संतोष देशमुख हत्या प्रकरण, पर्यावरण ते पशुसंवर्धन, मंत्री पंकजा मुंडेंचं व्हिजन काय? माझा व्हिजनमध्ये मांडली भूमिका
Pankaja Munde : एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' या कार्यक्रमात मंत्री पंकजा मुंडे यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका मांडली आहे. .

Pankaja Munde : संतोष देशमुख यांच्या हत्येची (Santosh Deshmukh murder case) घटना ही अत्यंत दुर्दैवी आणि दृष्ट प्रवृत्तींनी केलेली होती असे मत पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी व्यक्त केले. या घटनांकडे बघण्याचा दृष्टीकोण, या घटनेत देण्यात येणार न्याय हे महत्वाचं असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. कोणतीही चुकीची घटना टाळता येणं शक्य होतं. ती घटना घडू नये यासाठी तेथील प्रशासन स्ट्रॉंग असणं गरजेचं होतं असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. तिथे प्रशासनाचा धाक असालया पाहिजे होते. अशा मुलांना पाठिशी घालणाऱ्या यंत्रणा तिथं नसायला हव्या होत्या असंही त्या म्हणाल्या. एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.
100 दिवसात आम्हाला कार्यक्रम सुरु करायचे होते, ते आम्ही केलं
सरकारला 100 दिवस पूर्ण झाले आहेत. माझ्याकडे दोन खाती आहेत. एक पर्यावरण आणि दुसरे पशुसंवर्धन. अधिवेशनाचा एकही दिवस असा नाही की पर्यावरणाच्या संदर्भात चर्चा होत नाही. हा एक महत्वाचा बदल असल्याचे मत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला 100 दिवसांचे कार्यक्रम दिले होते. हे कार्यक्रम आम्हाला सुरु करायचे होते, यामध्ये आम्हाला यश आल्याचे मुंडे म्हणाल्या. नवीन पॉलिसीमार्फत पर्यावरण विभाग कसा सक्षम होईल यावर आम्ही करत असल्याचे मुंडे म्हणाल्या.
ग्रामीण भागात उद्योजक व्हावेत, त्यासाठी वातावरण निर्मीती करण्याचा प्रयत्न
दुधात होणाऱ्या भेसळीवर आम्ही काम करत आहोत. याबाबत कडक कायदे असावे याचा विचार आम्ही करत आहोत असे पंकजा मुंडे म्हणाल्या. पशुसंवर्धनबाबत माझे एक स्वप्न आहे. ग्रामीण भागात उद्योजक व्हावेत. ग्रामीण भागातील युवक जीन्स पॅन्ट घालून पोल्ट्री फार्म, वराह पालन एक उद्योजक म्हणून समोर यावा, त्यांच्यासाठी चांगली वातावरण निर्मिती व्हावी हा माझा उद्देश असल्याचे पंकजा मुंडे म्हणाले. प्रदुषण करणारे घटक दूर ठेवले पाहिजेत, व्यक्ती असोत किंवा घटक असोत असे मुंडे म्हणाल्या.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळावं हीच माझी भूमिका
गोपीनाथ मुंडे असते तर मी राजकारणात राहिले नसते असं वक्तव्य पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी केलं. ते असते तर काय झालं असतं? अशी तुलना मी करणार नाही असेही पंकजा मुंडे म्हणाले. बीड जिल्ह्यात शांतता ठेवण्यासाठी मी प्रत्येक क्षणी तत्पर राहीली आहे. बीडमध्ये प्रशासनाचा धाक हवा होता. दिवंगत संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय देणं हीच माझी भूमिका असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या.
महायुती सरकारचा कारभार छान चाललाय
महायुती सरकारचा कारभार छान चालला आहे. नैसर्गिक युती आहे शिवसेनेबरोबर, अजित पवार यांचा दिर्घ प्रशासनाचा अनुभव आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही प्रशासनाचा चांगला अनुभव आहे. सगळी टीम ऑल राऊंडर असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. महाराष्ट्राचा चेहरा कोण आहे हे मला पाहायचं आहे. ओबीसीची चेहरा कोण आहे हे मला पाहायचं नाही. कोणत्याही जातीचं काय स्टेटस आहे हे बघण्यापेक्षा सामन्य माणसांच्या जीवनाकडे लक्ष दिलं पाहिजे असे पंकजा मुंडे म्हणाल्या. पुढच्या काळात नदी पुनर्जीवनावर मला काम करायचं असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. तसेच ग्रामीण भागातील तरुणांना ग्रामीण भागात राहुनच उद्योग देण्याचा प्रयत्न असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

