉर्म भरलेला होता. यात बजरंग सोनवणे यांच्या मुलीचा पराभव झाला होता. या पराभवासाठी विष्णू चाटे यांनी सुग्रीव कराडला रसद पुरवल्याचा आरोप बजरंग सोनवणे यांनी केला होता. मात्र, कालांतराने सुग्रीव कराड याला खा. बजरंग सोनवणे यांनी जवळ घेत त्याचा वापर विष्णू चाटे याच्या विरुद्ध करण्यास सुरुवात केली.
तेव्हापासून सुदर्घन घुले अन् सुग्रीव कराडचे वाकडे
केज तालुक्यात संत भगवान बाबा जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. मागच्या मागच्या वर्षीच्या जयंती उत्सवासाठी केज येथील शासकीय विश्रामगृहावर सर्व समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये विष्णू चाटे आणि सुग्रीव कराड हे दोघेही उपस्थित होते. या बैठकीदरम्यान विष्णू चाटे आणि सुग्रीव कराड यांच्यात जयंतीच्या नेतृत्वावरून खडाजंगी झाली. त्यात सुदर्शन घुले याने विष्णू चाटे यांच्या बाजूने उभे राहत सुग्रीव कराड यांच्या अंगावर धावून जाण्याची घटना घडली होती. तेव्हापासून सुग्रीव कराड हा प्रचंड अस्वस्थ झालेला होता. कारण केज तालुक्यामध्ये सुग्रीव कराड हा डॉन म्हणून ओळखला जातो. याच बैठकीमधून विष्णू चाटे यालाही सुदर्शन घुलेसारखा खंबीर पाठीराखा मिळाला होता. इथूनच खऱ्या अर्थाने केस तालुक्यातील डॉन कोण अशी स्पर्धा सुग्रीव कराड आणि सुदर्शन घुले याच्यामध्ये लागलेली होती.
सरपंचाच्या पाठिमागे सुग्रीव असल्याचा संशय
आवादा कंपनीच्या आवारात ज्यावेळी सुदर्शन घुले आणि इतरांना मसाजोग ग्रामस्थांनी आणि सरपंच संतोष देशमुख यांनी मारहाण केली होती. त्यावेळी सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे आणि कृष्ण आंधळे यांना संशय होता की संतोष देशमुख हे आपल्याला मारहाण करू शकत नाहीत. या मारहाणी मागे सुग्रीव कराड हाच असण्याची शक्यता असावी हे जाणून घेण्यासाठी सुरुवातीला त्यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरणाचा कट रचला. संतोष देशमुख यांचे अपहरण होण्याअगोदर सरपंच देशमुख यांनी आपल्या व्हाट्सअप ला 'बाप तो बाप रहेगा' असे कॅप्शन लिहून सुदर्शन घुले, प्रतीक घुले यांच्या मारहाणीचा फोटो स्टेटसला ठेवला होता. त्याचा रागही सुदर्शन घुले आणि गँगला होता. सरपंच देशमुख यांचे अपहरण केल्यानंतर या गँगने त्यांना आम्ही सगळ्यांचे बाप आहोत, असे म्हणूनच मारहाण केली होती ती याच वादातून.
सुग्रीव कराड कोण?
सरपंच देशमुख यांना मारहाण करीत असतानाच सुग्रीव कराडचे नाव संतोष देशमुख यांच्या तोंडातून आले होते, सुग्रीव कराड यांनी त्या दिवशी आवादा कंपनीच्या आवारात सुदर्शन घुले आणि इतर कंपनीला मारहाण करायला लावले होते, अशी देखील माहिती आहे. हीच बाब सुदर्शन घुले आणि त्याच्या इतर गँगला सहन झालेली नव्हती. सुग्रीव कराड हे मूळचे तांबवा (ता.केज) येथील आहेत. ते वास्तव्यास केजमध्ये असतात. ते गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय क्षेत्रात सक्रीय आहेत. त्यांच्या आई पंचायत समिती सदस्या होत्या. तर पत्नी केजच्या नगरसेविका आहेत. सुग्रीव कराड यांची पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे. त्यांच्यावर अनेक ठिकाणी मारहाण, खून, दरोडा, अत्याचार, दंगल असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते.
हेही वाचा
संतोष देशमुख हत्याप्रकरणात सुग्रीव कराडची एंट्री; आरोपी चाटे अन् महेश केदारने मांडली नवीनच थेअरी

























