Mhada Lottery: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! नव्या वर्षात 3000 सदनिकांची लॉटरी, कुठे असणार घरं?
Mhada Lottery: मुंबईत नव्या वर्षात म्हाडाकडून 2500 ते 3000 घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. मुंबई उपनगरातील मोक्याच्या ठिकाणी ही घरं उपलब्ध असतील.
मुंबई: जमिनीच्या लहानशा तुकड्यालाही सोन्याचा भाव असणाऱ्या मुंबईत सामान्य लोकांना परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करुन देणाऱ्या महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण मंडळ अर्थात म्हाडाकडून नव्या वर्षातही लॉटरी काढण्यात येणार आहे. मुंबईत स्वत:चे हक्काचे घर असावे, अशी इच्छा असणारा गरीब आणि सामान्यवर्ग कायमच म्हाडाच्या लॉटरीकडे डोळे लावून बसलेला असतो. म्हाडाकडून 2025 मध्ये अडीच ते तीन हजार घरांसाठी लॉटरी काढली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये अत्यल्प आणि अल्प गटासाठी अधिकाअधिक घरे राखीव ठेवण्याचा म्हाडा प्राधिकरणाचा प्रयत्न असल्याचे समजते.
म्हाडाकडून यंदाच्या वर्षी अत्यल्प आणि अल्प गटासाठी जी लॉटरी काढण्यात येतील त्यामधील बहुतांश घरे हे मुंबई उपनगरात असतील. अंधेरी, जुहू, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली, विक्रोळी, घाटकोपर, पवई, ताडदेव आणि सायन या परिसरांमध्ये म्हाडाची नवे घरे उपलब्ध होतील, असा अंदाज आहे. म्हाडाच्या मुंबई आणि कोकण मंडाळाकडून वर्षातून साधारण दोनवेळा लॉटरी काढली जाते. मात्र, मुंबईतील घरांसाठी प्रचंड चढाओढ असते. म्हाडाच्या अगदी 400-500 घरांच्या लॉटरीसाठीही लाखोंनी अर्ज भरले जातात. त्यामुळे यंदाही म्हाडाच्या लॉटरीचे अर्ज कधी निघणार, याची उत्सुकता अनेकांना आहे.
दरम्यान, गेल्या काही वर्षांमध्ये म्हाडाच्या घरांच्या वाढत्या किंमती हा सामान्य वर्गासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. अलीकडच्या काळात लॉटरीसाठी उपलब्ध असणाऱ्या म्हाडाच्या काही घरांची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये होती. इतक्या जास्त किंमतीची घरं सामान्य वर्गाला विकत घेणे कसे परवडणार, असा सवाल वारंवार उपस्थित केला जातो. म्हाडाच्या घरांची अलीकडच्या काळातील किंमत साधारण 34 लाखांपासून सुरु होते. मात्र, ही किंमत 27 लाखांपर्यंत कमी करण्यात यावी, अशी मागणी आहे. या पार्श्वभूमीवर महायुती सरकार आणि म्हाडा प्राधिकरणाकडून काही पावले उचलली जाणार का, हे पाहावे लागेल.
मुंबईकरांना मिळणार 4 मोठ्या प्रकल्पांचं गिफ्ट
2025 मध्ये मुंबई आणि परिसरातील नागरिकांना 4 मोठ्या प्रकल्पांचं गिफ्ट मिळणार आहे. यात नवी मुंबई विमानतळ, नवा वाशी खाडी पूल, मेट्रो ३चा दुसरा टप्पा आणि एक्स्प्रेस वे मिसिंग लिंक यांचा समावेश आहे. या नव्या प्रकल्पांमुळे मुंबईकरांची प्रवासाची दगदग कमी होईल. तसेच प्रवासाचा वेळही मोठ्या प्रमाणावर वाचू शकतो.
आणखी वाचा
गुड न्यूज, म्हाडा मुंबईत पुढील 5 वर्षात अडीच लाख घरं बांधणार, घरांच्या किंमतीबाबत मोठी अपडेट