Beed Jail Gang War : वाल्मिक कराडला बीड कारागृहात गिते गँगकडून चोप, मनोज जरांगेंच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; गृहमंत्र्यांकडे मोठी मागणी
Beed Jail Gang War : संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सूत्रधार वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला बीड जिल्हा कारागृहात मारहाण झाल्याची माहिती समोर येत आहे.

Beed Jail Gang War : बीड येथील मस्साजोग गावचे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा (Santosh Deshmukh Murder Case) सूत्रधार वाल्मिक कराड (Walmik Karad) आणि आरोपी सुदर्शन घुलेला (Sudarshan Ghule) बीड जिल्हा कारागृहात (Beed Jail) मारहाण झाल्याची माहिती समोर येत आहे. महादेव गिते (Mahadev Gite) आणि अक्षय आठवले (Akshay Athawale) हे दोघेजण वाल्मिक कराड याच्या अंगावर धावून गेले. तेव्हा बाजुलाच असणारा सुदर्शन घुले वाल्मिक कराडच्या मदतीसाठी धावून आला. मात्र, महादेव गिते आणि अक्षय आठवले या दोघांनी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला चोप दिल्याचे समजते. आता या प्रकरणावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी हे आरोपी सोंग करणारे आहेत, अशी शंका उपस्थित केली आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, आज काय झाले याबाबत आपल्याला काही माहिती नाही. नेमकं काय घडलं हे प्रशासनाला माहीत असेल. हे आरोपी सोंग करणारे आहेत. लोकांना वेड्यात काढण्याचा प्रकार करतात. कुठे दुखतंय म्हणतील, अॅडमिट होतील, नाहीतर दुसऱ्या जेलला जाऊ द्या, असे म्हणतील. हे प्रयोग करणारे आहेत. मारामाऱ्या नाही झालं तरी झाल्या असे म्हणतील. याबाबत अधिकृत माहिती बाहेर येईपर्यंत आपल्याला त्यावर काही बोलता येणार नाही. पण हे सोंग असू शकते, अशी शंका त्यांनी उपस्थित केली.
खटला फास्टट्रॅकवर चालवून आरोपींना ताबडतोब फाशी द्या
या प्रकरणात गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू आहे. याबाबत विचारले असता मनोज जरांगे म्हणाले की, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असेल तर ते एखाद्या वेळेस खरे ही असू शकते. त्यामुळे आता त्यांचे काय करावे हे जेल प्रशासन ठरवेल. परंतु, संतोष देशमुख प्रकरणाचा खटला लवकरात लवकर संपवणे गरजेचे आहे. हे लोक एकमेकांना संपवतील, त्यापेक्षा हा खटला फास्टट्रॅकवर चालवून यांना ताबडतोब फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असे मागणी त्यांनी केली आहे. तसेच या लोकांना सहकार्य करणाऱ्यांना देखील पकडले पाहिजे, अशी विनंती देखील मनोज जरांगे पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांना केली आहे.
बीड कारागृहात नेमकं काय घडलं?
बीड जिल्हा कारागृहातील कैद्यांना वेगवेगळ्या बराकमध्ये ठेवले जाते. सोमवारी सकाळी 10.30 ते 11 दरम्यान तुरुंगातील बंदी उठवली जाते. या काळात सर्व कैद्यांना तुरुंगात मोकळे सोडले जाते. सकाळी नाश्ताच्या वेळी बंदी उठवल्याने सर्व कैदी बाहेर मोकळे होते. त्यावेळी महादेव गिते आणि अक्षय आठवले हे दोघेजण वाल्मिक कराड याच्या अंगावर धावून गेले. तेव्हा बाजुलाच असणारा सुदर्शन घुले वाल्मिक कराडच्या मदतीसाठी धावून आला. मात्र, महादेव गिते आणि अक्षय आठवले या दोघांनी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला चोपल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी बीड जिल्हा कारागृहात तणावपूर्ण शांतता असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, जेल प्रशासनाने या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.
आणखी वाचा
























