(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ऑनलाईन परीक्षेतील कॉपी बहाद्दरांचा 'एबीपी माझा'कडून पंचनामा, विद्यार्थ्यांनी पैसे मोजून ऑनलाईन उत्तर मिळवल्याचं उघड
ऑनलाईन परीक्षांमध्ये पैसे मोजून कॉपी बहाद्दर चांगल्या मार्काने पास होत आहेत नेमकं कशा प्रकारे हे कॉपी बहाद्दर कॉपी करतात. एबीपी माझाने कॉपी बहाद्दरांचा पर्दाफाश केला आहे.
मुंबई : मागील दोन वर्षांपासून विद्यापीठ, महाविद्यालयात ऑनलाइन परीक्षा होत आहेत. मात्र, या परीक्षांमध्ये मिळणारे गुण कितपत ग्राह्य धरायचे हा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण, पदवी पदव्युत्तर ऑनलाइन परीक्षांमध्ये सर्रास कॉपी होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एबीपी माझाने कॉपी बहाद्दरांचा पर्दाफाश केला आहे. इंजिनिअरिंग असो किंवा मग लॉ चा पेपर, बीकॉम असूद्यात किंवा बीएससी जवळपास सर्वच अभ्यासक्रमांमध्ये पैसे मोजून ऑनलाईन परीक्षामध्ये कॉपीबहाद्दर कॉपी करून चांगल्या गुणांनी पास होत आहेत.
एबीपी माझाच्या टीमला ऑनलाईन पेपरमध्ये कॉपी होत असल्याच्या तक्रारीचा कॉल आला. विद्यार्थ्यांना कॉपी करण्यासाठी आणि पास करण्यासाठी काही विद्यार्थी पैसे सुद्धा घेत असल्याचं या कॉलमधून समजले. या कॉलच्या आधारे घेत आम्ही याचा तपास करायचा ठरवल. ऑनलाईन परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणावर कॉपी होत आहेत का याच्या मुळाशी जायचे ठरवले. त्यासाठी आम्ही विद्यार्थी संघटना, सामाजिक कार्यकर्त्यांशी संपर्क सुद्धा केला. एका ठिकाणी विद्यार्थ्याला तयार करून नेमका या परीक्षांमध्ये ऑनलाइन कॉपीचा प्रकार कसा घडतो ? हे उघडकीस आणले.
पेपर सुरू झाल्यानंतर साधारणपणे पाच दहा मिनिटांनी ऑनलाईन ग्रुप पाहिले तर त्यात विविध विषयांचे विविध ब्रान्च विविध ग्रुप आणि त्याच्या प्रश्नपत्रिका आधीच आलेल्या पाहायला मिळतात. दहा मिनिटानंतर जेव्हा ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांची उत्तर आली ते विद्यार्थी लिहिताच त्यानंतर साधारणपणे पंधरा ते वीस मिनिटानंतर सब्जेक्टिव्ह ज्याला आपण दीर्घ उत्तरी प्रश्न म्हणतो त्याचे सुद्धा स्क्रिनशॉट ग्रुपवर पडायला सुरुवात झाली. म्हणजे जवळपास सर्वच प्रश्नांची उत्तरं आता या ग्रुपमध्ये मिळणार हा विश्वास विद्यार्थ्यांमध्ये येतो आणि ऑनलाईन परीक्षेत पूर्णपणे कॉपी करून हा विद्यार्थी चांगल्या गुणांनी पास होतो.
आता हे ग्रुप कोणाकडून तयार केले जातात प्रश्नाचे उत्तर पुरवण्याची मदत कोण करतय? याच सुद्धा उत्तर आम्हाला मिळालं. विद्यार्थ्यांना पास करण्यासाठी प्रत्येक पेपर एक ते तीन हजार रुपये विद्यार्थ्यांकडून आकारले जातात. मात्र यामुळे नुकसान हुशार विद्यार्थ्यांचा तर आहेच शिवाय विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण करणारे हे प्रकरण आहे.
कोरोना काळात अभ्यासक्रम शिकण्यापासून ते परीक्षा घेण्यापर्यंत ऑनलाईन पद्धतीचा पर्यायी विचार केला गेला. मात्र ऑनलाईन पद्धतीत सुद्धा कॉपी बहाद्दर मोठ्या प्रमाणावर समोर आले. त्यामुळे भविष्यात या ऑनलाईन परीक्षांवर कितपत विसंबून राहायचं ,ऑनलाईन परीक्षेत मिळालेल्या गुणांना कितपत ग्राह्य धरायचा? ऑनलाईन परीक्षा देऊन पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर कितपत विश्वास ठेवायचा ? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने समोर येत आहे. त्यामुळे आतातरी ऑनलाईन परीक्षा बंद करून ऑफलाइन परीक्षेचा विचार करणे तातडीने गरजेचे आहे.