अलीकडचे पुढारी पाया पडायच्या लायकीचे राहिले नाहीत, पाया पडू नका; अजित पवारांचा मोलाचा सल्ला
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, चंद्रकांत दायमा यांच्यासोबत अनेक लोक पक्षप्रवेश करत आहेत, राजेश विटेकर ही संघटना वाढविण्याचे प्रयत्न करत आहे

मुंबई : नांदेडमध्ये दोन दिवसांपूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) पक्षप्रवेश झाल्यानंतर आज पुन्हा एकदा पक्ष प्रवेश कार्यक्रम संपन्न झाला. माजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल अध्यक्ष चंद्रकांत दायमा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सेवा दलाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश झाला. हे राज्य पुढे जावो, छत्रपती शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच राज्य पहिल्या क्रमांकावर राहिलं आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांनी नेहमी राज्याला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आहे, असे म्हणत अजित पवारांनी (Ajit pawar) पक्षप्रवेशावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी, गेल्या काही महिन्यांतील घडलेल्या घटनांचा अनुल्लेखाने संदर्भ देत त्यांनी कार्यकर्त्यांना मोलाचा सल्लादेखील दिला आहे. राजकीय नेत्यांबद्दलची जनतेमध्ये असलेली अनास्था खुद्द अजित पवारांच्याही तोंडी पाहायला मिळाली. अलीकडचे पुढारी पाया पडायच्या लायकीचे राहिलेले नाही, त्यामुळे पाया पडायच्या नादात पडू नका असे अजित पवारांनी यावेळी म्हटले.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, चंद्रकांत दायमा यांच्यासोबत अनेक लोक पक्षप्रवेश करत आहेत, राजेश विटेकर ही संघटना वाढविण्याचे प्रयत्न करत आहे. त्यांच्या उपस्थित अनेक जण पक्ष प्रवेश करत आहे. केंद्रात आज स्थिर सरकार आले आहे, राज्यात महायुतीचे सरकार आहे. आपण लाडक्या बहिणींची चर्चा केली, काम करताना आपण पारदर्शकपणे भूमिका घेतली पाहिजे, त्यामुळे तसे सांगणे गरजेच असते काही वेळा लोकांना वाईट वाटते, असे म्हणत 2100 रुपयांच्या संदर्भाने अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केली.
वक्तव्य जपून करा
सेवा दलाच काम अधिक पुढे कसे घेऊन जाता येईल याचा विचार करावा लागेल, आता नवी पिढी फार कमी येत आहे, यापूर्वी अनेक जण यायचे. उन्हाळ्याची तीव्रता वाढली आहे, मी काल नांदेडला जाऊन आलो, अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. पण, आपल्याला सामंजस्याने भूमिका घ्यायची आहे. आपण महायुतीत आहे, त्यामुळे तसेच काम करायचं आहे. काम करताना चुकीच वक्तव्य तुमच्या तोंडून बाहेर पडता कामा नये, बोलता बोलता चुकीचा शब्द बाहेर पडतो. त्यामुळे प्रॉब्लेम होतात, ते व्हायला नको, असा सल्लाही अजित पवारांनी दिला. आपल्याला आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीला सामोरे जायचे आहे. आपण शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचे आहोत हे सांगता आले पाहिजे. विरोधी पक्ष विरोधी पक्षाच्या भूमिकेत अपयशी पडताना पाहायला मिळत नाही. विरोधी पक्ष सभागृहात उपस्थित राहत नाही, लोकशाही आहे त्यांचा अधिकार आहे, असे म्हणत विरोधकांनाही अजित पवारांनी टोला लगावला.
आपण लाडक्या बहिणींच्या पाठीशी आपण सगळ्यांनी उभे राहिले पाहिजे,आपण एकमेकांच्या संपर्कात राहिलो पाहिजे. अनेक लोक पक्षात येऊ पाहत आहेत पण येणाऱ्यांची जनमानसात भूमिका चांगली पाहिजे. आधीच कोणी चुकी केली असेल आणि मग त्याचा विचार असेल की सत्ताधारी पक्षात जाऊ असे असेल तर असे होणार नाही. नाहीतर उद्या पेपरात फोटो यायचा अमुक पक्ष प्रवेश झाला, असे म्हणत अजित पवारांनी कार्यकर्त्यांचेही कान टोचले.
पुढारी पाया पडायच्या लायकीचे नाहीत
उद्या जर आपला माणूस चुकला तर कायदा आहे. डॉ. बाबासाहेबांचा कायदा आहे, कोणीही सुटणार नाही. आपण भाषणात जे काही सांगू ते कृतीत आले पाहिजे. आपण यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचे आहोत, आपण सगळेजण सारखे आहोत असे समजून काम करूया. पाया पाड्याच्या नादात पडू नका, अलीकडचे पुढारी पाया पडायच्या लायकीचे राहिलेले नाही. त्यामुळे पाया पडायच्या नादात पडू नका, असा मोलाचा सल्लाही अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिला.
डीपीडीसीवर संधी असेल
आमचा पदर बिदर फाटून गेलेला आहे, काही बोलू नका मी स्वतः त्याची किंमत मोजलेली आहे. आता ज्या निवडणुका येतील सर्व निवडणुकीत आपल्याला यश मिळेल असा प्रयत्न करू. पण पराभव झाला तरी खचून जाऊ नका. लोकसभेत आपली एकच जागा आली, तरी विधानसभेत आपण खचलो नाही. आपल्याकडे वित्त विभाग आहे, महत्त्वाची खाती आपल्याकडे आहेत. तुम्हाला असे कधीच वाटणार नाही की आपण आगीत उठून फुफूट्यात पडलोय. आपण तीन पक्षाचं सरकार असलो तरी पालकमंत्री असेल पण डीपीडीसीवर आपण सगळे असू. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मदत होईल, असे आश्वासनही अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिले.
हेही वाचा
ईद मुबारक... भाजपकडून 32 लाख 'सौगात ए मोदी' किटचे वाटप; रमजाननिमित्त मुस्लिम बांधवांना भेट
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
