IPL 2025 RR Vs KKR: कोलकाता नाईट रायडर्सचा कणा असलेल्या सुनील नरेनला 1628 दिवसांनी पहिल्यांदाच संघाबाहेर केलं, खरं कारण समोर आलं
IPL 2025 RR Vs KKR: कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने क्विंटन डिकॉकच्या नाबाद 97 धावांच्या खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्स संघाचा 8 गडी राखून पराभव केला.

Sunil Narine Update: अभिनेता शाहरुख खानच्या मालकीच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने बुधवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा पराभव करत यंदाच्या आयपीएल हंगामात पहिल्या विजयाची नोंद केली. सलामीवीर क्विंटन डिकॉक KKR च्या विजयाचा शिल्पकार ठेवला. त्याने नाबाद 97 धावा करुन संघाला विजय मिळवून दिला. मात्र, एक गोष्ट सगळ्यांच्याच नजरेत भरली ती म्हणजे या सामन्यात क्विंटन डिकॉकच्या साथीला सलामीला आलेला मोईन अली. मोईन अलीला कालच्या सामन्यात सुनील नरेनच्या जागी संघात घेण्यात आले होते. गेल्या अनेक हंगामांपासून सुनील नरेन हा केकेआर संघाचा अविभाज्य भाग राहिला आहे. काल 1628 दिवसांनी पहिल्यांदा कोलकाता नाईट रायडर्सचा संघ सुनील नरेन याच्याशिवाय खेळत होता. त्यामुळे अनेकांचा आश्चर्याचा धक्का बसला.
कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य राहणे नाणेफेकीसाठी मैदानात आला तेव्हा त्याने सुनील नरेनच्या न खेळण्यामागचे कारण समोर आले. गुवाहाटीला झालेल्या या सामन्यात केकेआरने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. यावेळी अजिंक्य राहणे याने प्लेईंग 11 मध्ये बदल केल्याचे सांगितले. सुनील नरेनच्या जागी मोईन अलीला संघात घेण्यात आल्याचे त्याने जाहीर केले. त्यामुळे सुरुवातीला चाहत्यांना नरेनला दुखापत झाली आहे का, अशी शंका वाटली. मात्र, सुनील नरेनची प्रकृती ठीक नसल्याने तो आजच्या सामन्यात खेळणार नाही, असे अजिंक्य रहाणेने स्पष्ट केले.
सुनील नरेन 1628 दिवसांनी संघाबाहेर
सुनील नरेन हा केकेआरच्या संघाचा अविभाज्य भाग राहिला आहे. तो काल 1628 दिवसांनी पहिल्यांदाचा एखाद्या मॅचमध्ये खेळला नाही. मात्र, सुनील नरेनच्या अनुपस्थितीत कोलकाता नाईट रायडर्सने विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सचा पराभव करुन केकेआरने 2 गुण मिळवले. नरेनच्या जागी संघात समावेश करण्यात आलेल्या मोईन अली यानेही प्रभावी गोलंदाजी करत 4 षटकांत फक्त 23 धावा देऊन दोन गडी बाद केले. त्यामुळे राजस्थान रॉयल्सचा 151 धावावंर रोखण्यात केकआरला यश आले.
केकेआरचा 8 गडी राखून विजय
कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांनी या सामन्यात टिच्चून मारा केला. राजस्थान रॉयल्सकडून रियान पराग आणि यशस्वी जयस्वाल यांची जोडी जमली होती. मात्र, आठव्या षटकात मोईन अलीने रियान परागला बाद केले आणि राजस्थानचा डाव ढेपाळला. पुढच्याच ओव्हरमध्ये मोईन अलीनं यशस्वी जयस्वालला 29 धावांवर बाद केलं. त्यानंतर पुढच्या दोन ओव्हरमध्ये नितीश राणा आणि वानिंदू हसरंगा बाद झाले. त्यामुळं राजस्थाननं 8,9,10,11 व्या ओव्हरमध्ये ज्या चार विकेट गमावल्या तिथंच सामना त्यांच्या हातातून निसटला.
राजस्थान रॉयल्सच्या 152 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या केकेआरकडून क्विंटन डिकॉक याने तडाखेबंद खेळी केली. त्याने नाबाद 97 धावा केल्या. त्याच्या या खेळीत 6 षटकार आणि 8 चौकारांचा समावेश होता. राजस्थान रॉयल्स सलग दुसऱ्या सामन्यात हरल्याने ते गुणतालिकेत सर्वात तळाच्या स्थानावर आहेत. तर केकेआरने दोन गुण मिळवल्यामुळे त्यांनी 9 व्या स्थानावरुन सहाव्या स्थानावर उडी घेतली आहे.
आणखी वाचा




















