Mhada News : गुड न्यूज, म्हाडा मुंबईत पुढील 5 वर्षात अडीच लाख घरं बांधणार, घरांच्या किंमतीबाबत मोठी अपडेट
Mhada News : म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून येत्या पाच वर्षात अडीच लाख घरं बांधण्यात येणार आहेत. यामुळं मुंबईकरांचं हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं.
Mhada मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरणच्या मुंबई बोर्डानं पुढील पाच वर्षात मुंबईत अडीच लाख घरांच्या निर्मितीची घोषणा केली आहे. यामुळं मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी चांगली अपडेट आहे. नव्या घरांच्या निर्मितीसह म्हाडाकडून परवडणाऱ्या घरांसाठी किमतीमध्ये 30 टक्क्यांपर्यंतच्या कपातीसाठी देखील योजनेवर काम सुरु असल्याची माहिती आहे. यासंदर्भातील वृत्त नवभारत टाइम्स या वृत्तपत्रानं दिलं आहे.
म्हाडा मुंबई बोर्डाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार म्हाडाकडे मुंबईत 2 हजार हेक्टर जमीन आहे. याशिवाय 114 विविध सरकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाचं काम करावं लागणार आहे. जुन्या इमारतींचा पुनर्विकास होणार असल्यानं मुंबईत घरांच्या संख्येत मोठ्या संख्येनं वाढ होईल. विविध योजनांच्या माध्यमातून मुंबईत पुढील पाच वर्षात अडीच लाख घरं उपलब्ध होतील, अशी माहिती त्यांनी दिली. पुनर्विकासासाठी आवश्यक परवानग्या एकाच ठिकाणी दिल्या जात असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.
मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद
मुंबईतील घरांच्या किंमती मोठ्या प्रमाणं वाढल्या आहेत. त्यामुळं मुंबईकरांच्या अपेक्षा म्हाडाकडून वाढल्याचं पाहायला मिळतं. म्हाडाच्या मुंबईतील एका घरासाठी 40 अर्ज येतात. काही महिन्यांपूर्वी म्हाडानं 2030 घरांसाठी अर्ज मागवले होते. त्यावेळी 1लाख 29 हजार अर्ज आले होते. यापूर्वी 2023 मध्ये 4082 घरांच्या लॉटरीसाठी म्हाडाकडे 1 लाख 9 हजार अर्ज आले होते. अर्जदारांच्या तुलनेत घरांची संख्या कमी असल्यानं त्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळं येत्या पाच वर्षात अडीच लाख घरांची निर्मिती झाल्यास लाखो मुंबईकरांना हक्काचं घर मिळू शकते.
म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईसह एमएमआरमध्ये अधिक संख्येनं किफायतशीर किंमतीला घरांची निर्मिती करण्यासाठी आवश्यक पावलं उचलल्याची माहिती दिली आहे.क्लस्टर डेव्हलपमेंट, जुन्या सेस इमारतींच्या पुनर्विकासातून विकासकांकडून म्हाडाला अतिरिक्त घरं मिळाल्यानं दक्षिण मुंबईत नवी घरं उपलब्ध होतील
म्हाडाचे उपमुख्य कार्यकारी अनिल वानखेडे यांच्या माहितीनुसार म्हाडा मुंबईत भाडेतत्त्वावर देखील दिली जाणार आहेत. विद्यार्थी, मुंबईत नोकरीसाठी येणाऱ्या महिला यांच्यासाठी ती घरं उपलब्ध करुन दिली जाणार आहेत.
दरम्यान, म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 2030 घरांची लॉटरी पार पडल्यानंतर सध्या कोकण मंडळाकडून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेतील घरांच्या विक्रीसाठी जाहिरात देण्यात आली असून त्यासाठी मुदतवाढ देखील देण्यात आली आहे.
इतर बातम्या :