Nagpur violence Devendra Fadnavis: ... त्यांना कदापि माफी नाही, नागपूर दंगलीबाबत मुख्यमंत्र्यांनी हादरवून टाकणारा घटनाक्रम सभागृहात सांगितला!
Nagpur violence: दंगल करणाऱ्यांवर जात-धर्म न पाहता कारवाई करु, पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना माफी नाही; देवेंद्र फडणवीस सभागृहात कडाडले. राज्यातील नागरिकांना शांततेचे आवाहन

मुंबई: राज्यात कोणीही दंगा करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर जात-धर्म न पाहता कारवाई करण्यात येईल. तसेच जो कोणी पोलिसांवर हल्ला करेल त्याला सोडले जाणार नाही, असा स्पष्ट आणि कठोर इशारा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिला. नागपूरच्या महल आणि हंसापुरी परिसरात सोमवारी झालेल्या हिंसाचाराच्या (Nagpur riots) पार्श्वभूमीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात निवेदन दिले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्वधर्मीय नागरिकांना शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले. महाराष्ट्र हे प्रगतीशील राज्य आहे. याठिकाणी गुंतवणूक येत आहे. आपल्याला इच्छित उद्दिष्ट गाठायचे असेल तर नागरिकांना कायदा-सुव्यवस्था राखणे गरजेचे आहे. सध्या अनेक धर्मांचे सण सुरु आहे. त्यामुळे सर्व लोकांना संयम बाळगावा आणि एकमेकांविषयी आदरभाव बाळगावा, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये घडलेल्या हिंसाचाराचा सविस्तर तपशील सभागृहासमोर मांडला. नागपूरातील महाल परिसरात सोमवारी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने 'औरंगजेबाची कबर हटा'व असे नारे देत आंदोलन केले होते. यावेळी त्यांनी गवताच्या पेंड्या असलेली प्रतिकात्मक कबर जाळली होती. याप्रकरणी गणेश पेठ पोलिसांनी आंदोलकांवर दुपारी 3 वाजून 9 मिनिटांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर वातावरण शांत होते. मात्र, सायंकाळी अफवा पसरवण्यात आली की, सकाळी आंदोलकांकडून जी प्रतिकात्मक कबर जाळण्यात आली त्याच्या कापडावर धार्मिक मजकूर होता. हे वृत्त पसरल्यानंतर नमाज आटोपून येत असलेल्या 200 ते 250 लोकांच्या जमावाने नारेबाजी सुरु केली. आम्ही आग लावून टाकू, अशी हिंसक भाषा त्यांनी सुरु केली. तेव्हा पोलिसांनी बळाचा वापर केला, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
तत्पूर्वी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध तक्रार द्यायची आहे अशी मागणी केल्यानंतर मुस्लीम समुदायाच्या लोकांना पोलिसांनी गणेशपेठ पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. त्यांची तक्रार पोलीस ऐकून घेत होते. तेव्हा हंसापुरी भागात 200 ते 300 लोकांच्या जमावाने हातात काठ्या घेऊन दगडफेक सुरु केली. त्यांच्या तोंडावर फडकी गुंडाळली होती. या जमावाने हंसापुरीत 12 दुचाकींचे नुकसान केले. काही लोकांवर घातक शस्त्रांनी हल्ला केला, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
त्यानंतर भालदारपुरा भागात सायंकाळी साडेसात वाजता 80 ते 100 लोकांच्या जमावाने पोलिसांवर हल्ला केला. तेव्हा पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुर आणि सौम्य बळाचा वापर केला. यावेळी जमावाने एक क्रेन आणि काही चारचाकी वाहने जाळली. या सगळ्यात एकूण 33 पोलीस जखमी झाले. यामध्ये 3 उपायुक्त दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. एका पोलीस अधिकाऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. तर एकूण पाच नागरिक जखमी झाले. यापैकी तिघांना घरी सोडण्यात आले आहे. दोन जण रुग्णालयात आहेत, त्यापैकी एकजण अतिदक्षता विभागात आहे. एकूण 11 पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नागपूर शहरात एसआरपीएफच्या 5 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत, असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही: देवेंद्र फडणवीस
सकाळच्या घटनेनंतर त्यानंतर मध्यंतरी शांतता होती. त्यानंतर संध्याकाळी काही लोकांनी जाणीवपूर्वक हल्ला केला. कारण पोलिसांना एक ट्रॉली भरुन दगड मिळाले. वरती दगड जमा करुन ठेवण्यात आले होते. शस्त्रास्त्र मोठ्याप्रमाणावर होती. एका डीसीपी दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यावर कुऱ्हाडीने वार करण्यात आले. यामध्ये काही लोकांचा सुनियोजित पॅटर्न होता. या लोकांवर कारवाई केली जाईल. कोणालाही कायदा-सुव्यवस्था हातात घेण्याचा अधिकार नाही. पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला आहे अशा लोकांना काही झाले तरी सोडले जाणार नाही. पोलिसांवरचा हल्ला सहन केला जाणार नाही. पोलीस शांतता प्रस्थापित करत होते. अशावेळी त्यांच्यावर केलेला हल्ला चुकीचा होता, असे देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

