कुणाल कामराने अजित पवारांना वादात ओढलं; जुन्या व्हिडिओवर उपमुख्यमंत्र्यांची नवी प्रतिक्रिया
कुणाल कामराने केलेल्या विडंबनाचे पडसाद विधिमंडळ सभागृहात पाहायला मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हे चुकीचं असल्याचे सांगत, कुणाल कामराने एकनाथ शिंदेंची माफी मागायला हवी, असे म्हटले.

मुंबई : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या एका 45 मिनिटांच्या शोमधील काही भाग व्हायरल झाला असून त्यात उपमुख्यमंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर सडकून टीका करण्यात आली आहे. एका विडंबन गाण्याच्या माध्यमातून ही टीका करण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत ज्या स्टुडिओमध्ये हे गाणं शूट झालं त्या स्टुडिओत तोफफोड केला. तसेच, याप्रकरणी मुंबईतील विविध पोलीस स्टेशनला कुणाल कामराविरुद्ध तक्रारही दाखल केली आहे. विशेष म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधिमंडळातही हा मुद्दा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गाजला आहे. तर, कुणाल कामराला शिवसैनिकांकडून धमक्याही दिल्या जात आहेत. त्यातच, कुणाल कामराने आज पुन्हा एकदा इंस्टाग्राम पोस्ट करत मी माफी मागणार नाही, असे ठणकावून सांगितले. यावेळी, अजित पवारांचा (Ajit pawar) दाखलाही त्याने दिला होता. त्यावर,आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपली भूमिका मांडली आहे.
कुणाल कामराने केलेल्या विडंबनाचे पडसाद विधिमंडळ सभागृहात पाहायला मिळाले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हे चुकीचं असल्याचे सांगत, कुणाल कामराने एकनाथ शिंदेंची माफी मागायला हवी, असे म्हटले. मात्र, आपण काहीही चुकीचं बोललेलो नाही, काहीही चुकीचं केलेलं नाही. त्यामुळे, माफी मागणार नाही. मात्र, पोलिसांना सर्वोतोपरी सहकार्य करु, न्यायालयाने सांगितल्यास माफी मागू, असे कुणाल कामराने इंस्टावर पोस्ट करत म्हटले. तसेच, मी जे बोललो तेच उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही यापूर्वी बोललेलं आहे, असा दाखलाही त्याने दिला. त्यामुळे, कामराने आपल्या वादात महायुतीमधील घटकपक्ष असलेल्या अजित पवारांनाही ओढलं आहे. आता, यावर अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
अजित पवारांचे स्पष्टीकरण
मागच्या काळात मी विरोधी पक्षनेता होतो, त्यावेळी मी परिस्थितीला अनुसरून बोललो. त्यानंतर आम्ही आता निवडणुकीला सामोरे गेलो, लोकांनी आम्हाला त्यांचा सपोर्ट दिला आहे. आम्हाला मताधिक्य दिलं आहे, असे अजित पवार यांनी म्हटलं. तसेच, आता मागच्या गोष्टींबाबत बोलले जाते पण आम्ही आज एकत्रित काम करण्याचा प्रयत्न करत आहोत. विरोधी पक्षाची भूमिका बजावत असताना ते वक्तव्य बरोबर होत, आज ते वक्तव्य बरोबर नाही, असे म्हणत एकनाथ शिंदेंबद्दल आपण जे वक्तव्य केलं ते विरोधी पक्षात असताना योग्य होते, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. दरम्यान, अजित पवारांनी शिवसेना शिंदे गटावर टीका करताना गद्दार आणि पन्नाख खोके, एकदमे ओक्के.. असे म्हटले होते. कामराने अजित पवारांच्या त्या व्हिडिओची आठवण करुन दिली आहे.
























