मास्क उत्पादनाचे दर परवडत नसल्याने मुंबई महापालिकेची 30 लाख मास्कची ऑर्डर उत्पादकांनी फेटाळली
मास्क उत्पादनाचे दर परवडत नसल्याने मुंबई महापालिकेची 30 लाख मास्क निर्मितीची ऑर्डर उत्पादकांनी फेटाळली आहे.शासनाने आपल्या दरांवर पुन्हा एकदा विचार करावा, अशी मास्क उत्पादकांनी राज्य शासनाला विनंती केलेली आहे.
मुंबई : महाराष्ट्र राज्यात N95 सह इतर मास्क विक्रीवर राज्यशासनाने नियंत्रण ठेवत या मास्कचे दर निश्चित केलेले आहेत. मात्र, शासनाने निश्चित केलेले दर मास्कची निर्मिती करणाऱ्या उत्पादकांना मान्य नसल्याचं सांगण्यात आले आहे. मुंबई महानगर पालिकेने FFFP2 चे 30 लाख मास्कची ऑर्डर 8 रुपये 83 पैशाने दिली होती. मात्र, ती ऑर्डर करण्यास परवडत नसल्याने मास्क उत्पादकांनी बीएमसीला नकार दिलेला आहे. शासनाने आपल्या दरांवर पुन्हा एकदा विचार करावा, अशी मास्क उत्पादकांनी राज्य शासनाला विनंती केलेली आहे.
संपूर्ण राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर बाजारामध्ये मास्क विक्रीचे प्रमाण वाढलं होतं. तर मास्कच्या किमती अवाढव्य झाल्या होत्या. कोरोना साथीच्या अगोदर N95 मास्क 45 रुपयाला विकला जायचा. मार्चमध्ये हाच मास 45 रुपयांपासून 175 रुपयांवर विक्री होऊ लागली. म्हणजेच त्याच्या दरात 437.5 टक्के इतकी वाढ झाल्याचे निदर्शनास आलं. मास्कच्या किमतींवर नियंत्रण आणण्यासाठी गेल्याच आठवड्यात राज्य शासनाने त्याचे दर निश्चित केलेत. N95 मास्क साधारण त्याच्या प्रकारानुसार 19 ते 45 रुपयांपर्यंत उपलब्ध होईल, तर दुहेरी आणि तेही तिहेरी पदराचे मास्क अवघ्या चार ते तीन रुपयांना मिळतील असे सुधारित दर शासनाने निश्चित केले आहेत.
सर्वात आधी कोरोनाची लस कोणाला? उत्तर मिळालं! माहिती संकलन करण्याचं काम सुरु
शासनाने दिलेल्या दरांमध्ये 70 टक्के कमी करून मास्क शासकीय आणि खासगी रुग्णालयाला देण्याचं बंधन राज्यशासनाने यामध्ये घातले आहे. शासनानं नेमून दिलेल्या दरांमध्ये कोणत्याही पद्धतीचा फायदा होत नाही. केवळ तोट्याला सामोरे जावं लागतं असल्यामुळे राज्य शासनाने आपल्या दरांबाबत पुन्हा एकदा विचार करावा असं उत्पादकांचे म्हणणे आहे. हे दर निश्चित केल्यानंतर या मास्कची निर्मिती करणाऱ्या उत्पादकांनी राज्य शासनाला या दरासंदर्भात फेरविचार करण्याची विनंती केलेली आहे. कारण मास्कची निर्मिती करत असताना होणारा किमान फायदाही या दरांमध्ये होत नसल्याने या कंपन्यांचे मोठं नुकसान होत असल्याचं उत्पादकांनी म्हटले आहे.
मुंबई महानगरपालिकेने 8 रुपये 83 पैशांनी FFFP2 प्रकारचे 30 लाख मास्क तयार करून देण्यासंदर्भात निविदा काढली होती. मात्र, या निविदेला मास्क निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी प्रतिसाद दिलेला नाही. मास्क निर्मितीचं साडे दहा ते साडे अकरा रुपयांपर्यंत होत असल्याने 8 रुपये 83 पैशांना मास्क निर्मिती होऊ शकत नसल्याने हे दर वाढवून देण्यासंदर्भात उत्पादकांनी सांगितले आहे. मात्र, त्यांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिलेला आहे. पण त्यांनी राज्य शासनाने काढलेल्या GR मध्ये थोडा बदल करावा तसेच मुंबई महानगर पालिकेने काढलेल्या निविदेत ही बदल करावा, अशी विनंतीही केलेली आहे. या मास्कच्या किमतींवर नियंत्रण आणण्यासाठी राज्य शासन आणि मुंबई महानगर पालिकेने प्रयत्न केले असून याचे दर कमी करत ते स्थिर ठेवत असताना उत्पादकांना विश्वासात न घेतल्यामुळे हा एक नवीन तिढा यामध्ये निर्माण झालेला आहे.
No Mask No Entry | मास्क नाही घातला? फिरवा झाडू! मास्क न लावल्यास आता झाडू मारण्याची शिक्षा