Navi Mumbai : कोपरखैरणे पोलीस ठाण्यात आरोपीचा संशयास्पद मृत्यू, CID चौकशी सुरु
या तरुणाला जमावाने लाठ्या-काठ्या, दगडांनी मारहाण केल्याने हा तरुण गंभीर जखमी झाला होता. तशा स्थितीत त्याला रुग्णालयात न नेता पोलीस ठाण्यात बसवून ठेवल्याने पोलीसदेखील अडचणीत सापडले आहेत.

नवी मुंबई : कोपरखैरणे सेक्टर 19 येथे 22 वर्षाचा तरुण चोरी करताना रंगेहाथ पकडला गेलेल्या तरुणाला स्थानिक नागरिकांनी मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले. मारहाण झाल्यावर हा तरुण दोन तास कोपरखैरणे पोलिस ठाणे येथे होता. अचानक या तरुणाला उलट्या झाल्याने व चक्कर आल्याने बेशुध्द अवस्थेत तातडीने या तरुणाला रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना रुग्णालयाने या तरुणाला मृत घोषित केले. या तरुणाचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाला की जमावाने मारहाण केली याचा तपास पुणे येथील सीआयडी अधिकारी शुक्रवारी सायंकाळी उशिरा पर्यंत करत होते.
कोपरखैरणे येथे गुरुवारी मध्यरात्री एका चोरट्याला चोरी करताना रंगेहाथ जमावाने पकडले. यानंतर पोलिस नियंत्रण कक्षात दूरध्वनी करून पोलिसांना पाचारण करून या चोरट्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी या चोरट्याला पोलिस ठाण्यात दोन तास बसवून ठेवले. हा तरुण जखमी अवस्थेत पोलिस ठाण्यात बसला असताना अचानक या तरुणाची तब्येत गंभीर झाल्याने त्याला उलट्या होऊ लागल्या. पोलिसांनी ताबडतोब या तरुणाला घेवून रुग्णालय गाठले. मात्र उपचारासाठी दाखल केल्यावर या तरुणाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
कोपरखैरणे सेक्टर 5 येथे हा मृत तरुण वास्तव्यास होता. मयताचे नाव दिनेश चव्हाण असून त्याच्यावर घरफोडी, चोरी करणे असे 7 गुन्हे दाखल आहेत. प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपविण्यात आला आहे. सायंकाळी उशिरा पर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.चोरट्याला कोणी मारहाण केली याचा शोध घेतला जात असून पोलिसांची कुमक कोपरखैरणे येथे तैनात करण्यात आली आहे.चोरट्याला मारहाण कोपरखैरणे सेक्टर 19 मधील होळी मैदान परिसरात झाली आहे.
या तरुणाला जमावाने लाठ्या-काठ्या, दगडांनी मारहाण केल्याने हा तरुण गंभीर जखमी झाला असतानाही त्याला रुग्णालयात न नेता पोलीस ठाण्यात बसवून ठेवल्याने पोलीस देखील अडचणीत सापडले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
