Varsha Gaikwad : 'रवी राजा आणि आमचा संबंध संपला, आता जिथे आहे तिथे राहावं', वर्षा गायकवाडांची संतप्त प्रतिक्रिया
Varsha Gaikwad on Ravi Raja Resigns : मुंबई महानगरपालिकेतील काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी काँग्रेसच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळी सुरु झाली आहे. राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक पार पडणार असून 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. विधानसभेच्या तोंडावर मुंबईत काँग्रेसला भाजपने जोरदार धक्का दिला आहे. मुंबई महानगरपालिकेतील काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा (Ravi Raja Resigns) यांनी काँग्रेसच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा देत भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. भाजपमध्ये प्रवेश करताच रवी राजांची मुंबई उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आता यावर काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
वर्षा गायकवाड म्हणाल्या की, दोन दिवसापूर्वी आम्ही रवी राजा यांना भेटलो. आमचे प्रभारी सुद्धा भेटले. आमची चर्चा त्यांच्यासोबत झाली. एखादं तिकीट मिळालं नाही म्हणून नाराज होणं चुकीचं आहे. पक्षाशी एकनिष्ठ राहायला हवं. सत्ता मिळत नाही, तिकीट नाही मिळालं म्हणून दुसऱ्या पक्षात जाणं योग्य नाही. आज रवी राजा जो चेहरा बनला तो पक्षांमुळे बनला होता. पाचवेळा ते नगरसेवक राहिले आहेत.
रवी राजा यांची नाराजी जगजाहीर
माझ्या वडिलांना सुद्धा 1995 मध्ये तिकीट मिळालं नाही, नंतर मिळालं, मला सुद्धा सुरुवातीला पक्षाने तिकीट नाकारलं होतं. या निवडणुकीत सुद्धा आम्हाला ज्या ठिकाणी तिकीट हवं होतं, त्या ठिकाणी पक्षाने तिकीट दिलं नाही, याचा अर्थ आम्ही नाराज झालो असे नाही. रवी राजा यांची नाराजी जग जाहीर आहे. त्यांना तिकीट मिळालं नाही म्हणून त्यांनी पक्ष बदलला आहे, असा हल्लाबोल वर्षा गायकवाड यांनी केला.
रवी राजा आणि आमचा संबंध संपला
वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, आता त्यांना भाजपमध्ये कुठले पद दिले त्याच्याबद्दल मला माहीत नाही. रवी राजा आणि आमचा आता संबंध संपला. त्यांनी आता जिथे आहे तिथे राहावं. त्यांना काँग्रेस पक्षाने विरोधी पक्ष नेतेपद दिलं, हे पद हे आमदाराच्या बरोबरीने होतं. मात्र, आता तुम्हाला आमदारकीचे तिकीट मिळत नाही म्हणून तुम्ही पक्ष सोडून जाता. त्यांचे काही मागचे प्रकरण सुद्धा याला कारणीभूत होते. त्यांनी हा निर्णय घेताना या प्रकरणाचा सुद्धा विचार केला असणार, असेही त्यांनी म्हटले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
मोठी बातमी: छातीत दुखत असल्याने प्रकाश आंबेडकरांना पहाटे रुग्णालयात दाखल केलं, अँजिओग्राफी शक्यता